इतिहासाला फुटलेला नवा अंकुर

    24-Apr-2023   
Total Views |

नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवोदित इतिहासकाराविषयी म्हणजेच अंकुर काणे विषयी... 

ankur kane
काळ बदलतो तसं आपलं आयुष्य काळाच्या वेगात पुढे जातं राहतं. पण आपल्याला लाभलेला वारसा मात्र आपल्याला सतत मागे वळून पाहायला भाग पाडतो. इतिहासाची ओढ जन्मजात असते. मंदिरं, मूर्ती, पुरातन वास्तू या सर्वांची ओढ लागली आणि तो इतिहासाच्या पाऊलखुणा शोधू लागला. ही गोष्ट आहे अंकुर काणेची. अंकुर आपल्या या इतिहास वेडाचं श्रेय आपल्या वाचनाच्या सवयीला देतो. शालेय वयात असताना वाचनाची सवय लागली आणि त्यातून तो इतिहासाकडे ओढला गेला.
'गाथा प्राचीन महाराष्ट्राची' या पुस्तकाचे लेखन ज्या 4 तरुणांनी केले त्यांच्यातील एक म्हणजे अंकुर काणे. हा एक लेखसंग्रह आहे. तसंच या पुस्तकाचे 8 भाग काढण्याचे प्रयोजन अंकुरचे आहे. पहिल्या पुस्तकाचे संपादन अंकुरने केले आहे तर 'गाथा प्राचीन महाराष्ट्राची भाग 2' या दुसऱ्या पुस्तकाचे लेखन तो एकटाच करतो आहे. लवकरच दुसरा भागही प्रकाशित करण्याचा त्याचा मानस आहे.
महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाबद्दल काही पहिलेच लिहिले गेले नाही. याबाबतीत बराच अभ्यास, बरेच संशोधन झाले आहे. परंतु हे ज्ञान फक्त अभ्यासकांच्या वर्तुळात फिरत राहतं. सामान्य माणूस या भव्य इतिहासापासून वंचितच राहतो. मग अनेक उत्तम लेख लिहून त्यामार्फत हा इतिहास जनसामान्यपर्यंत पोहोचावा म्हणून हे पुस्तक. अंकुर म्हणतो सध्या तरी याचे आठ भाग काढायचं डोक्यात असलं तरीही माझं उद्दिष्ट मोठं आहे आणि इतिहासही तेवढाच प्रदीर्घ आहे. अजूनही कितीतरी पुस्तकं लिहू शकेन. तूर्तास आठाचा आकडा मला दिसतोय. आजच्या पिढीकडे मोठे ग्रंथ वाचायला वेळ नाही आणि म्हणून मोठं पुस्तक लिहायला नको तर विषयांचं वर्गीकरण करून विविध भाग तयार करण्याचा विचार आहे. पहिल्या भागात अंकुरने सुरुवात केली ती भूगोलापासून. भूगोलाशिवाय इतिहास कसा सांगणार किंवा इतिहासाचा विषय म्हंटला तर भूगोल येतो कुठे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुस्तक वाचल्यावरच मिळतील. इतिहास आणि भूगोलाची उत्तम सांगड या पुस्तकातून घातली गेली आहे. वातावरण, हवामान या भौगोलिक रचनांचा परिणाम आपल्या संस्कृतीवर कसा. होतो, वास्तू शिल्पावर कसा होतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न यातून केला गेला आहे. मराठवाड्याजवळ कंधार नावाचं ठिकाण आहे, तिथे पुराण काळातील अग्निश्तिका आढळून आल्या. तत्कालीन सामुदायिक शेकोटीची प्रथा यातून दिसून येते. अरुण चंद्र पाठकांनी केलेल्या उत्कननात हे आढळून आलं. त्यावेळच्या थंडीच्या सम्राज्यावर यातून प्रकाश पडतो. दुसरी गोष्ट अशी की समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर जसे बदल होतात त्यामुळेच त्याकाठी असणाऱ्या किनाऱ्यांवर बदल दिसून येतात. हा सर्व भौगोलिक घटकांमुळे बदलला गेलेला इतिहास पहिल्या भागातून वाचायला मिळतो.
