मुंबई, दि.२४ : मुंबई लोकलने प्रवास करताना वैध तिकीट घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या मध्यमातून वारंवार केले जाते. मात्र तरीही सातत्याने तिकीट न काढता नागरिक प्रवास करताना आढळून येतात. याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे या विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विविध मोहीम आखत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात नवदुर्गा तेजस्विनी ही विशेष मोहीम राबवत तब्बल ११ हजार विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून मध्य रेल्वेने ३३ लाख ९८ हजार ५०८ इतकी रक्कम दंडापोटी वसूल केली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे विविध स्थानकांवर ‘नव दुर्गा’ पथकाद्वारे विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विभागाच्या सर्व महिला विशेष तिकीट तपासणी बॅचेस तेजस्विनी द्वारे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश तिकीट-तपासणीच्या प्रयत्नांना बळकटी देणे आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या 'दुर्गा' मुख्य तिकीट निरीक्षक सुधा द्विवेदी यांच्या नेतृत्वात तेजस्विनी विशेष बॅचने दि. २२ ऑक्टोबर रोजी वैध तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या १०३ प्रवाशांना शोधून दंड आकाराला आहे. मध्य रेल्वेच्या तेजस्विनी विशेष बॅचने ज्यात सर्व महिला तिकीट तपासणीसांनी अनियमित किंवा विनातिकीट प्रवासाची ३१८ प्रकरणे नोंदवली. म्हणजेच प्रति कर्मचारी सरासरी ३५ प्रकरणांच्या प्रभावी कामगिरीसह एकूण रु. ९६,२४० इतका दंड वसूल केला, जो प्रति कर्मचारी १०,६९३ रुपये आहे. या विशेष तुकडीने दि.०१ ऑक्टोबर ते दि. २० ऑक्टोबर या काळात विनातिकिट प्रवास करणाऱ्या ११,९७१ प्रवाशांकडून कारवाईपोटी एकूण ३३,९८,७३२ इतका दंड वसूल केला आहे.
श्रेणी प्रवासी संख्या दंडाची रक्कम
वातानुकूलीत १८६० रु. ६,४८,५७०
प्रथम श्रेणी ४६२२ रु. १४,३८,५५०
द्वितीय श्रेणी ४६६४ रु. १२,१५,८८२
बुक न केलेले
सामान ८२५ रु. ९५,७३०