संस्कृतीदर्शन करणारा मुसाफिर

    09-Apr-2023   
Total Views |
Pranav Patil

कायद्याचे शिक्षण घेऊन आपल्या संस्कृतीच्या, इतिहासाच्या आणि माणसांच्या कथांमध्ये स्वारस्य असणारा, त्यासाठी भटकंती करणारा आणि आपले अभ्यासपूर्ण अनुभवकथन करत आपल्या लेखणीतून लोकांना महाराष्ट्रातल्या गावागावांच्या अद्भुत गोष्टी सांगणार्‍या प्रणव पाटील विषयी...

संस्कृती वाहती असते, कालानुरूप तिच्यात बदल होत जातात, वर्तमानातून पुढे जात असता मागे वळून पहिले की मात्र एकेका वळणावर तिचे एकेक रुपडे खुणावते. हिंदू संस्कृतीतील अशाच काही अतुलनीय गोष्टींनी प्रणवला वेड लावले. लहानपणी त्याचे बाबा त्याला वेगवेगळ्या डोंगरांवर, गड-किल्ले अभ्यास सफारीला घेऊन जात. इथे त्याला इतिहासाची गोडी लागली. शालेय शिक्षण सुरू असताना मात्र त्याला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. त्यासाठी त्याचे प्रयत्न नेहमी चालू असत. सर्व विज्ञान प्रदर्शनांत आपला प्रकल्प घेऊन प्रणवची हजेरी लागत असे. शाळेचे नेहमीच अशा प्रयोगांना सहकार्य असे. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. मूळचे सांगली येथील पाटील कुटुंबीय पुण्याजवळील वाकड येथे येऊन स्थायिक झाले. परंतु, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व्हावे व नेतृत्व करणारी पिढी घडवावी, अशा विचारांचे बाळकडू देणार्‍या शाळेतच त्याचे शिक्षण व्हावे, केवळ या हेतूने संपूर्ण कुटुंब शाळेच्या जवळ येऊन राहिले.

शाळेत असताना शालेय शिबिरांच्या माध्यमातून मुलांना महाराष्ट्रातील विविध गावी पाठवण्यात येत असे. केवळ निवासाची व्यवस्था करून आपापल्या कलागुणांचा वापर करत किंवा अंगमेहनतीने विद्यार्थ्यांनी आपले अन्न आपण मिळवायचे, असा शिरस्ता या शिबिरांचा असे. कधी लातूर मधील भूकंपग्रस्त गावात (हसलगण) तर कधी अलिबाग येथील चोरोंडे गावात शिबीरप्रमुख म्हणून प्रणव आपल्या वर्गमित्रांना घेऊन जाई. शिबिरासाठी गावाच्या सरपंचांची परवानगी घेण्यापासून, शूचितेसाठी पाणी हवे इथपासून ते दोन वेळच्या जेवणापर्यंत संघर्ष असायचा. कधी मंदिरामागच्या विहिरींवर पाणी शेंदून तर कधी ख्रिस्ती प्रार्थनामंदिरात पाण्यासाठी वर्णी लावून अंघोळी होत. ग्रामीण मुलांना व गावकर्‍यांना संध्याकाळी एकत्र जमवून त्यांना शहरातील गमती जमती सांगत, कधी त्यांचे खेळ घेत तर कधी योग प्रात्यक्षिके करीत त्या-त्या गावात ही मुले प्रबोधन करीत. या शिबिरांच्यावेळी प्रणव बारकाईने गावांचे निरीक्षण करत असे. गावाकर्‍यांच्या काय समस्या आहेत, रस्ते, वृक्ष, शाळेची परिस्थिती काटेकोरपणे तपासून आपल्या नोंदवाहित नोंदवून घेई.

भूकंपग्रस्त गावातील घरे पिरॅमिडच्या आकाराची होती, तर समुद्राजवळच्या घरांमागे हमखास पेंढा, चारा, लाकडे रचून ठेवलेली आढळत. गावात गरिबी असेल तर ती घरे कशी, मग सर्वांचे एकेका घरी जेवणासाठी वार लावून दिले जात. गावकर्‍यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि बाह्य समाजाविषयी असलेली त्यांची समज पाहून मुलं अधिकाधिक समृद्ध होऊन पुण्यात परतत.आठवी इयत्तेत प्रणवला ‘एरोस्पेस इंजिनिअर’ व्हायचं होतं, त्याचे सर्व प्रकल्प विमानांवर आधारित असत. परंतु, शिबिरांनी दिलेल्या या ठेव्यामुळे प्रणवने इतिहास विषय घेऊन बॅचलर्स आणि मास्टर्स या दोन पदवी फर्ग्युसन महाविद्यालयात घेतल्या. एलएलबी झाले व एलएलएम करण्यापूर्वी प्रणवने घरच्यांकडून एक अनोखं गिफ्ट मागितलं. एक वर्षाचा वेळ. केवळ भटकंतीसाठी आणि आईवडिलांनी तो चक्क मान्य केला. बालवयापासूनच प्रणवला वाचनाची सवय होती. या कालावधीत त्याने अनेक पुस्तके वाचली, आपल्या दुचाकीवरून जवळपासची सारी रानं, डोंगर, पाडे, वस्त्या अक्षरशः पिंजून काढल्या.

प्रवासवर्णनं लिहिली, गावांच्या, माणसांच्या गोष्टी लिहिल्या. तिथल्या मंदिरांचा आणि पुरातन चित्रशिल्पांचा इतिहास जाणून घेतला. त्यासाठी पुन्हा एकदा ‘इंडॉलॉजी’ हा विषय घेऊन एक वर्षाचा ‘डिप्लोमा कोर्स’ पूर्ण केला. राजकीय घटनांचा आपल्यावर अप्रत्यक्षपणे मोठा परिणाम होत असतो, ही राजकीय व्यवस्था समजून घ्यावी तर कायदा आणि पत्रकारितेचे ज्ञान आवश्यक, म्हणून पत्रकारितेतही मास्टर्स पदवी मिळवली. शिक्षण सुरूच राहतं, त्याच्यासोबत विपुल लेखनही करावं म्हणून त्याने अनुभव मासिकासाठी लिहायला सुरुवात केली. कोल्हापूर येथील कसबा बीड हे ‘सोनपावसाचं ऐतिहासिक गाव’, ‘माणदेशातील माणसं’, ‘हेलनचा युक्रेन ते इटली प्रवास’, ‘रानभटकंतीचं लागीर’, ‘रक्तबळी’ आणि ‘पुजार्‍याचा सेल्फी’ असे काही त्याचे अत्यंत गाजलेले लेख. आपला अभ्यास, वाचन, प्रवास सांभाळत तो शेतीही करतोय! ही अत्यंत खास गोष्ट आहे. गावी सांगलीजवळ त्याच्या द्राक्षाच्या बागा आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून द्राक्षांची काळजी घ्यायला, त्याची सांगलीतही फेरी असतेच. त्याला कवितालेखन करायलाही आवडतं, नुकतेच गुजरात येथे झालेल्या साहित्य संमेलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत प्रणवने हिंदी कविता सादर केली.

लोककला, लोकसंस्कृती आणि ग्रामसंस्कृतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना प्रणव पुण्यातल्या ग्रामदेवतांचा अभ्यास करू लागतो. यासाठी त्याला ‘रा. चिं. ढेरे फेलोशिप’ मिळते. सोबतच ‘एशियाटिक लायब्ररी’ची फेलोशिप अशा एकूण तीन फेलोशिप त्याच्याकडे सध्या आहेत. या सर्वच क्षेत्रात अभ्यासपूर्ण योगदान देताना प्रणव आपल्या धनगर वस्त्या, रानातल्या मुसलमान वस्त्या, भटकणं सोडत नाही. अनेक दिवाळी अंकात, मासिकांत, साप्ताहिकांत नियमित लेखन करणं चुकवत नाही, एवढंच काय तर आपले सर्व अनुभव संक्षिप्त स्वरूपात तो फेसबुकवरही लिहितो. प्रणवच्या या प्रबोधनकार्यासाठी दैनिक मुंबई तरुण भारतकडून त्याला अनेकानेक शुभेच्छा.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.