वैष्णवीची आत्महत्या नव्हे हत्याच! वडील अनिल कस्पटेंचा आरोप
28-May-2025
Total Views |
पुणे : वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिचे वडील अनिल कस्पटे यांनी केला आहे. बुधवार, २८ मे रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे याप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
याबाबत बोलताना अनिल कस्पटे म्हणाले की, "शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर एकूण २९ जखमा आढळल्या असून त्यातील १५ जखमा ताज्या म्हणजेच मृत्यूच्या २४ तासांच्या आतील आहेत. याचा अर्थ ज्यादिवशी तिचा मृत्यू झाला त्यादिवशी तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्याच आहे. त्यांनी संगनमताने मिळून कट रचूनच ही हत्या केली आहे. वैष्णवीच्या शरीरावरचे २९ व्रण बघता यापूर्वीही तिला सतत मारहाण आणि तिचा छळ होत होता हे सिद्ध होते," असे ते म्हणाले.
"वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी हे प्रकरण एसआयटीकडे वर्ग करावे ही माझी मागणी आहे. तसेच निलेश चव्हाण कशासाठी मोकाट फिरतो आहे? त्याला त्वरित अटक करावी. यासोबतच राजेश कावेडिया यांना सरकारी वकील म्हणून नेमण्यात यावे, अशी माझी आणि माझ्या कुटुंबियांची मागणी आहे," असेही अनिल कस्पटे यावेळी म्हणाले.