बदललेली वर्तमान साहित्यवाचनसंस्कृती

    29-Mar-2024
Total Views |
 

sahitya sanskruti 
 
एक काळ होता जेव्हा ग्रंथालयं गर्दीने फुलून गेलेली असायची, ग्रंथालयाच्या पायऱ्यांवर बसून वाचक वाचत असायचे; आता मात्र ही ग्रंथालयंच वाचकांविना ओस पडताना दिसत आहेत. काळाच्या ओघात घडलेला हा बदल सुखावणारा अर्थातच नाही. परंतु ग्रंथालयाकडे पावलं वळत नसली तरी सध्याची वाचनसंस्कृती बदललेल्या स्वरूपात का असेना, अस्तित्वात आहेच हे निश्चित.
कोणत्याही भाषेतील साहित्य हे त्या विशिष्ट भाषक समाजाचे भरणपोषण करण्यास उपयुक्त ठरत असते. त्यामुळे मराठी साहित्याबाबत सध्याच्या मराठी भाषक समाजाचा नेमका काय दृष्टिकोन आहे हे जाणून घेण्यासाठीच मी ‘वर्तमान मराठी साहित्यवाचनसंस्कृतीचा अभ्यास’ हे संशोधन केलं. आताचा काळ नवमाध्यमांनी व्यापून टाकलेला काळ आहे. समाजातल्या सर्वच लहानमोठ्या घटकांनी नवमाध्यम अर्थात इन्स्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इत्यादी अनुसरायला सुरुवात केली आहे. बदललेली जीवनशैली देखील साहित्यवाचनसंस्कृतीवर परिणाम साधताना आपल्याला दिसते. ज्ञानार्जन ही गरज बहुतांशवेळी तंत्रज्ञानस्नेही नवमाध्यमांच्या आधारे पूर्ण केली जाते. विद्यार्थीही माहितीचं महाद्वार म्हणून आंतरजालाकडे पाहतात. ग्रंथालयांना ज्ञानाचे महाद्वार म्हणून पाहण्याच्या दृष्टिकोनाचाच अभाव इथे लक्षात येतो.
 
पुस्तकं हातात प्रत्यक्ष घेऊन वाचणं, काहीवेळेस ती मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबच्या माध्यमातून वाचणं, पुस्तकांचं वाचन न करता ती ऑडिओबुक स्वरूपात उपलब्ध असल्याने ऐकणं अशा विविध प्रकारे हल्ली साहित्याचे वाचन सुरु असतं. उपरोक्त सगळ्या प्रकारात पुस्तकांचं प्रत्यक्ष वाचन ते विविध माध्यमांतलं वाचन असा बदल लक्षात येतो. तसंच साहित्य म्हणजे केवळ पुस्तकच का ? असा प्रश्नही सध्याच्या आणि येणाऱ्या काळात विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कारण आता समूह माध्यमांच्या आधारेही अभिव्यक्ती घडत असते. ह्यात ब्लॉग आणि फेसबुकवरच्या लिखाणाचाही समावेश होतो. माध्यमांवरचे लिखाण आणि त्यांचे वाचन करणारा वाचकवर्ग हाही बदललेल्या साहित्यवाचनसंस्कृतीतला महत्त्वाचाच घटक आहे, त्यामुळे ह्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
त्यामुळे ह्या तंत्रज्ञानयुगातल्या वर्तमान साहित्यवाचनसंस्कृतीचा अभ्यास करताना माझ्या हाती जे काही वाचनविषयक निष्कर्ष आले त्यामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो आहे. ग्रंथालयात पुस्तकवाचनाचं प्रमाण अतिशय कमी आहे. अपुरा वेळ, डिजिटल वाचन, ग्रंथालयांची अनुपलब्धी वा कमतरता, ग्रंथालयातील कठोर/जाचक नियम, वाचनाला महत्त्व नसणं, वाचनाची अपुरी प्रेरणा ही ग्रंथालयात वाचन न होण्यामागची कारणं आहेत. मराठी वाचक कथनात्म साहित्य अधिक वाचतात तर लोकप्रिय पुस्तकांपेक्षा विविध लेखक-कवींची पुस्तकं तुलनेनं अधिक वाचतात. शिवाय अधिक प्रमाणात पुस्तकवाचनाची सुरुवात बालवयात होत नसून किशोरवयात होते. तंत्रज्ञानाचा वाचनावर वाईट परिणाम होतो असं वाचकांना वाटत असून वाचक प्रत्यक्ष पुस्तकवाचनालाच अधिक प्राधान्य देतात. बहुतांश व्यक्तींचा सलग वाचन करण्याचा कालावधी हा केवळ १-२ तास इतका आहे. तसंच मराठी वाचकांनीच वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी विविध प्रयत्न राबवण्याची गरज व्यक्त केली आहे.
 
