काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचे षडयंत्र उघड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी

    31-Jul-2025   
Total Views |

मुंबई :काँग्रेसप्रणित युपीए सरकारचे हिंदू दहशतवाद आणि भगव्या दहशतवादाचे षडयंत्र उघड झाले आहे. काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर आतंकवाद भगवा न कभी था,ना है,ना कभी रहेगा, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काँग्रेसप्रणित युपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा आणि भगव्या दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूकीत अल्पसंख्यांचे लांगूलचालन करण्याकरिता हिंदू आणि भगवा आतंकवाद आहे, असा केलेला प्रचार प्रसार किती खोटा आहे, हे आज उघड झाले आहे. ज्याप्रकारे काँग्रेस आणि यूपीएने षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न केला तो खोटा होता हे कोर्टाने पुराव्यानिशी सांगितले आहे. यात ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्यासह संपूर्ण हिंदू समाजाची काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.

"हा बॉम्बस्फोट कुणी केला हे पोलिस सांगतील. त्यावेळच्या यंत्रणेचे काय तपास केला हे त्या यंत्रणेला विचारावे लागेल. ज्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसले आहेत त्यावेळी त्यांचेच सरकार होते आणि त्यांच्याच पोलिसांनी हे केले आहे. ठाकरेंनी भगव्या आतंकवादाचा नरेटिव्ह पूर्णपणे अयशस्वी झाला, याबद्दल अभिनंदन करायला हवे होते. परंतू, कदाचित तेही लांगूलचालन करणाऱ्यांच्या सोबत गेल्याने असा प्रश्न विचारत असतील," अशी टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

पोलिसांवर षडयंत्र पूर्ण करण्याचा दबाव

"मी यात पोलिसांना दोष देणार नाही. युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केले होते. ते षडयंत्र पूर्ण करण्याचा पोलिसांवर दबाव होता. त्यामुळे त्यांनी हे काम केले. इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट होत असल्याने त्यातून जगात इस्लामिक दहशतवाद हा शब्द पुढे आला होता. ९/११ च्या हल्ल्यानंतर हा शब्द मोठ्या प्रमाणात पुढे आला. त्याचे उत्तर म्हणून भगवा दहशतवाद आणून त्यातून लांगूलचालन करण्याचा यूपीए सरकारचा प्रयत्न होता. त्या दबावाखाली या घटना झाल्याचे स्पष्ट आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....