मुंबई : शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या परंपरागत देशी खेळांमुळे संस्कृती संवर्धनही होते, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले. शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी कुर्ला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मैदानात आयोजित ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारतीचे अध्यक्ष गणेश देवरुखकर, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मनोज रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. परंपरागत कबड्डी, खो-खो, कुस्ती, पंजा लढवणे, तलवारबाजी, पावनखिंड दौड (मॅरेथॉन) रस्सीखेच, विटी-दांडू, मल्लखांब, फुगडी आणि मंगळागौर यासारख्या १८ देशी खेळांच्या या स्पर्धेत २७ हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, “शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
विधान परिषद सभापती राम शिंदे म्हणाले की, “मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून तन-मनाने सुदृढ करणाऱ्या परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले. परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातात. मात्र, लोढा यांनी मुंबईसारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनर्जीवित केले,” असे ते म्हणाले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान उभारल्याबाबतही त्यांनी आभारही मानले.