नवी मुंबई : दिंड्यापताका नाचवित पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारीत सहभागी होण्यामागील लक्षावधी भाविकांची भावना नव्या पिढीला कळावी आणि महाराष्ट्राच्या दिंडी सोहळ्यातून प्रतित होणा-या सांस्कृतिक वैभवाची जाणीव व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आठही विभाग क्षेत्रात स्वच्छता दिंडी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत विभाग कार्यालये, घनकचरा व्यवस्थापन विभाग व शिक्षण विभाग यांच्या एकत्रित सहयोगातून ठिकठिकाणी स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करीत आपल्या पालकांसह अत्यंत उत्साही सहभाग घेतला. या माध्यमातून श्रीविठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या नामाचा गजर करीत त्यासोबतच स्वच्छता, कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, मलेरिया – डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना, साक्षरता अशा विविध बाबींचा फलकांव्दारे तसेच घोषणांव्दारे प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे तसेच परिमंडळ 1 उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त श्री.संजय शिंदे आणि शिक्षण विभाग उपआयुक्त श्रीम संघरत्ना खिल्लारे यांच्या माध्यमातून सर्व विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी व स्वच्छता अधिकारी यांच्या सहयोगाने हा उपक्रम नवी मुंबईत सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला. यामुळे आषाढी एकादशीच्या पूर्वदिनी संपूर्ण नवी मुंबई विठ्ठलानामाच्या गजरासह स्वच्छता व आरोग्याच्या संदेशाने जागरूक झाली.
बेलापूर विभागात अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन करावेगाव येथील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेपासून दिंडीला सुरूवात झाली. बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे, स्वच्छता अधिकारी श्री. नरेश अंधेर यांच्या नियंत्रणाखाली नेक्सस सीवूड मॉलच्या प्रांगणात पारंपारिक पध्दतीने रिंगण घालून व लघुकीर्तन करून स्वच्छता दिंडीची सांगता झाली.
तुर्भे विभागात सहा. आयुक्त श्री.सागर मोरे व स्वच्छता अधिकारी श्री. जयेश पाटील यांच्या माध्यमातून नमुंमपा शाळा क्र. 17 सानपाडागाव येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छता दिंडीव्दारे हरीनामाचा गजर करताना स्वच्छतेचेही महत्व पटवून दिले.
कोपरखैरणे विभागातही सेक्टर 2 येथील शाळा क्र. 38 व 74 मधील विद्यार्थ्यांचीही स्वच्छता दिंडी सहा. आयुक्त श्री.भरत धांडे व स्वच्छता अधिकारी श्री.राजुसिंह चौहान यांच्या पुढाकारातून शिक्षक व पालकांच्या सहयोगाने यशस्वीरित्या संपन्न झाली.
घणसोली विभागात स्वच्छतेप्रमाणेच साक्षरतेचेही महत्व प्रसारित करीत निघालेली स्वच्छता दिंडी नागरिकांच्या उत्साही सहभागातून उत्तमरित्या आयोजित करण्यात आली. यामध्ये घणसोली विभागाचे सहा. आयुक्त श्री.उत्तम खरात आणि स्वच्छता अधिकारी श्री.विजय पडघन यांनी महत्वाची आयोजन भूमिका बजावली.
ऐरोली विभागातही नमुंमपा शाळा क्र. 48, दिवागाव तसेच नमुंमपा शाळा क्र. 53, चिंचपाडा येथील विद्यार्थ्यांच्या स्वच्छता दिंडी उपक्रम आयोजनात सहा.आयुक्त श्री.सुनिल काठोळे आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजेंद्र इंगळे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक यांच्या एकत्रित सहयोगातून हा उपक्रम यशस्वी केला. इतरही विभागांमध्ये शालेय पातळीवर स्वच्छता दिंडीला उत्साही प्रतिसाद लाभला.
एकंदरीतच या माध्यमातून सकाळच्या सत्रात नवी मुंबईतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता दिंडींमधून निर्माण झालेल्या प्रसन्न वातावरणामुळे नवी मुंबईची सांस्कृतिक शहर ही ओळख अधिक दृढ झाली.