कल्याण : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचा गजर करत "पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला चा गजर करत शेकडो पावलं टाळ, मृदुंगाच्या ठेक्यावर थिरकत कल्याण नजीकच्या राहनाळ गावातून पांडुरंगाच्या दर्शनासाठी रॅली निघाली होती. एवढेच नव्हे तर या वारीमध्ये नवभारत साक्षरतेचा गजरही करण्यात आला.
जिल्हा परिषद केंद्र शाळा राहनाळ येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थी वारीमध्ये सहभाग घेतला होता. पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या राजश्री पाटील यांनी गायलेल्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. मुलींनी आणि मुलांनी फुगडीचा फेर धरला. पालक रजनी नाईक, यांनीही ठेका धरला. ईश्वरी नाईक ही रुक्मिणी झाली, तर मनीष हा पांडुरंग झाला होता. वारकऱ्यांच्या वेशामध्ये पहिली ते सातवीचे विद्यार्थी खुलून दिसत होते. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने निघालेली वारी संपूर्ण राहनाळ गावातील ग्रामस्थांचे आकर्षण ठरली. रवीना पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांकडून नृत्य बसवून घेऊन सादर केली.
सर्व सामान्यांचा देव पांडुरंग आणि आषाढी एकादशीचे महत्त्व अंकुश ठाकरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं. तर नवभारत साक्षरतेची निघालेली वारी नेत्रदीपक आहे अशी भावना विषयतज्ञ शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशीच्या वारीत विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, पालक यांनीही फुगडीचा फेर धरून आनंद लुटला. ही वारी जन्मात एकदा तरी आम्हाला घडावी अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या.