मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील संदेशखाली हे गाव हिंदूंवरील अन्याय, अत्याचार आणि अनाचाराच्या निमित्ताने चर्चेच्या केंद्रस्थानी आले. बातम्या, लेख, अग्रलेखांतूनही ‘संदेशखालीचे सत्य’ दै. ‘मुंबई तरुण भारत’ने वारंवार वाचकांसमक्ष मांडले. पण, हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित नाहीच. नुकत्याच समोर आलेल्या सत्यसोधक समितीच्या अहवालातूनही संदेशखालीशी संबंधित आणखीन काही मन विषण्ण करणार्या बाबी समोर आल्या आहेत. त्याचेच मांडलेले हे भीषण वास्तव...
संदेशखाली पश्चिम बंगालच्या सुंदरबन क्षेत्रातील एक छोटेसे बेट. बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बसीरहाट लोकसभा मतदारसंघात संदेशखाली विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. सुंदरबनसारखा दुर्गम प्रदेश आणि बांगलादेशसोबत लागून असलेल्या सीमेमुळे बेकायदेशीर घुसखोरी, बनावट चलनी नोटांची तस्करी यांसारख्या घटनांमुळे उत्तर २४ परगणा जिल्हा हा तसा कूप्रसिद्ध. संदेशखाली ज्या कालिंदी नदीच्या काठावर वसलेले आहे, तो मार्गही बांगलादेशातून होणार्या घुसखोरीचे एक प्रवेशद्वार. पण, तरीही हा भाग माध्यमांमध्ये आणि देशाच्या राजकारणात फारसा कधीच चर्चेत नसतो. पण, दि. ८ फेब्रुवारी रोजी संदेशखालीतील जेलियाखली या गावातील काही महिला हातात झाडू आणि काठ्या घेऊन अचानक रस्त्यावर उतरल्या. त्यांनी तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शेख शाहजहान आणि त्याचा साथीदार शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्याविरोधात जमीन बळकावल्याचा आणि लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला.
महिलांच्या या आरोपानंतर पश्चिम बंगाल सरकारने याची खरं तर तातडीने दखल घ्यायला हवी होती. पण, पोलिसांनी या प्रकरणात कोणतेही पाऊल उचलले नाही. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी गावातील असाहाय्य नागरिकांना घाबरवून, त्यांच्या जमिनी हडप केल्या. या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येऊन, पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली असता, त्यांनी या नतद्रष्टांविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांनाच मारहाण करण्यात आली. एकूणच काय तर, मागील १३ वर्षांपासून बंगालमधील तृणमूलच्या विद्यमान राज्य सरकारच्या छत्रछायेखाली, आपली राजकीय ताकद वापरून, हे लोक आपल्या लोकांवर अन्याय करत होते.
शाहजहानचे कूकर्म
महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपण्याव्यतिरिक्त शाहजहानवर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. शाहजहानने उत्तर २४ परगण्यातील संदेशखालीपासून दक्षिण २४ परगण्यातील मालंचपर्यंत आपला बेकायदेशीर धंदा विस्तारला. मेंढ्या, वीटभट्ट्या, वाहतूक आणि भाजीपाला सिंडिकेट यांसह विविध क्षेत्रांतील बेकायदेशीर कामांमध्ये गुंतल्यामुळे, शाहजहान या भागातील तृणमूल पक्षाचा कुख्यात नेता म्हणून नावारुपास आला. २०११ मध्ये तृणमूल सरकार सत्तेवर आल्यापासून, त्याच्या कारवाया अधिकच वाढल्या. त्याचे साथीदार उत्तम सरदार, शिबू हाजरा आणि घियासुद्दीन गाझी यांनी सामान्यांवर प्रचंड अत्याचार केले. स्थानिकांकडून जबरदस्तीने जमीन ताब्यात घेतली. एवढेच नाही तर ती जमीन स्वतःच्या नावावर केली. निर्दयी अत्याचार करणार्यांनी जबरदस्तीने लोकांच्या घरात घुसून, त्यांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. गावातील गृहिणींना रात्रीअपरात्री विविध कामांच्या बहाण्याने पक्ष कार्यालयात बोलावून, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. अनेक महिलांवर सामूहिक बलात्कार झाले. शेख शाहजहान व त्याचे दोन साथीदार गेल्या अनेक दिवसांपासून गावातील असाहाय्य लोकांवर अत्याचार करत होते. ग्रामस्थांच्या जमिनी मासेमारी व शेतीसाठी त्यांनी बळकावल्या. ज्या जमिनीवर वर्षातून दोनदा भात पीक घेतले जात होते, तेथे शाहजहान आणि त्याच्या साथीदारांनी खारे पाणी सोडून, मत्स्यपालन करण्यास सुरुवात केली.
