रामराज्य

    29-Mar-2023
Total Views |
‘रामराज्य’ हा शब्द कल्याणकारी राज्याचे प्रतीक आहे. तो केवळ एक रूढ शब्द किंवा वाक्प्रचार नव्हे, अमूर्त स्वप्न नव्हे, तर भारतीय दंडनीतीचे ते साकार रूप आहे. ‘रामराज्य’ या शब्दात प्रचंड आध्यात्मिकशक्ती सामावली आहे. प्रकांड पंडितांना हा शब्द जितका प्रेरणादायी वाटतो, तितकाच लौकिकदृष्ट्या अज्ञानी माणसांनाही हा शब्द अभय, आशा आणि दिलासा देतो. निरनिराळ्या व्यक्तींना रामाची निरनिराळी रूपे भावतात. रामराज्याचा स्रोत हेही मनाला भावणारे, विचारशक्तीला चालना देणारे आणि कार्यशक्तीला आव्हान देणारे रामाचे एक रूप आहे. समृद्ध भारतीय परंपरेचा वारसा असलेले रामराज्य हे आदर्श राज्याचे प्रतिभाशाली प्रारूप राज्यकर्त्यांना अनायासे लाभले आहे. त्याचे डोळस अन्वेक्षण आणि उपयोजन करणे कल्याणकारी राष्ट्रनिर्माणासाठी हितकारक ठरेल.

rama 
 
रामराज्याची संकल्पना
 
रामराज्याची संकल्पना ही रामाच्या दूरदृष्टीतून साकार झाली आहे. या संकल्पनेत स्वतः रामानेच आदर्श राजा अर्थात आदर्श प्रशासक कसा असावा, अमात्य, सेनापती तसेच अन्य अधिकारी यांच्या पात्रतेचे निकष कोणते असावेत, त्यांच्या कार्यक्षेत्राची विभागणी कशी करावी, त्या त्या कार्याची अंमलबजावणी होते किंवा नाही, याविषयी दक्षतेची मार्गदर्शक तत्त्वे कोणती असावीत आणि राज्यात कोणत्या सुविधा असाव्यात, याचे संक्षिप्त तरीही परिपूर्ण असे विवेचन केले आहे. या विवेचनात दंडनीतीच्या ग्रंथांमधून आढळून येणार्‍या ‘धर्मशास्त्र’, ‘आन्वीक्षिकी’, ‘त्रिवर्ग’, ‘चतुर्वर्ग’, ‘सप्तवर्ग’, ‘अष्टवर्ग’, ‘विंशतिवर्ग’, ‘षाड्गुण्य’, ‘प्रकृतिमंडल’, ‘यात्रा’, ‘संधी’, ‘विग्रह’, ‘दंडविधान’ या पारिभाषिक संज्ञांवरून रामाने राजनीतीचे सखोल अध्ययन केले आहे आणि त्याच्या उपयोजनाचा आराखडाही नजरेसमोर ठेवला आहे, हे लक्षात येते. हे विवेचन रामाने भरताला विचारलेल्या प्रश्नमालिकेच्या स्वरूपात आले असून, राजनीतीसारख्या गहन विषयाचे या ठिकाणी रामाने सहज सुलभ भाषेमध्ये निवेदन केले आहे. राज्याच्या सुव्यवस्थेविषयी राम भरताला मार्मिक प्रश्न विचारतो. प्रश्नामागून आलेले प्रश्न रामराज्याच्या संकल्पनेचा पट आपल्या डोळ्यांसमोर उलगडत जातात. या संपूर्ण तपशीलाचे वर्णन वाल्मिकिरामायणाच्या अयोध्या कांडातील शंभराव्या अध्यायात आलेले आहे.
 
आदरस्थाने आणि मंत्रणा
 
रामराज्यामध्ये वडीलधारी माणसे, गुरू, वृद्ध तसेच शस्त्रास्त्र विद्या, अर्थशास्त्र जाणणार्‍या आचार्यांचा मान राखला जातो. राजासाठी मंत्र म्हणजेच गुप्त सल्लामसलत अतिशय महत्त्वाची आहे. राम म्हणतो,
 
मन्त्रोविजयमूलंहिराज्ञांभवतिराघव।
सुसंवृतोमन्त्रधरैरमात्यै: शास्त्रकोविदै:॥
कच्चिन्मन्त्रयसेनैक: कच्चिन्नबहुभि: सह।
कच्चित्तेमन्त्रितोमन्त्रोराष्ट्रंनपरिधावति॥(17,19)
 
उत्कृष्ट मंत्रणा राजाच्या विजयाचे मूलकारण आहे. मात्र, नीतिशास्त्र जाणणार्‍या व मंत्रशास्त्रकुशल अशा अमात्यांनी ती मंत्रणा गुप्त ठेवली, तरच ती यशस्वी होते. राम असेही म्हणतो की, एकट्याने इतरांशी सल्लामसलत करू नये. अर्थातच सल्लामसलतीत जाणत्या लोकांचा सहभाग असावा. मात्र, जाणत्या लोकांची संख्यादेखील मर्यादितच असावी. सल्लामसलतीचे तपशील शत्रू राष्ट्रांपर्यंत पोहोचणार नाहीत, याची सर्वतोपरी खबरदारी घ्यावी.
 