ठाण्यातील सरस्वती मंदिर शाळेतून शालेय शिक्षण अंकुरने पूर्ण केलं. शाळेत सहाव्या इयत्तेत शिकताना त्याच्या आईने घरात एक स्कीम आणली. दिवाळीत आपण जे फटाके घेतो तेवढ्या पैशाची पुस्तकं अंकुरच्या घरात जमू लागली. त्यात गोष्टीची पुस्तकं होती, काही इतिहासाची होती, तेव्हापासून त्याला वाचनाची सवय लागली. यावेळी राजा मंगळवेढेकर यांच्या 10 पुस्तकांचा एक संच होता. इतिहास भारताचा, प्राचीन भारतविषयी वाचताना त्याच्या मनात त्याचं उदिष्ट ठरलं. इतिहास हा विषय घेऊनच लेखन व साहित्यनिर्मिती करायची. साधारण याच वेळेच्या सुमारास नाणेघाट ट्रेक केला. त्याच्या आईनेच त्याला पाठवलं होतं. त्या गूढ रम्य वातावरणातून त्याच्या आयुष्याचं ध्येय निश्चित झालं.
शाळा संपली, आर्टस् मधून पदवी परीक्षा उत्तीझाला परंतु त्यात अजून अभ्यास करण्याईतका वेळ त्याच्याकडे नव्हता. आई आणि बाबा दोघेही सेवानिवृत्त होत होते. अशावेळी आपलं करियर थोडं दूर ठेवून त्याने सॉफ्टवेअर डिझाईनिंग आणि आयटी क्षेत्रातील काही कोर्स केले. नोकरीची अत्यंत आवश्यकता असल्याने इतिहासाचं वेड काही काळ बाजूला सरावं लागलं. त्यानंतर त्याने 6 ते 7 वर्षे फायनान्स सेक्टर मध्ये काम केले. शेवटची नोकरीं त्याने पुण्यात करायची ठरवली. पुण्यात इतिहास, संशोधन, पुरातत्व अशा विषयांवर काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर भेटतील हा एकमात्र उद्देश ती नोकरीं स्वीकारण्यामागे होता. याचकाळात इतिहास विषय घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम ए ची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात अभ्यासासाठी जायला सुरुवात केली. यावेळी पुरातत्व विषयात काम करणारी मंडळी मित्र म्हणून लाभली. त्याची खऱ्या अर्थाने इतिहास अभ्यासक म्हणून ओळख इथून सुरुवात झाली. यावेळी एका विशिष्ट दिशेने वाचनाची सुरुवात झाली. यानंतर दुर्ग संवर्धन मोहिमाता आखल्या. सध्या तो शाळेतल्या मुलांना इतिहास या विषयाबाबत ओळख करून देतो. काही अंतरराष्ट्रीय शाळा मध्ये इतिहास हा विषयच नाही, अशावेळी, शिबीर आणि हेरिटेज वॉक च्या माध्यमातून मुलांना इतिहासाची गोडी लावायचं महत्वाचं काम तो करतो आहे.
सध्या तो जेष्ठविश्व् या त्रिमासिकासाठी स्तंभ लेखन करतो आहे. तलाव ते टॉवर या कॉफ़ी टेबल पुस्तकासाठी काही लेखन त्याने केले आहे. मराठी विश्व्कोषाच्या निर्मितीत त्याचा खारीचा वाटा आहे. विश्व् कोशासाठी काही लेखाचे परीक्षण त्याने केले आहे तर काही लेख त्याने लिहिले आहेत. त्याच्या कार्यातून इतिहासाला नवनवीन अंकुर फुटूदे हीच सदिच्छा. दै. मुंबई तरुण भारत कडून अंकुरला पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.