कल्याण : कल्याण-डोंबिवलीहून थेट ठाण्याला जोडणाऱ्या रेल्वे समांतर रस्त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांप्रश्नी गुरुवारी आयुक्त गोयल यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बैठकीत डोंबिवली ते ठाणे समांतर रस्त्याच्या महत्त्वाच्या विषय आमदार मोरे यांनी उपस्थित केल्यानंतर केडीएमसी आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.
लोकलमध्ये वाढलेली जीवघेणी गर्दी, रेल्वेतून प्रवास करताना प्रवासी पडून होणारे अपघात यावर उपाययोजना म्हणून काही वर्षांपूर्वी डोंबिवली ते ठाणे समांतर रस्त्याचा पर्याय तत्कालीन दिवंगत माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांनी समोर आणला होता. २००५ साली झालेल्या अतिवृष्टीत या रस्त्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित झाली होती. मुंब्रा रेल्वे अपघातानंतर नागरिकांकडून पुन्हा एकदा समांतर रस्त्याचे मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर हा विषय आमदार मोरे यांनी पुन्हा एकदा मांडला आहे. अतिशय कमी वेळेत कल्याण डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे म्हणजेच लोकलशिवाय कोणताही पर्याय नसल्याने डोंबिवली ते ठाणे समांतर रस्ता हा गरजेचा आहे.
२७ गावातील कामगारांना कायम करण्याबाबत देणार नियुक्ती पत्र
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावातील कामगार मागील १० वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत आहे. या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य शासनाने आदेशित केले आहे. मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम आहे. प्रशासनाकडून कामगारांची पोलीस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्या टप्प्याने नियुक्ती पत्र दिली जातील. पहिली टप्प्यातील नियुक्तीपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त गोयल यांनी आमदार मोरे यांना दिले आहे.
२७ गावातील समस्यांवर चर्चा
२७ गावात महापालिकेच्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात. ग्रामीण भागात बसविण्यात आलेले काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते पुन्हा सुरु करण्यात यावेत. पथदिवे बसवावेत. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने आणि हेल्थ सेंटर सुरु करावेत, सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्क देखील माफ करावे, पाणी पुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. ग्रामीण भागातील भूयारी गटारांची कामे सुरु करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरु करण्यात यावी अशा मागण्या आमदार मोरे यांनी आयुक्तांकडे केल्या आहेत.या मागण्या पूर्ण करण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली आहे. या बैठकीस शिवसेनेचे पदाधिकारी संतोष चव्हाण, राहुल गणपुले, संजय विचारे, दत्ता वझे, गजानन मांगळूरकर आदी उपस्थित होते.