एवढेच नाही तर सत्तेचा गैरवापर करत, अनेक दिवसांपासून जंगलातील झाडे तोडून, वनविभागाची जमीन कोट्यवधी रुपयांना विकली आणि आश्चर्य हेच की, यापैकी कुठल्याही दुष्कृत्याविरोधात त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे कमी की काय म्हणून, शेख शाहजहान आणि त्याचे सहकारी गेल्या आठ वर्षांपासून रोहिंग्या मुसलमानांना घरे बांधण्यासाठी मदत करत होते. त्यांच्यामार्फतच शाहजहानने समाजविघातक आणि विविध गुन्हेगारी कारवायांचा काळा धंदा आणखीन विस्तारला. इतकेच नव्हे तर शाहजहान आणि त्याच्या साथीदारांनी गावोगावी हिंदूंना संपवण्याचा यथोचित प्रयत्न आरंभला. शाहजहानचा भाऊ (सियाजुद्दीन शेख) आणि त्याच्या इतर सहकार्यांनी ब्लॉक क्रमांक-१ आणि २ मधील अनेक स्थानिकांच्या जमिनी जबरदस्तीने त्यांच्या नावावर नोंदवल्या. सध्या सुमारे ८०० बिघा जमीन त्यांच्या ताब्यात घेतली. त्यापैकी १४६ बिघे जमीन शाहजहानच्या भावाच्या (सियाजुद्दीन शेख) नावावर होती. एवढा सगळा अत्याचार होत असतानासुद्धा या भागातील अशिक्षित, धर्मांध, जिहादींमध्ये शेख शाहजहान मात्र लोकप्रिय होता.
संदेशखालीच्या ’कसाई’चा उदय...
शाहजहानने २००३ मध्ये राजकारणात प्रवेश केला. आपल्या राजकारणाची सुरुवातच त्याने डाव्यांच्या ’माकप’मधून केली होती. शाहजहानचे काका मुस्लीम शेख हा सुद्धा ’माकप’चा नेता. ’माकप’कडूनच तो पंचायत प्रमुख म्हणूनसुद्धा निवडून आला होता. असा हा शेख शाहजहान राजकारणात आल्यापासूनच, त्याच्यावर प्राणघातक हल्ले आणि खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा या क्रूरकर्मा शाहजहानचा उदय हा डाव्या विचारसरणीच्या विषारी मानसिकतेतूनच झाला. तेव्हापासून त्याच्या अशा समाजविघातक कारवायांना राजकीय अभय मिळत गेलेे आणि शाहजहान स्वत:ला संदेशखालीचा निर्विवाद शहेनशाहच समजू लागला.
’ईडी’ची धाड, कसाई फरार!
