फेक न्यूज...

    08-Mar-2023   
Total Views |
Man Fake Videos Of Workers Attacked In Tamil Nadu


आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ‘फेक न्यूज’ आणि खरी बातमी यात फरक करणे म्हणजे दुधातून पाणी वेगळ्या करण्यासारखेच. कारण, या ‘फेक न्यूज’ची मांडणीच अशा स्वरुपात केली जाते की, या बातम्या अगदी तंतोतंत खर्‍या भासाव्या. अशाच एका ‘फेक न्यूज’च्या घटनेने बिहार आणि तामिळनाडूमध्ये एकच गदारोळ उडाला आणि त्यावर राजकारणही एकाएकी तापू लागले.तामिळनाडूमध्ये काम करणार्‍या बिहारी कामगारांना मारझोड केल्याचा आणि त्यामुळे एका मजुराची मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर वार्‍यासारखी पसरली. नुसती बातमीच नाही, तर मारहाणीचे व्हिडिओ वगैरेही ‘व्हायरल’ झाले. इतके की, काही बिहारी मजुरांनी तामिळनाडूतून काढता पाय घेतला. बिहारमध्येही साहजिकच या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी यात उडी घेतली. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी तर तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चाही केली आणि उपमुख्यमंत्री लालूपुत्र तेजस्वी यादव तर स्टॅलिन यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचेही वृत्त आले. पण, कालांतराने तामिळनाडू आणि बिहारच्या पोलिसांनी केलेल्या तपासात अशी कुठल्याही प्रकारची मारहाण, हत्या झाल्या नसल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. हे सगळे जुने फोटो, व्हिडिओ ‘व्हायरल’ करणार्‍या व्यक्तीच्या तामिळनाडूमधील थ्रिसुरमधून पोलिसांनी मुसक्याही आवळल्या. पण, जर पोलिसांनी हाच तपास, हीच तत्परता व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्या झाल्या दाखवली असती, तर कदाचित पुढचा सगळा द्राविडी प्राणायाम टाळता आला असता. पण, असो ‘देर आए दुरुस्त आए’ म्हणायचे! बिहारी मजूर, कामगार हे बहुतांशी अशिक्षित, कमी शिकलेले. त्यामुळे त्यांना खरे काय, खोटे काय याची शहानिशा करता येणे कठीणच. पण, कहर म्हणजे काही नामांकित हिंदी दैनिकांनी, वृत्तवाहिन्यांनी सोशल मीडियावरील या जुन्याच कुठल्या तरी मारहाणीच्या व्हिडिओला सत्य मानून त्याचे भडक मथळे रंगवले. ‘उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत’ असा त्यात रंग भरला गेला. राजकारण्यांनीही पुढे याच घटनेची री ओढत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. अशा या एका ‘फेक न्यूज’मुळे सरकारी यंत्रणेचा वेळ, पैसा तर फुकट गेलाच, शिवाय मजूरवर्गात घबराटदेखील पसरली. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा ‘फेक न्यूज’वर जनतेनेही आंधळेपणाने विश्वास न ठेवणेच योग्य!
 
रिअल राजकारण...


न्यूज ‘फेक’ असली तरी यावरून राजकीय लाभ लाटण्याची संधी कुठल्याही पक्षाने दवडली नाही, असे हे ‘रिअल’ राजकारण. यात सर्वाधिक आघाडीवर होते साहजिकच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. आता नितीशबाबूंवरील जनतेचा विश्वास हा आधीच इतका डळमळला आहे म्हटल्यावर नितीशबाबूंनीही बिहारी अस्मितेचा राग आलापला. बिहारच्या मजुरांवरील हल्ला म्हणजे आमच्या अस्मितेवर घाला वगैरे असे भावनिक कार्ड नितीशबाबूंनी खेळले. मुख्यमंत्री म्हणून आपल्याला बिहारी मजुरांची किती चिंता सतावते, म्हणून बिहार पोलिसांची एक टीमच त्यांनी तामिळनाडूला पाठवली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याशी याबाबत म्हणे आपला आक्षेपही नोंदवला. पण, आजही बिहारी मजुरांना बिहार सोडून देशभरातील इतर राज्यांत रोजीरोटीसाठी का स्थलांतर करावे लागते, त्यावर दूरगामी उपाय इतकी वर्षं खुर्ची उबवणार्‍या नितीशबाबूंना कधी शोधताच आलेला नाही.एका आकडेवारीनुसार, तर बिहारमधून देशभरात स्थलांतर करणार्‍यांचा आकडा हा तब्बल एक कोटींच्या घरात आहे. खरंतर ही संख्या त्याहूनही जास्त असावी. ‘कोविड’ काळात देशभरातून मिळेल त्या मार्गांनी बिहारमधील आपले घर गाठण्यासाठी धडपडणार्‍या या मजूरवर्गाचे हाल आपल्या स्मरणात असतीलच. परंतु, त्यानंतरही नितीशबाबूंनी घोषणांच्या आणि आश्वासनांच्या पलीकडे हे देशांतर्गत स्थलांतर थांबविण्यासाठी विशेष काहीही प्रयत्न केले नाही. बिहारमधील उद्योगधंद्यांची दुरवस्था, पायाभूत सोईसुविधांचा अभाव, गुंडाराज, कुशासनामुळे व्यावसायिक या राज्याकडे पाठ फिरवतात. म्हणूनच मग बिहारमधील मजुरांची पाऊलं आपसुकच दिल्ली, मुंबई, चेन्नई यांसारख्या अशा मनुष्यबळाची मोठी मागणी असणार्‍या शहरांकडे वळतात. परिणामी, या महानगरांवरील ताण वाढतो आणि त्याचे रुपांतर वाढती गुन्हेगारी आणि बकालीकरणात होते. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशची अवस्थाही अशीच होती. परंतु, योगी सरकारने ‘एक जिल्हा, एक उत्पादन’, कौशल्य विकास आणि लघुउद्योगांपासून ते मोठ्या उद्योगधंद्यांसाठी राज्याचे दरवाजे खुले केल्यामुळे उत्तर प्रदेशमधील स्थलांतरित मजुरांचा टक्का कमी झाला. त्यामुळे अस्मितेपेक्षा या मजुरांनी स्वराज्यातच ‘आत्मनिर्भर’ व्हावे म्हणून प्रत्येक राज्याने सक्षम धोरण आखले, तरच या मजुरांचे आणि पर्यायाने देशाचे कल्याण होईल, हेच खरे!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची