विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 जागांवरील महायुती आणि मविआचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. माघारी होईपर्यंत या उमेदवारांच्या मनात धाकधूक असली तरी, मविआमधील धुसफूस मात्र चव्हाट्यावर आल्याने जिल्ह्यात हसू होत आहे. शहरासोबतच जिल्ह्यातील काही जागांवर मविआच्या सर्वच घटक पक्षांनी दावा केला. नाशिक पूर्व, पश्चिम, मध्य, निफाड, कळवण, चांदवड-देवळा आणि इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या सात विधानसभा मतदारसंघावर उबाठा गट, शरद पवार गट, काँग्रेस आणि माकप या पक्षांनी दावा ठोकला. माकपने कळवण आणि नाशिक मध्य हे मतदारसंघ सोडण्याची मागणी केली गेली. लोकसभेला ठरल्याप्रमाणे कळवणची जागा देण्यात आली, तर नाशिक मध्य मतदारसंघात मात्र ठेंगा मिळाला. तरीही माकप नाशिक मध्यची जागा लढण्यावर ठाम असून, येथून डॉ. डी. एल. कराड इच्छुक आहेत. काँग्रेसनेही नाशिक मध्यच्या जागेवरुन रणकंदण माजवले. जागा मिळाली नाही, तर ‘सांगली पॅटर्न’ राबविण्याचा इशारा दिला गेला. पण, काँग्रेसचे माजी नगरसेवक हेमलता पाटील आणि राहुल दिवे या दोघांनीही निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत आपल्याच पदाधिकार्यांच्या इशार्याला सुरुंग लावला. त्यात उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करत परस्पर उमेदवार घोषित करत ‘एबी फॉर्म’ही देऊन टाकले. त्यामुळे चवताळलेल्या काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला टाळे लावत आपला निषेध व्यक्त केला. इतके सारे उपद्व्याप करुनही शहरात मरगळ आलेल्या काँग्रेस पक्षाची पाटी कोरीच राहिली, तर, तिकडे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकार्यांनी काँग्रेस पक्षनेतृत्वाला घाम फोडला आहे. त्याचे असे झाले की, विद्यमान आमदार हिरामण खोसकर काँग्रेसला सोडचिट्ठी देताना अर्धा पक्ष आपल्यासोबत घेऊन गेले. मागे उरल्यासुरल्या पदाधिकार्यांनी सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली. पण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत असणारी जवळीक लकी जाधव यांच्या कामाला आली. पक्षाने जाधव यांना उमेदवारी घोषित करताच मतदारसंघातील पदाधिकार्यांनी शहर काँग्रेस पदाधिकार्यांची री ओढत राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे. त्यावर निर्णय होईल तेव्हा होईल. पण, मविआतील ही धुसफूस सर्वांनाच घेऊन बुडणार, हे मात्र निश्चित!
‘महायुती’ची विजयी कूच
नाशिक जिल्ह्यात महायुतीने आपल्या जुन्याच शिलेदारांवर पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे. प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, दिलीप बोरसे यांना भाजपकडून, नरहरी झिरवाळ, नितीन पवार, हिरामण खोसकर, छगन भुजबळ, दिलीप बनकर, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), तर शिंदेंच्या शिवसेनेत दादा भुसे, सुहास कांदे या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. विद्यमान आमदारांना संधी दिली गेल्याने साहजिकच महायुतीकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असले तरीही, नाराजांचे मन वळवण्यात महायुतीच्या घटक पक्षांना यश आलेले दिसते. तशी काळजी महायुतीच्या नेत्यांकडून घेण्यात आली. त्यामुळेच नाशिक मध्य, पश्चिम आणि दिंडोरी हे तीन मतदारसंघ वगळता, इतर सर्व ठिकाणी नाराजांचे मन वळवत सर्वच कार्यकर्त्यांमध्ये एकजूट झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच गृहमंत्री अमित शाह यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांची बैठक घेत नाशिकमधून महायुतीला ताकद देण्याचे आवाहन केले, तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी नाशिक जिल्ह्याकडे विशेष लक्ष देत नाशिकच्या विकासकामांवर भर दिला. विविध योजनांची घोषणा करत सर्वसामान्य मतदाराला मदत कशी होईल, याचा विचार करण्यात आला. त्यामुळेच नाशिकचा मतदार निवडणुकीपूर्वीच आपल्याकडे झुकविण्यात महायुतीचे नेते यशस्वी झाले आहे. याउलट मविआकडे सारे काही आलबेल नसल्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बंडोबांना कसे थंड करायचे या विवंचनेत मविआ आहे, तर काही बंडखोरांनी कोणत्याही परिस्थितीत लढणारच, असा चंग बांधलाय. मविआकडून दिलेल्या उमेवारांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही चढाओढ करण्याचा प्रकार सुरू असल्याने मविआचे उमेदवार पाडण्यासाठी विरोधी पक्षाची गरज नसल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. त्यात मविआच्या नेत्यांकडून विशिष्ट समाजाचे हित जोपासण्यापलीकडे दुसरे काम नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात महायुती एकसंघ असून, पदाधिकारी तळागाळातील मतदारांपर्यंत पोहेचल्याने नाशिक जिल्ह्यात अधिकाधिक उमेदवार निवडून येणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे.