व्यक्ती एक, अभिव्यक्ती अनेक!

    14-Sep-2023
Total Views |
Article On Milind Govind Rathkanthiwar

लहानपण विदर्भात आणि आपल्या आवडीच्या गुणांचा विकास सांस्कृतिक कार्याचे माहेरघर असलेल्या पुण्यात करीत, यश संपादन करणार्‍या मिलिंद गोविंद रथकंठीवार या बहुपैलू व्यक्तिमत्त्वाचा हा प्रवास.

विदर्भातील नागपूर जिल्ह्यात असलेल्या कामठी येथे बालपण व्यतीत करून तसेच शिक्षण घेत जीवनाचा यशस्वी प्रवास सुरू झाल्यावर बाबांच्या मखानी चित्रकलेचा आणि आईचा काव्य आणि संगीत कलेचा वारसा पुढे नेताना आयुष्याच्या यशाच्या या टप्प्यावर पोहोचू असे वाटलेच नव्हते. ’व्यक्ती एक, अभिव्यक्ती अनेक’ हे सूत्र तंतोतंत लागू असलेले पुण्यातील एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे मिलिंद गोविंद रथकंठीवार.

शैक्षणिक क्षेत्रात बीएससी, डीबीएम, डीआयटी असा यशस्वी विहार केल्यावर अमरावती येथून त्यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र‘ पुणे शहर क्षेत्रीय कार्यालयात नोकरी करीत असताना त्यांना उपजत आवड असलेल्या क्षेत्रात मनसोक्त विहार केला. त्या अगोदर ‘आंतरविद्यापीठ वादविवाद स्पर्धे’त नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. ‘आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धे’तदेखील त्यांचा सहभाग असे. शिवाय, महाविद्यालयीन बुद्धीबळ, कॅरम स्पर्धेत राज्यस्तरीय बुद्धीबळ विजेता किरण प्रजापती याला पराजित करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली. एवढेच कशाला मिलिंद यांनी राज्यस्तरीय अभिनयाचे पारितोषिकदेखील मिळविले, त्यांनी अनेक नाटकातून अभिनयदेखील केला. शिवाय, अभिवाचक म्हणून अनेक कादंबर्‍यांचे अभिवाचन केले. बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड कादंबरीच्या अभिवाचनाचे ५०हून अधिक प्रयोग सादर करीत ‘पुणे फेस्टिवल’मध्येदेखील सादरीकरण केले. बाबासाहेबांनी त्यांना खास आग्रह करून ते करायला लावले.

एखाद्या व्यक्तीमध्ये किती कौशल्य असावे, याची आपण गणतीच करू शकत नाही. मिलिंद रथकंठीवार हे असेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व. स्वतः आनंद घेऊन इतरांना तो भरभरून देणार्‍या मिलिंद यांचे गायक, निवेदक, संहिता लेखक म्हणूनदेखील तितकेच योगदान आहे. ‘क्या यही प्यार हैं?’, ‘ख्याल किशोरचा आणि थाट किशोरचा’, ‘एक मै और एक तू’, ‘सपनोका राही’, ‘इंद्रधनुष्य पहाटगाणी’ इत्यादी कार्यक्रमांतून सहभाग घेत त्यांनी रसिकांना आनंद देणारे, असे ३३ कार्यक्रम सादर केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, सुप्रसिद्ध सिनेसंगीत दिग्दर्शक कौशल इनामदार यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘मराठी अभिमान गीत’ शिवरंजनी स्टुडियोत ध्वनिमुद्रित झाले आहे. रेखाचित्रकार म्हणून २००हून अधिक नामवंत, प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांचे रेखाचित्रे रेखाटून त्यावर स्वाक्षरी मिळविण्याचा अनोखा छंददेखील त्यांना आहे.

