डोंबिवली : बदलापूर येथील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे नवनिर्मित आयटी लॅब, बॉटनी लॅब आणि केमिस्ट्री लॅबचे उद्घाटन गुरुवारी उत्साहात पार पडले.
उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय कोतवाल, विश्वस्त नंदकिशोर पातकर, कोषाध्यक्ष रामचंद्र शेट्ये, माजी विश्वस्त पंढरीनाथ बाविस्कर व संस्थेचे विविध विभागाचे प्रमुख व प्राचार्या उपस्थित होते. यावेळी कोषाध्यक्ष रामचंद्र शेट्ये यांच्या हस्ते केमिट्री लॅबचे उद्घाटन संपन्न झाले , बॉटनी लॅब चे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन घोरपडे यांच्या हस्ते तर आय टी लॅब चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि विश्वस्त नंदकिशोर पातकर यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पाहुण्यांनी सांगितले की, "तंत्रज्ञान आणि विज्ञान हे आजच्या युगाचे भविष्य आहे. अशा आधुनिक लॅब्समुळे विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानासह केमिस्ट्रीतील सखोल ज्ञान मिळेल आणि ते स्पर्धात्मक जगात यशस्वी ठरतील."
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता पांडे यांनी या नव्या आयटी लॅबमध्ये बी.एससी आय टी साठी अत्याधुनिक संगणक, उच्च-गती इंटरनेट, प्रोग्रामिंग व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत ह्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना कोडिंग, वेब डेव्हलपमेंट, आणि डेटा अॅनालिटिक्स यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे असे सांगितले. त्याचबरोबर, सर्व संसाधनांनी, रसायनांनी सज्ज केमिस्ट्री लॅबमध्ये आणि बॉटनी लॅबमध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्याक्षिके करता येतील. याचा विद्यार्थ्यांना पुढील व्यावसायिक व नोकरीच्या काळात निश्चितच उपयोग होईल. या लॅबमध्ये केमिस्ट्री तसेच बॉटनी शाखेशी निगडीत सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. असेही प्राचार्या डॉ. संगीता पांडे यांनी स्पष्ट केले.
या लॅबच्या उद्घाटनामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.