पवारांची धाव बारामतीपर्यंत!

    19-Apr-2024
Total Views |

shard pawar
 
बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला. इतकी वर्षे अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, परंतु कोणालाच या बालेकिल्ल्याला सुरुंग लावता आला नाही. मात्र, यंदा राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या लोकसभा मतदारसंघातील हवा पूर्णतः पालटलेली दिसते. पवारकन्या सुप्रिया सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे चुलत बंधू अजित पवार आता पूर्ण ताकदीने त्यांच्या विरोधात उतरले आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस बारामतीसाठी विशेष मेहनत घेत असल्यामुळे सुप्रिया सुळे यांचा पराभव अटळ असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बिथरलेल्या मोठ्या पवारांनी सगळी महत्त्वाची कामे बाजूला सारून, बारामतीतच तळ ठोकल्याचे दिसून येते. २००९ पासून सलग तीनवेळा सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. पैकी एकाही निवडणुकीत शरद पवारांनी कन्येच्या प्रचाराची कमान स्वतःच्या हाती घेतली नव्हती. सगळी गणिते अजित पवारच जुळवून आणायचे. ना कोणा मोठ्या नेत्याची सभा, ना स्टार प्रचारकाची गरज. आता खुद्द अजितदादाच विरोधात गेल्यामुळे मोठ्या पवारांना घाम फुटला आहे. त्याचे कारणही तसेच. या लोकसभा क्षेत्रातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे, तर दोन काँग्रेसकडे आहेत. परिणामी, एकही आमदार सोबत नसल्यामुळे शरद पवारांना बारामतीतल्या गल्लोगल्ल्या पालथ्या घालाव्या लागत आहेत. एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अशाप्रकारे दारोदारी हिंडण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. पण, कन्यामोहापुढे शेवटी त्यांचाही नाईलाज म्हणायचा!दुसरीकडे, ५० हून अधिक वर्षे राजकारणात अनेकांना धोबीपछाड दिलेल्या आपल्या नेत्याच्या जीवावर निवडून येण्याची भाबडी आशा अनेकजण बाळगून होते. परंतु, तो नेताच बारामतीत अडकून पडल्यामुळे सगळे ’आशावादी’ आतापासूनच पराभवाच्या मानसिकतेत गेल्याचे चित्र जागोजागी दिसते. त्याचवेळी, सदोदित हसतमुख राहणार्‍या ताईंच्या चेहर्‍यावरचे ’निरस’ भावही बोलके आणि भविष्याचे वेध घेणारे आहेत. ’अकेला देवेंद्र क्या करेगा’, याची प्रचिती बहुधा त्यांना आलेली असावी.
 
काँग्रेसचा एकाकी प्रचार
 
नरेंद्र मोदींच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी हातपाय मारणार्‍या ‘इंडी’ आघाडीत एकोप्याचा अभाव पहिल्या टप्प्याच्या मतदानाता पुरेपूर दिसून आला. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आदी पाच मतदारसंघात कालच मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु, निवडणुकीच्या घोषणेपासून प्रचार तोफा थंडावेपर्यंत ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्ष कधीच एकत्र दिसले नाहीत. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील सगळ्या जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शरद पवारच काय, त्यांच्या पक्षातील दुसर्‍या फळीतील नेतेदेखील या मतदारसंघात प्रचाराला फारसे फिरकले नाहीत. त्यामुळे विदर्भात काँग्रेस एकटी पडल्याचे चित्र जागोजागी पाहायला मिळाले. वास्तविक भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यानंतर युती, आघाडीची मोट घट्ट बांधण्यासाठी परस्पर सहकार्याची नितांत आवश्यकता असते. मात्र, ‘इंडी’ आघाडीच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही. महाराष्ट्राचा विचार करता, ठाकरे, पवार आणि काँग्रेसची तोंडे तीन दिशांना. महत्त्वाच्या जागा पदरात पाडून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे मित्रपक्षांना वेळ देत नाहीत, अशी ओरड विशेषतः काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळते. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात सेनेच्या मतदारांना साद घालण्यासाठी ठाकरेंनी एकही सभा घेतली नाही. याउलट स्वपक्षीय उमेदवारांच्या प्रचारार्थ ते स्वतः आणि मुलगा आदित्य दररोज बाहेर पडतात, तर शरद पवार कन्यामोहापायी बारामतीतून पाऊलही बाहेर टाकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ‘महाविकास आघाडीचे शिल्पकार’ अशी ओळख असलेल्या पवारांनी २०१९ मध्ये सत्ता स्थापनेवेळी घेतलेला पुढाकार यावेळी दिसत नाही. सांगलीसारख्या महत्त्वाच्या जागेचा तिढा सोडवण्यातही त्यांनी मध्यस्थी केली नाही. किंबहुना, भिवंडी, वर्ध्यासारखी पारंपरिक जागा सक्षम उमेदवार नसतानाही हट्टाने मागून घेतली. त्यामुळे आधीच नाराज असलेले काँग्रेसगण ठाकरे आणि पवारांच्या ’स्व-केंद्री’ भूमिकेमुळे आणखी निराश झालेले दिसतात. दुसरीकडे, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राज्यभर दौरे करून मतदारांना साद घालू शकेल, असा एकही नेता या घडीला शिल्लक नाही. त्यामुळे राज्यात आधीच नेतृत्वहीन असलेल्या एकाकी काँग्रेसची दिशा पूर्णतः भटकलेली दिसते.

-सुहास शेलार