सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे १०० पर्यटन स्थळांवर साजरा केला जाणार आंतरराष्ट्रीय योग दिन!

    20-Jun-2025
Total Views |

culture

नवी दिल्ली : २१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे  साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
दि. २१ जून हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. सलग ११ व्या वर्षी भारत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो आहे. या योग दिनाच्यानिमित्ताने जागोजागी योग साधनेच्या शिबिरांचे आयोजन केले जाते. योगसाधना, त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे याबद्दल तज्ञ लोकांना मार्गदर्शन करतात.

'या' प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आंतररष्ट्रीय योग दिन
भारतामध्ये असलेल्या युनेस्को जागतिक वारसा स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. यामध्ये चरैदेव मैदम (आसाम), राणी की वाव आणि धोलाविरा (गुजरात), हम्पी आणि पट्टाडकल (कर्नाटक), खजुराहो स्मारक समूह आणि सांची स्तूप (मध्य प्रदेश), कोणार्क (ओदिशा) येथील सूर्य मंदिर, एलिफंटा लेणी (महाराष्ट्र) आणि तंजावर (तामिळनाडू) येथील बृहदेश्वर मंदिर या स्थळांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोवळकोंडा किल्ला आणि सालारजंग संग्रहालय (हैदराबाद), हुमायूनचा मकबरा, पुराना किल्ला आणि सफदरजंग मकबरा (दिल्ली), जालियनवाला बाग (अमृतसर), चित्तोडगड आणि कुंभलगढ किल्ले (राजस्थान), लेह पॅलेस (लडाख), परी महल (श्रीनगर), बेकल किल्ला (केरळ), आणि हजारदुआरी आणि कूचबिहार पॅलेस (पश्चिम बंगाल) यासारख्या इतर काही प्रमुख सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचाही यात समावेश आहे.