साहित्य अकादमीच्या माध्यमातून साहित्य साधकांचा सन्मान!

युवा लेखक प्रदीप कोकरे,कवी सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर!

    19-Jun-2025
Total Views |

Untitled design (13)

मुंबई : साहित्य विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा दि. १८ जून रोजी करण्यात आली. यंदा कवी सुरेश सावंत यांच्या 'आभाळमाया' या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला असून, युवा लेखक प्रदीप कोकरे यांच्या ' खोल खोल दुष्काळ डोळे' या पहिल्यावहिल्या कादंबरीला जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीच्यावतीने यंदा २४ भाषांसाठीचे ‘बाल साहित्य पुरस्कार’ आणि २३ भाषांसाठीचे ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या २०२५ या वर्षासाठी युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लेखक प्रदीप कोकरे यांची ' खोल खोल दुष्काळ डोळे' या कादंबरीच्या माध्यमातून महानगरात राहणाऱ्या तरुण पिढीच्या भावविश्वाचा आढावा घेण्यात आला आहे. जीवनातील निरर्थकता, त्यातून उद्भवलेला संघर्ष, यांच्या समर्थशाली चित्रण या कादंबरीत उमटलेले आहेत. कवी सुरेश सावंत यांनी मागची ४० वर्ष बाल साहित्य क्षेत्रात काम केलेले आहे. बालसाहित्याची ३० हून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुरेश सावंत म्हणाले की माझ्यापुरती असलेली ही माझी आनंदयात्रा आहे. या बालसाहित्यानं मला खूप यश दिलं आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 3 पुरस्कार, तसेच 3 वेळा मला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. बालसाहित्याचा ताल आणि तोल सांभाळला गेला तरच ते साहित्य बालवाचकांच्या पसंतीला उतरते. तो ताल आणि तोल मी सांभाळत बालसाहित्य लिहिण्याचा प्रयत्न केल्यामुळे माझं साहित्य बालवाचकांच्या पसंतीस उतरत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.