आजच्या युगात वाचनाची गोडी लावण्यासाठी नेमकं काय प्रयत्न व्हायला हवेत याबद्दल विचार होताना पुढील बाबी लक्षात घेता येतील. ‘श्राव्य माध्यमांचा वापर पुस्तकं ऐकवण्यासाठी व्हावा, समीक्षा अधिक चांगली केली जावी, पुस्तक परीक्षणाआधारे पुस्तकं पोहचवावीत, पुस्तकांच्याबाबत विपणन तंत्र (Marketing) अधिक चांगल्या पद्धतीने वापरलं जावं, समूह माध्यमांआधारे पुस्तकं पोहचवावीत, शालेय वयात साहित्यिक कार्यक्रमांची ओळख व्हावी, वाचनाचा तास वर्गांमध्ये असावा, वाचकांचे गट (Reading Club) तयार व्हावेत, वाचनालयं-ग्रंथालयं वाढवावीत, ग्रंथालयांना भेट देण्याचे उप्रकम करावेत, सर्व ज्ञानशाखांत साहित्याचा अभ्यास असावा, बोलीतील साहित्याला वाव मिळावा, ग्रंथालयं डिजिटल व्हावीत, अनुवादांना प्राधान्य दिलं जावं, वस्तीपातळीवर ग्रंथालयं, गाव तेथे ग्रंथालय, बुक इन बॉक्स उपक्रम करावेत’,अशा प्रकारचे प्रयत्न वाचनसंस्कृती रुजण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. प्राध्यापक, शिक्षक, संशोधक ह्या तज्ज्ञांनीही‘तंत्रज्ञान स्वीकारून श्राव्यपुस्तकांचा वापर करायला हवा, किंडलसारख्या माध्यमांतून विविध पुस्तकं वाचता येऊ शकतात, पालकांची महत्त्वाची जबाबदारी असून त्यांनी मुलांना वाचून दाखवलंच पाहिजे, बालसाहित्य निर्माण होताना मोठी अक्षरं, जास्तीतजास्त रंग ह्या दृष्टीने विचार व्हायला हवा, ग्रंथपालांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे आकर्षित करायला हवं, अभिवाचनाचे उपक्रम होऊन चांगलं वाचन ऐकण्यानेही वाचन रुजवता येईल, लेखक भेट उपक्रम असावेत, वाचनासाठी विविध अभ्यासगट असावेत’, असे विविध प्रयत्न वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी केले जाऊ शकतात असं म्हटलं आहे.
 
विविध ग्रंथपालांनीही ग्रंथालयांकडे दिवसेंदिवस होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधलं. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची चर्चा आपल्या वर्तमानपत्रात वाचायला मिळते पण ग्रंथालयांनी आत्महत्या केलेल्या आहेत ह्याची चर्चा आपल्या पुढे सहसा येत नाही,’ ग्रंथसखा ग्रंथालयाच्या श्याम जोशी सरांचं हे विधान लोप पावत चाललेल्या ग्रंथालयसंस्कृतीचंच निदर्शक आहे. काही प्राध्यापकांनी त्यांच्या लक्षात आलेली विद्यार्थ्यांची वाचनविषयक भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना वाचनाचं महत्त्वच उमगलेले नाही हे स्पष्ट केलं. वाचनसंस्कृती रुजवणाऱ्या ग्रंथपाल सुषमा पौडवाल ह्यांनी ‘वाचनशिक्षणा’ची गरज व्यक्त केली. संशोधनादरम्यान सर्वच तज्ज्ञांनी वाचनसंस्कृतीविषयी समाजाचा सध्याचा निराशाजनक दृष्टिकोन व्यक्त करतानाच विविध पातळ्यांवर बदललेली वाचनसंस्कृतीही अधोरेखित केली. पण असं असलं तरीही 'वाचनसंस्कृतीनेच माणूस घडणार आणि त्यानेच मनं समृद्ध होणार त्याला पर्याय नाही…दुसरा काहीही !’ ह्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, संदर्भ विभागाच्या कार्यवाह उमा नाबर ह्यांच्या विधानाप्रमाणे वाचनसंस्कृती बदललेली असली तरी तिला दुसरा पर्याय नाहीच, हे निश्चित.
 
वाचनाबाबतचा विचार आज जसा होतो आहे तसाच तो उद्याही कायम राहील, याची खात्री नाही. त्यामुळे ‘वर्तुळे पूर्ण होत असतातच’ या उक्तीप्रमाणे कालची बहरलेली वाचनसंस्कृती उद्या पुन्हा अस्तित्वात येईलही; ह्या आशेवर राहायला हरकत काय?
 
-वनश्री राडये, मुंबई
७०४५१००४५९