शाहजहान आणि त्याचे सहकारी सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्याने गावातील असाहाय्य लोकांवर अनेक दिवसांपासून अत्याचार करत होते. या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याची मुभा गावकर्यांना नव्हती. सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने शाहजहान आणि त्याच्या सहकार्यांनी पोलिसांवर आपला वचक ठेवला होता. कोणाचीही त्याला हात लावण्याची हिंमत नव्हती. पण, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक रेशन घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, शाहजहान शेख यांच्या संदेशखाली निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी दाखल झाले होते. शाहजहान हा बंगालमधील रेशन घोटाळ्यात सध्या तुरुंगाची हवा खात असलेले बंगालचे अन्नपुरवठा मंत्री जोतिप्रिया मल्लिक यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. मल्लिक आणि शाहजहान यांनी संगनमताने रेशनचे तांदूळ आणि गहू बेकायदेशीरपणे विकल्याचा आरोप आहे. याचं रेशन घोटाळ्याच्या चौकशीसाठी ’ईडी’चे पथक संदेशखालीतील शाहजहानच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी ‘ईडी’च्या अधिकार्यांवरही शाहजहानच्या समर्थकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ‘ईडी’चे काही अधिकारी गंभीर जखमी झाले आणि त्या दिवसापासूनच शाहजहान शेख फरार झाला.
ममता सरकारचा नाकर्तेपणा
शाहजहान फरार झाल्यानंतर, दि. ३१ जानेवारीपासून कर्नाखालीतील लोक त्यांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी, सरकारी कालवे वापरण्याच्या अधिकारासाठी आंदोलन करत होती. संदेशखालीचा तृणमूल नेता शाहजहान आणि त्याचे दोन मुख्य साथीदार या जमिनीवर वर्षानुवर्षे कब्जा करून, भाड्याचे पैसे देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यांनी आपल्या जमिनीचा हक्क मिळवण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू केले, ते आंदोलन थांबवण्यासाठी शेख शाहजहान, शिबू हाजरा, उत्तम सरदार आणि लल्टू घोष यांनी संदेशखाली पोलीस प्रशासनाच्या मदतीने गावकर्यांवरच भ्याड हल्ला घडवून आणला. दि. ६ फेब्रुवारी रोजी संदेशखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमोहिनीमध्ये तृणमूलने बैठक घेतली. या बैठकीत कर्नाखालीच्या आंदोलकांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला. ही बातमी गावकर्यांच्या कानावर पडताच, स्वरक्षणासाठी गावातील महिला काठ्या, झाडू घेऊन मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर तुषाखाली, जेलियाखाली, खुलना, हातगचा येथून सशस्त्र हल्लेखोरांनी एकत्र येत, संदेशखाली फेरी घाटात ग्रामस्थांवर हल्ला केला. पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामस्थांवर काचेच्या बाटल्या आणि सिडच्या बाटल्या फेकण्यात आल्या. काही ग्रामस्थ जखमी झाले. असाहाय्य ग्रामस्थांनी संघटित होऊन, संदेशखाली पोलीस ठाण्याला घेराव घालून निषेध व्यक्त केला. तृणमूल नेते शाहजहान, शिबू हाजरा, उत्तम सरदार, लल्टू घोष यांना अटक करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. पण, याउलट पोलिसांनी असाहाय्य ग्रामस्थांवर अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कृष्णप्रसाद लैय्या हे ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. यानंतर संदेशखाली ठाण्याभोवती निदर्शने सुरू झाली. ग्रामस्थांच्या दबावामुळे अखेर पोलिसांनी उत्तम सरदार यांच्यासह दोघांना अटक केली आणि उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगून पोलीस-प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना शांत केले. दुसरीकडे एका वृत्तानुसार, गुरुवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांना कळले की, पोलिसांनी उत्तम सरदारला अटक न करता, भरत दास आणि पालन सरदारला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. गावकर्यांना ही फसवणूक लक्षात आल्यानंतर, त्यांचा संताप झाला.
