आपण काय करू शकतो?

    02-Apr-2024
Total Views | 97
Swachhata Doot


घर, वस्ती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छताकर्मी असतात. त्या महिला आणि पुरुषांच्या कष्टाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यांच्या जागी क्षणभर स्वत:ला ठेवून पाहू. जावे त्यांच्या वंशी! मग आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो?

पुनर्विकासाच्या निमित्ताने उपनगरातून थेट शहरात काही काळ वास्तव्य झालं. 100-150 सदनिकांची सोसायटी. पण, एवढ्या मोठ्या सदनिकांसाठी स्वच्छतादूत म्हणून एकच बन्सीकाका रोज सकाळी 7-7.30 वाजता हजर व्हायचे. तेही लांब विरार परिसरातून यायचे. न सांगता, एकही दिवस सुट्टी नाही. स्वच्छ, निळ्या गणवेशातले हसतमुख चेहर्‍याचे बन्सीकाका, साठीला आलेले सर्व सोसायटीत वावरूनही कोणाच्याही लावालाव्या तक्रारी वा नसत्या उठाठेवी करत नव्हते की कधी कशाची तक्रारही करत नसत. बन्सीकाकांचे आणि आमच्या कुटुंबाचे सूर जुळले. हळूहळू चहा प्यायला आम्ही त्यांच्यासाठी थांबू लागलो. चहा पिताना आमच्या गप्पा होत. त्यांना विचारलं, ’‘काय हो, दिवसाला खूप चहा होत असेल ना? एवढ्या घरी जाता मग?” त्यावर हसून फक्त ते एवढंच म्हणाले, ’‘सकाळी घरी चहा घेतो. मग तुमच्याकडे काम झालं . की एका घरी मला पोळी-भाजी देतात, मग काही काम असतं ते झालं की घरी जातो. अधे-मधे काहीच नाही.” मनात आलं, ‘एवढ्या सदनिका, एवढी घरं, इतकी माणसं गडगंज संपत्ती, आपण केलेला कचरा नेण्यासाठी एवढ्या लांबून कोणीतरी रोज नित्यनेमाने आपल्या दाराशी येतंय, साधा कपभर चहा? वाटलं, कलिंगडाची एवढी सालं टाकतो, पिस्त्याची टरफलं फेकतो, रात्री फॅमिली पॅक आणून आईस्क्रीम खातो, त्यातलं वाटीभर किती नि काय, मनात आलं, समाधानी बन्सीकाकांची मात्र कधीच अपेक्षा नसायची नि तक्रार तर त्याहून नाही. सुखी माणसाचा सदरा कुठे आणि कधी गवसला होता त्यांना, हा मला अजूनही पडलेला प्रश्न!

काही वर्षांनी घर बदललं, मात्र ‘तुमचं भाड्याचं नवीन घर स्वच्छ मीच करणार’ हा बन्सीकाकांचा प्रेमाचा आग्रह तो त्यांनी पूर्ण केलाच. आम्हीही खूश झालो, त्यांनाही चार पैसे मिळाले. त्या पुसणार्‍या हातांचा ओलावा आणि प्रेम आमच्या सदैवसोबत राहिले. ते घर साफ करत असतानाच शिवम्माची ओळख झाली. शिवम्मा बर्‍याच लांबून यायची. कित्येकदा तिला वेळेवर बस मिळायची नाही. मग धापा टाकत कशीबशी पोहोचायची. याही सोसायटीत मागच्याचप्रमाणे सारे मात्र त्या तुलनेत लहान सोसायटी पण सारी इमारत चकचकीत करायचं काम तिच्यावर होते. इथेही शिवम्मा हळूहळू चहा प्यायला यायला लागली नि आमच्या घरचीच होऊन गेली. तिचे खाणे काढून ठेवल्याशिवाय घास घशाखाली उतरतच नसे. तिलाही सवय झाली नि आम्हालाही ‘तुम्हारा खाना फुकट जायेगा’ म्हणून सुट्टी घ्यायच्या आदल्या दिवशी, हे सांगायला 2.30 वाजता बेल मारायची. दोन-चार दिवस बाहेरगावी जायचं असले की, तिचा चेहरा उतरायचा. मला आधी कळले नाही, नंतर उमगले, ‘आता आपल्याला भुकेला काहीही मिळणार नाही, या जाणिवेने ती उदास व्हायची. ’आपल्याकडची कोणीही माणसं मला काहीही देत नाहीत, अशी बिनदिक्कत तक्रारही करायची. मधल्या काळात कोरोना आला.तेव्हा तिला सर्वांनी पैसे पाठवले नि काही काळाने ती परत रुजू झाली. पुढे ते घर सोडायचे दिवस जवळ येऊ लागले. तिला तशी कल्पनाही दिली, तर कदाचित खोटं वाटेल, पण तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. ‘अभी मुझपर दया कौन करेगा?’ या प्रश्नाने तिला ग्रासलं होते.

