संयम, चिकाटी असल्यास यश निश्चित!

    02-Apr-2024
Total Views |
Mahesh Pagar


नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्रा. महेश पगार यांनी एकाचवेळी तब्बल तीन स्पर्धा परीक्षांत बाजी मारुन यशश्री खेचून आणली. त्यांच्याविषयी...
 
’तरुणांना सरकारी नोकरी मिळत नाही’ अशी ओरड सर्वत्र होत असताना केवळ मेहनतीच्या जोरावर नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील प्रा. महेश पगार यांनी एकाचवेळी वनरक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम, तलाठी (नाशिक), विस्तार अधिकारी (जि. प. पालघर) या तीन स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत यश संपादित केले. महेश हे नुकतेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर जिल्हा परिषद येथे रुजू झाले आहेत.महेश यांचा जन्म कळवण येथे 1991 साली झाला. महेश यांचे वडील शेती करतात, तर आई ही गृहिणी. घरची परिस्थिती बेताची असल्याने महेश यांची आईदेखील शेतीत हातभार लावते. महेश यांना दोन भावंडे असून ते घरात मोठे असल्याने साहजिकच त्यांच्यावर जबाबदारीचे ओझे लवकर आले. महेश यांचे प्राथमिक शिक्षण शासकीय जि. प. मराठी शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आर. के एम विद्यालयात झाले. महेश यांना बारावीत चांगले गुण असल्याने त्यांच्यासमोर पुढील शिक्षणासाठी अनेक पर्याय होते. मात्र, महाविद्यालयात पहिल्या वर्षाला असताना शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या ओळखीतील काही जण अधिकारी झाले होते आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेत महेश यांनी अधिकारी होण्याचे ठरवले.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असल्याकारणाने महेश यांनी ‘बी.टेक’ (कृषी अभियांत्रिकी) करण्याचा निर्णय घेतला व कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी तब्बल 80 टक्क्यांसह शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत असतानादेखील त्यांनी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला.त्यानंतर त्यांनी नाशिक येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात एक वर्ष व त्यानंतर नागपूर येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात अभ्यास केला. दरम्यानच्या काळात शिक्षणात कुठलाही खंड पडू न देता, त्यांनी एम.ए मराठी, एम.ए’ अर्थशास्त्र तसेच दोन्ही विषयांमध्ये ‘सेट- नेट’देखील उत्तीर्ण केले व नागपूर विद्यापीठात सुवर्ण पदक मिळवले. दरम्यानच्या काळात, स्वखर्च भागवण्यासाठी जसा वेळ मिळेल तसे ते खासगी शिकवणीमध्ये शिकवायलादेखील जात होते. तसेच वर्षभरापूर्वी मानूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालयामध्ये मराठी विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. तेव्हादेखील त्यांनी विविध परीक्षांचा अभ्यास कोणतीही शिकवणी न लावता सुरूच ठेवला.

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करण्याचा त्यांना खूप फायदा झाल्याचा महेश सांगतात. नागपूर व नाशिक केंद्रात अभ्यासाठी भरपूर ’स्टडी मटेरियल’ उपलब्ध असते व तसेच महाराष्ट्र शासनाकडूनदेखील तिथल्या विद्यार्थ्यांना भरपूर साहाय्य मिळते. यामुळे अभ्यासाला काहीशी गती मिळते. कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला लागले की, आपल्या आजूबाजूची मूलं अभ्यास करताना दिसत. अशात आपसूकच तेथील वातावरणामुळे महेश यांचाही अभ्यास होत असे. अगदी थोड्या गुणांनी यश हुलकावणी देत असल्याने यावेळी मागच्या वेळेपेक्षा अधिक चांगला अभ्यास करू, अशी मनाशी पक्की खुणगाठ त्यांनी बांधली. महेश यांनी आजवर 15 ‘मेन्स’ परीक्षा आणि पाच मुलाखतीही दिल्या. दरम्यान, 2022 साली अभ्यास करताना त्यांच्या अशा पाहण्यात आले की, पोलीस भरतीची तयारी करणार्‍या तरुणामध्ये अगदी परीक्षेचा अर्ज कुठून आणि कसा भरावा, अभ्यासक्रम कोणता आहे, याचेदेखील ज्ञान नसल्याचे लक्षात आले. त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने युट्यूब चॅनलची निर्मिती केली. त्यांचा एकंदरीत प्रवासात जे काही अनुभव, अभ्यास पद्धती असतील त्याचा उपयोग ग्रामीण भागातील तरुणांना होण्यासाठी चॅनल सुरू ठेवणार असल्याचे महेश सांगतात.

“स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यशाचा टक्का फार कमी असून तुम्हाला यश येत नसल्यास आपला अभ्यास आणि मेहनत या दोन्ही गोष्टी कुठेतरी कमी पडत आहेत. त्याचा शोध घेऊन सूत्रबद्ध अभ्यासाचे नियोजन करावे लागते. कोणतीही गोष्ट करायची असल्यास ’संयम’ हा महत्त्वाचा असतो. जर काही खरोखर मिळवायचे असल्यास लाजता कामा नये आणि ते जर मिळाले, तर माजता कामा नये. ’एक ना धड भाराभर चिंध्या’ करण्यापेक्षा ठरावी स्रोतांचाच अभ्यास फायदेशीर ठरतो. असलेल्या अभ्यासक्रमावरून मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा काटेकोरपणे अभ्यास करा. त्याशिवाय या क्षेत्रात यश शक्य नाही. तसेच, कोणतेही कार्य करताना नकारात्मक लोकांपासून व विचारांपासून दूर राहावे, याने उर्जेची बचत होऊन हाती घेतलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने होईल. तसेच आजूबाजूचा असलेले ’मोटीव्हेशनल गुरूं’कडून प्रेरणा घेण्यापेक्षा स्व:तच एक सकारात्मक उर्जेचास्रोत बना व अभ्यासात प्रामाणिकपणे सातत्य ठेवा. अपयश हे पोरकं असून यशाला खूप नातेवाईक असतात. अपयश हे जीवनाचे अविभाज्य अंग असून ते पचवायलादेखील शिकले पाहिजे,” असा मोलाचा सल्ला ते देतात. महेश पगार यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!


गौरव परदेशी