कुशल प्रशासकाने ज्याला कमीत कमी साधने लागतील आणि ज्याचे फळ मोठे असेल, अशा कार्याचा संकल्प करावा आणि या कार्याचा संकल्प केल्यावर ते कार्य प्रलंबित होत नाही याची दक्षता घ्यावी. (कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयम्।
क्षिप्रमारभसे कर्त्तुं न दीर्घयसि राघव॥20)
 
सक्रिय राज्यप्रमुख भविष्यकाळ नजरेच्या टप्प्यात ठेवून योजना आखत असतात. रामाने या बाबतीत मोलाचा सल्ला दिला आहे. तो म्हणतो, कुशल प्रशासकाने हाती घेतलेले कोणतेही कार्य पूर्ण होण्याच्या बेतात आल्यावरच किंवा पूर्ण झाल्यावरच अन्य राजांच्या कानी येते. त्याच्या भावी कार्यांचा अन्य राजांना थांगपत्ताही नसतो. त्याने स्वतः जे संकल्प प्रकट केले नाही किंवा त्याच्या अमात्यांनीही प्रकट केले नाही, त्यांची चाहूलही इतरांना लागत नाही.
 
नियुक्ती
 
कुशल प्रशासक हे जाणतो की, अर्थसंकट उद्भवले असताना जाणता पुरुषच मोठे कल्याण करू शकतो. म्हणून सहस्र अज्ञ लोकांच्याऐवजी तो एकाच जाणत्या अधिकारी पुरुषाची नेमणूक करतो. त्याला जाणीव असते की, मेधावी, शूर, दक्ष, चतुर असा एकच मंत्री राजाला किंवा राजपुत्राला मुबलक संपत्ती प्राप्त करून देऊ शकतो. कुशल प्रशासक प्रधान श्रेणीच्या व्यक्तींवर प्रधान, मध्यम श्रेणीच्या व्यक्तींवर मध्यम आणि निम्न श्रेणीच्या व्यक्तींवर निकृष्ट कामे सोपवितो. (कच्चिन्मुख्या महत्स्वेव मध्यमेषु च मध्यमा:।
 
जघन्यास्तु जघन्येषु भृत्या: कर्मसु योजिता:॥26)
 
तो लाचलुचपत न घेणार्‍या, निष्कपट, वाडवडिलांच्या काळापासून काम करणार्‍या, पवित्र, अंतर्बाह्य शुद्ध असलेल्या लोकांनाच कार्यामध्ये नियुक्त करतो. धाडस, शौर्य, धैर्य, पवित्र, कुलीन, दक्ष आणि राजावर अनुरक्त असलेल्या व्यक्तीचीच सेनापती म्हणून नियुक्ती करतो. राजदूताच्या पदावर नियुक्त केलेला पुरुष आपल्याच देशाचा निवासी असेल आणि तो विद्वान, कुशल, वाक्चतुर तसेच त्याला सांगितले असेल तेच दुसर्‍या पक्षाला सांगणारा आणि सद्सद्विवेकबुद्धीने युक्त, सारासार विचार करणारा असेल याची तो खबरदारी घेतो.
 
(कच्चिज्जानपदो विद्वान् दक्षिण: प्रतिभानवान्।
यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरत पण्डित:॥36)
 
त्याचे मुख्य योद्धे बलवान, युद्धकलानिपुण आणि पराक्रमी असतात. तो त्यांच्या शौर्याची परीक्षा करतो आणि त्यांचा यथायोग्य सन्मान करतो. कुलीन असे मंत्री आणि प्रधान अधिकारी त्या प्रशासकावर प्रेम करतात आणि त्याच्यासाठी प्रसंगी प्राणत्याग करायलाही मागेपुढे बघत नाहीत. मात्र, मंत्र्यांना देखील तो प्रजेवर कठोर दंडाचा प्रयोग करण्याची मुभा देत नाही. प्रजेकडून तो मर्यादेपेक्षा अधिक कर वसूल करत नाही. कर्मचारी त्याच्यापासून परावृत्त होत नाहीत किंवा ते त्याच्या अगदी निकटही येत नाहीत. कर्मचार्‍यांशी तो मध्यम मार्ग स्वीकारून आचरण करतो.
 
ज्या शत्रूंना राज्यातून बाहेर पिटाळले असेल ते जर पुन्हा परत आले, तर ते दुबळे आहेत असे समजून तो त्यांची उपेक्षा करत नाही. तो साम-दामादी उपायांच्या प्रयोगामध्ये कुशल असलेल्या विश्वासू सेवकांनाही कपटाने स्वतःकडे वळविणार्‍या, शूर आणि ऐश्वर्याची लालसा असणार्‍या पुरुषाचा नायनाट करतो.
 
