युक्रेन : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेस्टक भागातील स्टाराया निकोलायेव्का हे गाव आपल्या ताब्यात घेतल्याचे जाहीर केले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत झालेल्या भीषण लढाईत १ हजार ४७५ युक्रेनी सैनिक ठार झाले आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्टाराया निकोलायेव्का गावामधील बहुतांश लोक हे रशियन वंशाचे आहेत. त्यामुळे या भागावर त्यांचा हक्क असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या गावामध्ये युक्रेनविरोधात लढणारे स्थानिक मिलिशिया गट देखील रशियाला मदत करत आहेत, असेही रशियाने सांगितले. रशियाने आपल्या सैन्याच्या विजयाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये रशियन सैन्य तैनात असल्याचे दिसत आहे. युक्रेनकडून अद्याप या घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
आत्तापर्यंत काय काय घडले ?
युक्रेनमध्ये युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे. अनेक शहरांमध्ये बॉम्बहल्ले आणि क्षेपणास्त्रांचे आक्रमण सुरू आहे. जगभरातून या युद्धावर चिंता व्यक्त केली जात आहे. हे युद्ध गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अनेक वेळा युद्ध थांबवण्यासाठी चर्चा झाली आहे.या युद्धाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत आणि शाळा, रुग्णालयाचे नुकसान झाले आहे. रशियाने पुन्हा हल्ला करून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. पुढील काही दिवसांत युद्ध अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.