मला गवसलेला राम...

    29-Mar-2023
Total Views | 101
 
मला प्रभू श्रीराम कसे आणि कुठे दिसतात, असे कोणी विचारले, तर मी म्हणेन, जिथे सत्य आहे तिथे राम आहे, जिथे राष्ट्रीय कर्तव्य आहे तिथे राम आहे आणि भारतात जिथे जिथे स्वत्वाची ओळख आहे, तिथे राम आहे. भारताच्या संस्कृतीत राम आहे. आचरणात राम आहे. भारताच्या प्रत्येक घराघरात रामनामाची शिकवण वसलेली आहे.


MPLodha - ShreeRam
 
वाल्मिकी रचित हिंदू महाकाव्य रामायणामध्ये प्रभू श्रीरामाच्या जीवनाचा आणि शिकवणींचा महत्त्वपूर्ण भाग अधोरेखित केलेला आहे, जो आपल्या सर्वांना दैनंदिन जीवन जगत असतानादेखील कामी येतो. महत्त्वाची बाब म्हणजे, या भारतवर्षात राहणारे आपण सर्वजण प्रभू श्रीरामांचे आचारविचार नित्य नियमितपणे आणि भक्तिभावाने जगत आहोत आणि आपले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत.
 
भारतात रामनवमीच्या उत्सवामध्ये विविध विधी आणि परंपरांचा समावेश होतो. या प्रथा आणि परंपरा भारतातील प्रत्येक प्रदेशानुसार बदलतात. दक्षिण भारत आणि उत्तर भारतात याबाबत विविधता दिसून येते. तरी देखील रामनवमीच्या उत्सवाचे मूलभूत महत्त्व हे प्रभू श्रीरामांचे जीवन आणि त्यांच्या आयुष्यातील तत्वांची शिकवण साजरी करणे, तसेच आनंदी आणि फलदायी जीवनासाठी त्यांचे आशीर्वाद मिळवणे, हीच राहिली आहे.
 
भारतीय उपखंडामध्ये प्रभू श्रीराम हे भारतीय अध्यात्म, धार्मिकता, सत्य आणि सद्गुण यांचे मूर्त स्वरूप मानले जातात आणि त्यांचे जीवन आणि शिकवण ही जगभरातील हिंदू समाजासाठी प्रेरणास्थान मानली जाते. त्यांचे जीवन आणि शिकवण हिंदू महाकाव्य रामायणात आहे, जो हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा आणि आदरणीय ग्रंथ आहे. परंतु, ‘राम’ ही संकल्पनाच मुळात भारतीय संस्कृतीच्या आचरणात वसलेली आहे.
 
भगवान राम आज्ञाधारक पुत्र, प्रेमळ भाऊ, आदर्श पती आणि न्यायी राजा होते. ते अगदी कौशल्याने, त्याग आणि करुणेचे जीवन जगले आणि त्यांची शिकवण आजही जगभरातील लाखो नागरिकांना प्रेरणा देत आहे. प्रभू श्रीरामांचे जीवन हे आपल्याला खरा न्यायप्रिय मित्र, न्यायी आणि दयाळू राजा बनण्यास आणि आपल्या पालकांना आणि भावंडांवर प्रेम आणि आदर करण्यास शिकवते. त्यांच्या शिकवणीमध्ये धार्मिकतेच्या मार्गाचे अनुसरण करण्यावर आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आत्म-नियंत्रण, संयम आणि चिकाटीवर अधिक भर देण्यात आलेला आहे.
 
माझ्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनातील आचरणात प्रभू श्रीरामांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे प्रत्येक गुण मला भावतात. माझ्या मते, रामराज्य हे लोकशाहीचे एक आदर्श उत्तम उदाहरण आहे. रामायणामध्ये आपल्या लोकशाहीतील सर्व समस्यांचे उपाय सापडतात आणि लोकशाहीत न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा कसा असावा, याचे सर्व उपाय रामायणाच्या प्रत्येक प्रसंगांमधून अधोरेखित होतात.
 
‘रामराज्य’ ही संकल्पना आपल्या भारतीय सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य घटक आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही आणि हे आपल्याला विसरून देखील चालणार नाही. या ‘रामराज्या’ची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आजवर अनेकांनी राज्यकारभार केला. ज्यामध्ये महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची नावे अग्रक्रमाने घेता येतील. याच ‘रामराज्या’ची स्थापना करण्याचा हाच आदर्श पुढे ठेवूनच, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्र सेवा करत आहेत. स्वराज्य आणि सुराज्य यातील फरक अधोरेखित करून, भारत देशाला स्वराज्याकडून सुराज्याकडे घेऊन जाण्याचे काम सद्यःस्थितीत होत आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलन आणि त्यानंतरच्या काळात घडलेल्या घटना ही खरंतर राष्ट्र चेतनेची पुनर्जागृती होती. या सर्व घटनांचा विचार करता, राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे, यात कसलेही दुमत नाही. राम जन्मभूमी आंदोलन काळातील वातावरणाच्या माझ्या देखील काही आठवणी आहेत. या आठवणी कायम प्रेरणा देत राहतात आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देतात.
 
भारतीयांसाठी राम आणि रामराज्य हे सुशासन, प्रगती, समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे. मी पाहिलेला राम, मला या प्रत्येक स्वरुपात दिसून येतो. भारतीय प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास आपल्याला सांगतो की, प्रभू श्रीरामांच्या राजवटीत दारिद्य्र, विकार, शोक किंवा भेदभाव यांना थारा नव्हता. त्यांनी प्रत्येक नात्याला आणि व्यक्तीला तत्काळ न्याय दिला. त्यामुळे ‘रामायण’ हे अशा भारतीय महाकाव्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये आपल्या सर्वांचे दैनंदिन जीवन बदलण्याची अफाट क्षमता आहे. एखादे व्यवस्थापन असो किंवा वैयक्तिक जीवन असो, युगानुयुगेही छोट्या-छोट्या प्रसंगातून आपल्याला प्रेरणा देण्याचे कार्य प्रभू श्रीराम आणि रामायण करणार आहे.
 
सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आणि आपल्याही जीवानात राम आचरणात आणून राष्ट्रीय कार्य करावे, याच सदिच्छा आहेत.
 
- मंगलप्रभात लोढा, पर्यटन व महिला-बालविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121