वेतन आणि राष्ट्र निर्माण
 
राष्ट्रात अराजक निर्माण होऊ नये, यासाठी तो प्रतिबंधक उपाय योजतो. खबरदारीचे धोरणात्मक तत्त्व म्हणून सैनिकांचे निश्चित केलेले योग्य ते वेतन त्याचप्रमाणे भत्ता तो योग्यवेळी देतो आणि त्यात विलंब होऊ देत नाही. वेतन आणि भत्ते उशिरा मिळाले तर सैनिक स्वामीवर क्रुद्ध होतात आणि त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते, याची त्याला जाणीव असते. त्याची आर्थिक आवक जास्त असते आणि व्यय कमी असतो. त्याच्या खजिन्यातील धन अपात्र लोकांच्या हातात जात नाही.
 
(आयस्ते विपुल: कच्चित् कच्चिदल्पतरो व्यय:।
अपात्रेषु न ते कच्चित्कोशो गच्छति राघव॥55)
 
शेतीचा विकास करणे, व्यापारामध्ये वृद्धी करणे, पूल निर्माण करणे, अधिकाधिक खाणींवर ताबा मिळविणे आणि निर्जन प्रदेश वसविणे याकडे राज्यकर्त्याचे लक्ष असते. कृषी आणि व्यापार यामुळेच राज्य उन्नतीशील होते, या जाणिवेमुळे तो व्यापारी वर्गाच्या अडचणींचे निवारण करतो, तसेच त्यांना इष्ट त्या सवलती प्राप्त करून देतो.
 
तो राज्यातील सर्व दुर्गांमध्ये धन-धान्य, जल, अस्त्र-शस्त्र, कारागिर आणि सैनिक मुबलक असतील याची दक्षता घेतो. शत्रूंच्याबाबतीत त्यांच्याशी तह कधी करावा, युद्ध केव्हा करावे, आक्रमण कधी करावे, योग्य संधीची वाट कधी पाहावी, दुटप्पीपणे कधी वागावे आणि बलवानाला कधी शरण जावे, याविषयी तो योग्य निर्णय घेतो. कुशल प्रशासक अवेळी निद्रेच्या अधीन होत नाही. तो योग्य वेळी जागा होतो आणि रात्रीच्या उत्तर प्रहरात द्रव्य प्राप्तीच्या उपायासाठी चिंतन करतो.
 
आदर्श राज्य
 
आदर्श राज्याची कल्पना अयोध्येच्या प्रतिकृतीवर आधारलेली आहे. राम म्हणतो की, त्याचे राज्य देवालये, पाणपोयांनी आणि खाणींनी समृद्ध आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याठिकाणी शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही. नद्यांच्या पाण्यावरच पिके घेता येतात. ज्या शेतीला पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत नाही, अशा शेतीला ‘अदेवमातृका’ अशी पारिभाषिक संज्ञा आहे.
 
(अदेवमातृको रम्य: श्वापदै: परिवर्जित:।
परित्यक्तो भयै: सर्वै: खनिभिश्चोपशोभित:॥46)
 
येथे जंगलांची काळजी घेतली जाते आणि पशूंची समृद्धी असते. रामराज्यामध्ये धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थांमध्ये समतोल राखला जातो.
 
न्यायदान
 
कुशल प्रशासक कधीही निर्दोष, निरपराध आणि शुद्ध पुरुषावर निष्कारण आरोप ठेवत नाही आणि कोणी तसा आरोप ठेवल्यास, शास्त्रज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्याला आर्थिक दंड देत नाही. पण, त्याचवेळी त्याच्या राज्यात चोरी करताना सापडलेल्या, चोरीचा आरोप सिद्ध झालेल्या चोराला धनाच्या लालसेने आरोपातून मुक्त केले जात नाही. जर गरीब आणि श्रीमंतांमध्ये कलह निर्माण झाला आणि तो न्यायालयात दाखल झाला, तर त्याच्या राज्यातील मंत्री त्याबाबतीत निरपेक्षपणे विचारविनिमय करतात.
‘राम’ या शब्दाचा अर्थ ज्यामध्ये मन रमते व ज्यामुळे आनंद लाभतो असा आहे. अर्थातच, ‘रामराज्य’ म्हणजे असे राज्य की, ज्यामध्ये श्रीमंत आणि गरीब, अनाथ, पीडित आणि दीन-दुबळे, सधन आणि शक्तिशाली, प्रशासक आणि प्रजा यांना आनंद प्राप्त होतो. रामराज्याची संकल्पना आजच्या काळात साकार करण्याचे उत्तरदायित्व आपल्या सगळ्यांवरच आहे, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.
 
- डॉ. कला आचार्य
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.