शाहजहानच्या पाशवी कृत्याचा निषेध
संतापाचे रुपांतर दि. ८ फेब्रुवारीच्या महिला आंदोलनाच्या रुपात झाले. या आंदोलनाची दखल देशातील समाजमाध्यमांनी प्रामुख्याने घेतली. दिवसेंदिवस अत्याचार सहन करणार्या असाहाय्य पीडितांनी त्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून, आंदोलन करण्यास सुरुवात केली. संदेशखाली येथील वंचित आणि शोषितांनी शाहजहान आणि त्याच्या सहकार्यांविरुद्ध निदर्शने केली. गावकर्यांनी जमीन परत हवी, या मागणीसाठी जंगल मौजा पोलीस ठाणे आणि दरी येथील बीडीओ कार्यालयात निदर्शने केली. डाव्या आघाडीच्या सरकारने संदेशखाली विधानसभा क्षेत्रात आदिवासी व इतर घटकांना पट्टा, बरगाचे हक्क दिले होते, त्या जमीन बळकावण्याचे काम शाहजहानच्या गुंडांनी केले. उत्तम सरदारने आदिवासींना दरीच्या जंगल परिसरात मासेमारी करण्यापासून रोखले. गावकर्यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार करूनही, उपयोग झाला नाही. सर्व काही असतानाही वन विभाग, बीडीओ आणि पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प असून, आता आंदोलनामुळे उघडकीस आलेले सर्व अन्याय-अत्याचार राज्य सरकार जाणूनबुजून दडपत आहे. शेख शाहजहान आणि त्याच्या साथीदारांनी दिवसाढवळ्या लोकांवर अत्याचार केले. लोकांवर होत असलेल्या अत्याचाराची सर्व माहिती असूनही सत्ताधारांच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच संदेशखालीतील महिलांच्या रोषाचा उद्रेक झाला. शोषित, पीडित वंचितांविरुद्धच्या प्रतिकाराचा संदेश खेड्यापाड्यातून शहराच्या गल्ल्यांपर्यंत पोहोचला. शाहजहान गेल्या तीन वर्षांपासून गावातील महिलांना मध्यरात्री १२ वाजल्यानंतर पक्ष कार्यालयात बोलावत असे. कुणी महिला गेली नाही तर तिला मारहाण करून, जीवे मारण्याची धमकीही दिली जात असे. पण, आता या अन्यायाविरुद्ध संदेशखालीच्या महिलांनी आवाज उठवला. दि. ९ फेब्रुवारीला संदेशखालीतील महिलांनी शिबू हजाराच्या ठिकाणांना आगीच्या हवाली केले. अन्यायाविरुद्ध संदेशाखालीतील महिलांचा हा उठाव संपूर्ण देशाने पाहिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता तरी शाहजहान आणि त्याच्या सहकर्यांवर कारवाई करतील, अशी आशा होती. पण, ती फोल ठरली.
आम्हाला ममतांवर विश्वास नाही!
सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंदबोस यांनी संदेशखालीच्या महिलांची भेट घेतली. या भेटीत महिलांनी राज्यपालांना शेख शाहजहान आणि त्याच्या सहकार्यांकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराची सविस्तर माहिती दिली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींची तिथे उपस्थिती होती. यावेळी पीडितांनी ममतांवर विश्वास नसल्याची भावनासुद्धा राज्यपालांकडे व्यक्त केली. ममता सरकारवर लोकांचा आणि विरोधी पक्षांचा दबाव वाढत होता. या दबावापुढे झुकत, दि. १३ फेब्रुवारीला बंगाल सरकारने डीआयजी सीआयडीच्या नेतृत्वाखाली राज्य महिला आयोगाने आंदोलक महिलांची चौकशी केली. दुसर्याच दिवशी पोलिसांनी एकाही महिलेवर बलात्कार झाला नाही, कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नाही, असा दावा केला. पण, बंगाल पोलिसांच्या दाव्यांवर कोणीही विश्वास ठेवला नाही. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेतृत्वात दि. १३ फेब्रुवारीला पोलीस कार्यालयाचा घेराव घालण्यात आला. या आंदोलनावर पोलिसांनी अंदाधुंद लाठीचार्ज केला. सामान्य जनता आणि भाजप समर्थकांवर दगडफेक करण्यात आली. शाहजहान आणि त्याच्या सहकार्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. या व्यतिरिक्त शाहजहानच्या कार्यकर्त्यांनी पीडितेच्या घरांना आग लावली. संदेशखालीमध्ये बंगाल सरकारने ’कलम १४४’ लागू केले. महिला संरक्षण आयोग, अनुसूचित जाती आयोगालाही संदेशखालीत प्रवेश दिला गेला नाही. एवढेच नाही तर पटना उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एल. नरसिंहा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय स्वतंत्र सत्यशोधन समितीलाही संदेशखालीला जाण्यापासून पोलिसांनी रोखले. अखेरीस त्यांनीही कोलकाता उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर, त्यांना संदेशखालीला भेट देण्याची परवानगी देण्यात आली. तसेच बंगालच्या विरोधी पक्षनेत्याला सुद्धा संदेशखालीमध्ये जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. संदेशखालीमध्ये जाण्यासाठी विरोधी पक्षनेत्याला कोलकाता उच्च न्यायालयाकडून परवानगी आणावी लागली. यावरून आपल्याला तेथील भीषण परिस्थितीची जाणीव व्हावी.
