मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी वर्षानुवर्षे आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करतात. सलमान खान, शिल्पा शेट्टी यांच्या घरातील गणेशाची विशेष चर्चा होते. २२ वर्षांपूर्वी शिल्पा शेट्टीने आपल्या घरी प्रथमच बाप्पा आणला होता. तेव्हापासून ती सातत्याने बाप्पाला घरी आणते. शिल्पाच्या घरी बाप्पा बसल्यावर ते फक्त सेलिब्रेशन नसतं, तर एक ग्लॅमरस फेस्टिव्हल असतो. तिच्या घरचा गणेशोत्सव म्हणजे लाईमलाईट, सेलिब्रिटी पाहूणे, डान्स, गाणी आणि एक वेगळाच जल्लोष. चाहते तिच्या घरासमोर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र यावर्षी या प्रथेत खंड पडणार आहे. आणि त्यामागे तसंच कारण देखील आहे.
याबाबत शिल्पाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,

'प्रिय मित्रांनो, अत्यंत दुःखाने आम्हाला सांगावं लागतंय की कुटुंबातील एका प्रिय व्यक्तीच्या निधनामुळे आम्ही या वर्षी गणपती उत्सव साजरा करणार नाही. परंपरेनुसार आम्ही 13 दिवसांचा शोक पाळणार आहोत आणि कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. या कठीण प्रसंगी तुमच्या सहानुभूती आणि प्रार्थनांची गरज आहे.' या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला धीर देणारे मेसेज पाठवले आहेत.
शिल्पाच्या घरच्या बाप्पाची तिच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. मागच्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या पायाचा सेटवर अपघाता झाला होता. आणि पायाला फ्रॅक्चर असतानाही तिने बाप्पाचं मोठ्या धूमधडाक्यात स्वागत केलं होतं. पण आता जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे या परंपरेत खंड पडत आहे.