कोरोनाकाळात संपूर्ण जगाला विनामूल्य कोरोनाची लस पुरवून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची पताका जगभर फडकविणारे पंतप्रधान नजरेसमोर आले.नि आपल्याच सेवेसाठी येणार्‍या एका गरीब महिलेची कुचंबणा, पोटासाठीचा संघर्ष मला अस्वस्थ करीत होता. मात्र, माझाही नाईलाज होता. देता येईल, तेवढं तिला देऊन ते घर सोडले.माझ्या संपर्कात एखादेच बन्सीकाका, नाहीतर एखादीच शिवम्मा आली. माझ्या बहिणीची सोसायटी भलीथोरली. स्वच्छतेसाठी 30 महिलांचा तर सुरक्षेसाठी 30 रक्षकांचा चमू. माझी उत्साही बहीण घरी कार्य असावं तसं वर्षातून चार वेळा तरी 30-30 जणांना कधी पावभाजी, कधी मिसळ, कधी वडापाव स्वतः बनवून द्यायची. एकदा लिफ्टमध्ये त्यातली एक ताई भेटली, ‘मी तिची बहीण आहे, हे कळल्यावर, ’‘तुमची ताई देव आहे हो, आमच्यासारख्या गरिबांवर इतकं प्रेम करतात वगैरे सांगू लागली. अगदी आजारी असताना रोज गरम दूध दिले त्यांनी” सारं ऐकून ऊर अभिमानाने भरून आला. सवाष्ण म्हणून स्वच्छता करणार्‍या ताईला अगदी रांगोळी काढून पोटभर पुरणावरणाचं जेवण वाढणारी माझी मैत्रीण डोळ्यासमोर आली. मदत करायला येणार्‍या ताईच्या नावावर लाखभर रुपये ठेवणारी माझी दुसरी सखी आठवली. नवरा दारू पिऊन रोज मारझोड करतो म्हणून पांढरीफटक पडलेली अबोली माझ्या जावेची साहाय्यक. तिला सक्त ताकीद दिलेली आहे, तिचा दुधाचा कप ओव्हनमध्ये असतो, दूध नि पोळी पोटात गेल्याशिवाय, हातात झाडू घ्यायचाच नाही. तिच्या शेजारणीची तर आणखी वेगळी कथा. नोकरीसाठी सकाळी 8 वाजता घर सोडणारी शेजारीण मदतनीस ताईला कावीळ झाली म्हणून महिनाभर रोज मऊ भात, मेतकूट बनवून जाणारी दगडातल्या देवाला पुजणार्‍या भक्तांपेक्षा मला ही मंडळी माणसातले देव-देवता भासतात.

दोन दिवसांपूर्वीच व्याख्यानासाठी एका स्नेह्यांकडे येणे झाले. मुंबईच्या बाहेर! तिथेही मोठी सोसायटी.व्याख्यानाची तयारी करीत असताना, खालून मोठमोठाआवाज येत होता. खिडकीतून खाली पाहिले, सोसायटीची सारी पदाधिकारी मंडळी खुर्च्या टाकून बसली होती. सोसायटीची स्वच्छतादूत उभी होती. अनेक वर्षे काम करणार्‍या तिला कामावरून काढून टाकण्याची ती मिटिंग चालू होती. अर्धा-पाऊण तास होऊन गेला होता. ती प्रौढा उभी राहून हुंदके देत रडत होती न केलेल्या चुकीची माफी मागत होती. जी काही बोलणी चालू होती, त्याच्याशी माझा दुरान्वयेही संबंध नव्हता. परंतु, एकाच गोष्टीची खंत वाटली की, त्या उभ्या असलेल्या ताईला साधी बसायला खुर्ची दिली असती तर? ती वेळेवर कामावर येत नव्हती? स्वच्छ काम करत नव्हती की आणखी काही? पण ती रडत होती. काम सुटल्यामुळे तिच्या आयुष्यातल्या आर्थिक गणितांचा मेळ कसाा बसवायचा हा प्रश्न तिला पडला होता. या कष्टकरी महिलांचे आणि पुरुषांचेही जीवन कधी सुसह्य होईल? एक ना अनेक प्रश्न अस्वस्थ करतात. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करता येईल का? काही प्रशिक्षण देता येईल का? पण हे सगळे प्रत्यक्षात उभे राहण्यासाठी त्यांची आतून इच्छाही हवी. बर्‍याचदा त्यांची इच्छा असली तरीसुद्धा त्यांना वेळ नसतो आणि त्यांची परिस्थितीही नसते. आपण या बांधवांसाठी काय करू शकतो? यावर आता विचारमंथन होणे गरजेचे आहे.

 
- शोभा नाखरे


अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121