मुंबई : मराठी साहित्य विश्वात वन्यजीवान, जंगलातील प्राणीजीवन बारकाईन टिपणारे मारुती चितमपल्ली यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सोलापुर येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्यासाठी ३० एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात ३६ वर्ष सेवा केली. संशोधकवृत्तीने भटकंती करताना त्यांनी ५ लाख किलोमीर पेक्षा जास्त प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना १५ हून अधिक भाषांचे ज्ञान होते. चितमपल्ली हे पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक,पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सालिम अली, नरहर कुरुंदकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी. दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.
मारुती चितमपल्ली यांच्यामुळे मराठीमध्ये वेगळी हिरवी वाट निर्माण झाली : मिलिंद जोशी
मारुती चितमपल्ली यांच्या निधनावर प्रक्रिया देताना, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले की " मारुती चितमपल्ली यांचे आपल्यातून निघून जाणे अत्यंत वेदनादायी आहे. त्यांनी मराठी साहित्यामध्ये निसर्ग चित्रणाची वाट निर्माण केली. त्यांचे संबंध लेखक वाचत असताना आपण रानातून वनातून जंगलातून फिरतो, पशुपक्षी प्राणी आपल्याशी संवाद साधतात असा आपल्याला भास होत होता. अतिशय ललितरण्य अशी त्यांची शैली होती. म्हणजे अभ्यास आणि व्यासंगाला शैलीची जोड देऊन त्यांनी जे काही लेखन केलं. त्यामुळे मराठीमध्ये एक वेगळी हिरवी वाट त्यांच्या लेखन आणि निर्माण झाली."
ऋषितुल्य व्यक्तिमत्व गमावले : सुधीर मुनगंटीवार
मारुती चितमपल्ली यांच्या निधनावर प्रक्रिया देताना माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की " मारुती चितमपल्ली यांच्या निधनामुळे आपण एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व गमावले आहे. ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात, तिथे काम करणाऱ्या अभ्यासकांची संख्या दुर्मीळ आहे. त्यांच्या इतक्या गाढ्या अभ्यासकाने आपल्यातून निघून जाणे हे मनाला चटका लावणारे आहे. ही हानी पुढचा अनेक काळ भरुन निघणारी नाही.