डॉ. वीणा देव यांचे निधन!

    30-Oct-2024
Total Views | 31
 
veena dev
 
प्रसिद्ध साहित्यिका डॉ. वीणा देव यांचं अल्पशा आजाराने मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी निधन झाले आहे. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. 
 
वीणा देव यांचा जन्म १९४८ साली झाला होता. साहित्याचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले होता. प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या त्या कन्या होत्या. कादंबरी, कथा, चरित्र, निबंध असे अनेक साहित्यप्रकार समृद्धपणे हाताळणाऱ्या आणि स्वैर मनस्वी भ्रमंतीतून व निसर्गाच्या सहवासातून मिळविलेले विविध जीवनानुभव आपल्या लिखाणात रसाळपणे मांडणाऱ्या गोनींदाच्या साहित्याचा वसा त्यांची कन्या वीणा देव यांनी बालवयातच हाती घेतला होता. त्यांच्या घरातच त्यांचावर मराठी भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले होते. १९६७ मध्ये त्यांचा विवाह डॉ. विजय देव यांच्याशी झाला. त्यांना मृणाल आणि मधुरा या दोन मुली आहेत.
 
आयुष्यातील खूप मोठा काळ त्यांनी मराठी भाषा आणि साहित्याची सेवा करण्यात घालवला. लेखन, संपादन, अभिवाचन अशा सर्व क्षेत्रांना त्यांचा परीस्पर्श झाला होता. ‘मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे’ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. संपादन केली होती. मराठी भाषेचे आणि साहित्याचे अध्ययन तर केलेच पण आपली भाषा, आपल्या भाषेतील साहित्य त्यांनी अध्यापकाच्या भूमिकेतून तरुणपिढीपर्यंत पोहोचवलेसुद्धा. शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी जवळपास बत्तीसवर्षे अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने त्या भाषेतील गोडवा समजावून सांगायच्या. शिक्षिका ते विभागप्रमुखाच्या भूमिका त्यांनी शाहू मंदिर महाविद्यालयात पार पाडल्या. ३२ वर्ष अध्यापकाची भूमिका पार पाडल्या नंतर, अनेक पिढ्या आपल्या हाताखालून घडवल्यानंतर, अनेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आणि मराठी साहित्याची गोडी लावल्यानंतर त्यांनी मराठी विभागाच्या विभागप्रमुख म्हणून शाहू मंदिर महाविद्यालयातून निवृत्ती घेतली.
 
आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी बरीच पुस्तक लिहिली आणि संपादित केली. ‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, स्वानसीचे दिवस हे त्यांचे काही गाजलेले प्रसिद्ध लेखसंग्रह आहेत. त्यांचे स्वानसीचे दिवस हा लेखसंग्रह त्यांच्या इंग्लंडमधील अनुभवांवर आधारित आहेत. स्वान्सी हे इंग्लंडमधील एक सुबकस गाव आहे. वीणा देव यांची मुलगी मधुरा इंगलंडमध्ये राहत असताना त्या आपल्या नातीला राधाला सांभाळण्यासाठी तिथे गेल्या होत्या. तिथला निसर्ग आणि समाज यांचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं आणि अनेक अनुभव घेतले. तिथले अनेक ऋतू त्यांनी अनुभवले. आणि तो अनुभव त्यांनी स्वानसीचे दिवस या पुस्तकात लेख रूपात मांडला. स्त्रियांच्या मनाचा एका वेगळ्या रीतीनं ठाव घेणारं स्त्रीरंग हे पुस्तक त्यांनी लिहिल. त्यांना भेटलेल्या, दिसलेल्या स्त्रियांच्या मनातील धाग्यांचा सुंदर गोफ विणून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ‘स्मरणे गोनीदांची’ हा स्मरणसंग्रहही त्यांनी लिहिला होता. ‘आशक मस्त फकीर’ या त्यांनी गोनीदांवर लिहिलेल्या पुस्तकाला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला होता. मृण्मयी प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी गोनीदा यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केल्या होत्या. डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थान भूषविले आहे. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग घेतला होता. गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग त्यांनी केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121