चोराच्या उलट्या बोंबा!
संदेशखालीच्या कसाईला शिक्षा करायची सोडून, देशातील सध्या एकमेव महिला मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांनी निर्लज्जपणे विधिमंडळात पीडित महिलांना ‘विरोधी पक्षाच्या हस्तक’ म्हणून संबोधले. महिला खरं बोलत असतील, तर त्यांनी आपले तोंड का झाकले? असा अमानवीय आणि पीडित महिलांचा अपमान करणारा प्रश्नही ममतांनी उपस्थित केला. आपल्या नाकर्तेपणाला आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेल्या अपयशाला संघाच्या शाखांना जबाबदार धरले. पण, वस्तुस्थिती ममतांच्या दाव्यांच्या उलट आहे. संदेशखाली विधानसभेवर १९७७ ते २०१६ पर्यंत डाव्या पक्षाचा आमदार होता. २०१६ पासून तृणमूलचे सुकुमार महतो येथे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात एकदाही भाजपचा आमदार निवडून आलेला नाही. बशीरहाट लोकसभा मतदारसंघाची सुद्धा हीच अवस्था. लोकसभा निवडणुकीतही भाजपला येथे कधीही विजय मिळाला नाही. राहिली गोष्ट संघाची, तर एकेकाळी संदेशखालीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध उपक्रम राबविले जात होते. पण, गेल्या दोन दशकांत शाहजहानच्या उदयानंतर या भागात हळूहळू संघाच्या शाखा कमी होऊ लागल्या. संलग्न संघटनांपैकी फक्त विश्व हिंदू परिषदेचे काम ब्लॉक क्रमांक-१ मध्ये आहे, बाकीच्या ठिकाणी संघाचे किंवा त्याच्याशी संलग्न संघटनांचे असे कोणतेही काम नाही. अनेक स्वयंसेवक आहेत; पण ते शाहजहान आणि त्याच्या साथीदारांच्या भीतीने कोणतेही काम करू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती ममतांना माहीत असूनही, केवळ नाचक्की टाळण्यासाठी, असे उलटसुलट आरोप त्या करत आहेत.
आणखी किती संदेशखाली?
बंगालमध्ये कायदा- सुव्यवस्था राखण्यात ममतांना आपले अपयश लपवणे आता केवळ अशक्य आहे. संदेखाली फक्त चर्चेत आली आहे. अशा किती संदेशखाली बंगालमध्ये असतील, हे सांगणे कठीण. २०१९ मध्ये ‘गाव कनेक्शन’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात, पश्चिम बंगालमधील ७२.९ टक्के महिलांनी बंगालमध्ये कोणत्याही वेळी घराबाहेर पडणे असुरक्षित असल्याचे मान्य केले होते. हा आकडा देश पातळीवर सर्वाधिक आहे. ज्या राज्याची मुख्यमंत्री एक महिला आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट निश्चितच लाजिरवाणी. पण, सत्तेसाठी ममताबानोंनी सगळेच बासनात गुंडाळून ठेवले आहे.
-श्रेयश खरात
(वरील लेख हा ’विश्व संवाद केंद्रा’ कडून प्राप्त झालेल्या ‘सत्यशोधन समिती’च्या अहवालावर आधारित आहे.)