एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं अप्रासंगिक ! ; मंत्री एँड आशिष शेलार यांची टीका

    06-Jul-2025   
Total Views |

मुंबई
: दोन भाऊ एकत्र झाले खूप छान झालं. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे, कारण हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचंच झालं तर, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी केली.

ते पुढे म्हणाले की,

ज्यांच्याकडे बोलायचे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात ज्यांच्याकडे प्रभावी मांडणी नसते ते विपर्यासाकडे जातात ज्यांना लोकांना आपली बाजू मांडण्यामध्ये कमतरता वाटते ते सामाजिक आणि जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात.

कोणीही द्वेषाची भावना पसरवू नये आणि महाराष्ट्रात कायदेशीर राहणाऱ्या कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपनेच केली आणि भाजपच करेल. अ मराठी माणससाने सुद्धा मराठी माणसाला डिवचू नये पण म्हणून कुठेही घाबरण्याचं कारण नाही.

तुमच्या लेकरांनी तीन भाषा शिकाव्यात महाराष्ट्रातल्या अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये?.असा सवालही त्यांनी ठाकरेंना केला

मला उद्विग्नता येते

खर तर दोन घटनेची तुलना करता येत नाही पण या सगळ्या गोष्टीची मला उद्विग्नता येते. पहेलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय!
इंग्रजांची रणनीती होती तोडा आणि राज्य करा, आता काही पक्षांची रणनीती आहे भीती पसरवा आणि स्वतःची मत मिळवा, अशी टीकाही त्यांनी केली.

आव मराठीचा आणि घाव मुंबईच्या अर्थसंकल्पावर....!

जेव्हा यांना सत्ता हवी होती तेव्हा उद्धवजींनी भाजपच्या दाड्या कुरवळल्या आणि केंद्रापासून महाराष्ट्रापासून महानगरपालिकेपर्यंत आमच्या जीवावर उद्धवजींचे सरकार त्या ठिकाणी मिळालं. सरकार मधली सहभागिता मिळाली. आता त्यानंतर सत्तेतली राज्यातली मुख्यमंत्री पदाची लालसा लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची दाढी त्यांनी कुरवळली आणि मग राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद मिळवलं आता महापालिकेतली सत्ता जाईल म्हणून मनसेची दाढी कुरवळायचं काम चालू आहे. आणि त्यामुळे दाढी कुरवळणं याची एक्सपर्टी ही संजय राऊत आणि उबाटाचा सेनेकडेच आहे, अशी टीका त्यांनी केली.

पंढरपूरात सरकारकडून उत्तम व्यवस्था

काल मी स्वतः पंढरपूरला वारीत सहभागी होऊन आलोय आणि म्हणून सुरुवातीलाच समस्त नागरिकांना आणि महाराष्ट्राला आषाढी एकादशीच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभकामना देतो. स्वच्छतेच्या बाबतीत असेल, दर्शनाच्या बाबतीत असेल, वाहतुकीच्या व्यवस्थांच्या बाबतीत असेल, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये यावेळेची वारी आणि व्यवस्था आदर्शवत वाटाव्यात अशा पद्धतीच्या व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केल्या असून मी सरकारचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, असे ते म्हणाले.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.