मात्र, एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर याची १९हून अधिक प्रदर्शने देखील झाली आहेत. त्यांची ’त्या फुलांच्या गंधकोषी’ ही बहुचर्चित कादंबरी प्रसिद्ध झाली. यासाठी त्यांना ‘कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, ‘त्या फुलांच्या गंधकोषी’ या कादंबरीचे ई-बुक संस्करण ‘बुकगंगा डॉट कॉम’द्वारे प्रकाशित झाले, तर द्वितीय संस्करण आणि ब्रेल संस्करणदेखील प्रकाशित झाले. या कादंबरीची हिंदी, इंग्रजी आणि जर्मन भाषांमध्ये भाषांतरित होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते अभिमानाने सांगतात. या कादंबरीवर आधारित, गीतांचे लेखन, सुप्रसिद्ध सिनेगीतकार, जयंत भिडे यांनी केलेले असून, त्यावर एक अल्बम काढण्याचा प्रस्ताव तसेच एक चित्रपट किंवा मालिका काढण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे त्यांनी सांगितले.

व्यक्त-अव्यक्त, वैयक्तिक चारित्र्याचा, मूल्यांचा पुरस्कार करणारी अभिनेत्री या कादंबर्‍या आणि ‘रंग, तरंग अन् अंतरंग’ हे अनुभवांचे संकलन या प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. त्यांनी ‘दिंडी काळ्यापाण्याची’ या चंद्रकांत शहासने लिखित, क्रांतिकारकांवरील पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. प्रतिलिपी डॉट कॉमवर त्यांचे ई-लेखन वाचायला मिळते. भगुर (नाशिक) येथे झालेल्या स्वातंत्र्यवीर ‘वि. दा. सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलना’च्या कार्यवाहकपदाची धुरा त्यांनी सांभाळली. शिवाय चेलुक (इंडोनेशिया) येथे नोव्हेंबर २०१६ मध्ये भरणार्‍या ’सावरकर विश्व साहित्य संमेलना’च्या कार्यवाहपदी आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केले.

त्यांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पुरस्कार, हिंदूरत्न पुरस्कार, पु. ल. देशपांडे गुणगौरव पुरस्कार, राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, स्वामी विवेकानंद गौरव राज्यस्तरीय कामगाररत्न पुरस्कार, वाङ्मय श्री पुरस्कार, महाराष्ट्र कला ज्योती गौरव रेखा चित्रकार पुरस्कार, महाराष्ट्र कला ज्योती गौरव पुरस्कार, पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. ’बँक ऑफ महाराष्ट्र‘च्यावतीने ‘बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ म्हणून गौरव करण्यात आला. पुणे महानगरपालिकेच्यावतीने, जाहीर सत्कार आणि स्मृतिचिन्ह भेट मिळाले. तसेच ‘इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स जस्टीस फेडरेशन’च्यावतीने, ‘साऊथ एशियन लिटरेचर अवार्ड’ आणि ‘इंटरनॅशनल सोशालिस्ट सोशल अवार्ड’नेदेखील त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

मिलिंद यांचे लेखक, कवी, वक्ता, रेखाचित्रकार, पाककलातज्ज्ञ , बुद्धीबळपटू, कॅरमपटू, रांगोळीकार नाणी संग्रहक, कॅलिग्राफी कलाकार, कॉपर आर्टिस्ट, थर्मोकोल आर्टिस्ट, छायाचित्रकार, स्तंभलेखक, गायक, अभिवाचक, निवेदक, अभिनेता, संगीतनिर्देशक, शीळवादक, सूत्रसंचालक, संहिता लेखक असा विविध क्षेत्रात स्वैर संचार आहे. सामाजिक कार्यात सहभाग घेत त्यांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघा’चे अखिल भारतीय संघटन सचिवपद भूषविले.तसेच अवयवदान, नेत्रदान आणि रक्तदान चळवळीत हिरिरीने सहभाग घेतला आहे. आता त्यांचा ‘व्यक्ती एक, अभिव्यक्ती अनेक’अंतर्गत विक्रम नोंदवण्याचा संकल्प आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या कार्यास शुभेच्छा.

अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९८५०४३८५७५)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.