राम द्यावा, राम घ्यावा...

    29-Mar-2023
Total Views |
 
सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या रामकथेतील प्रसंगाची चित्रमाला, ‘मर्यादा पुरुषोत्तम’चे प्रदर्शन 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत कलारसिकांसाठी जहांगीर कलादालनात संपन्न झाले. त्यानिमित्ताने, ‘मर्यादा पुरुषोत्तम’ रेखाटण्याची संकल्पना, प्रभू श्रीराम आणि ‘रामायणा’तील व्यक्तिरेखांंच्या मनोवेधक चित्रप्रदर्शनाला सर्वच स्तरातून मिळालेला उत्तम प्रतिसाद, याविषयी वासुदेव कामत यांनी ‘मुंबई तरुण भारत’शी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात...

raam ghyava 
 
मी दरवर्षी प्रदर्शनासाठी एका विषयाची निवड करतो. त्या विषयावरती संशोधन करणे, चिंतन करणे, अगदी साहित्यिक करतात, त्याप्रकारचे संशोधन नसले, तरी माझा विषय प्रफुल्लित कसा होईल, यासाठी माझे संशोधन सुरू असते. मग, त्या आधारावर मला जे मनात दिसते, तसे मी चित्र साकारत जातो. आतापर्यंत मी असे अनेक विषय हाताळले आहेत. पूर्वी प्रत्येक विषयाला पौराणिक आधार आहे की, ती केवळ पिढीजात सांगितलेली घटना आहे की, आजही आपण तो विषय अनुभवतो, हा विचार करून मी विषयांची निवड करीत असतो. प्रतीक्षा, बालपण, गुरुशिष्य, मनुष्य-प्राणी संबंध, कृष्ण, गजानन, संतवचने असे करता-करता कालिदासाचे ‘मेघदूत’ आणि ‘शाकुंतल’ हे विषय गेल्यावर्षी मी घेतले होते, तर यावर्षी ‘रामायण’ हा विषय निवडला. अनेकांनी दसर्याकच्या मुहूर्तावर हा विषय का निवडला? असा प्रश्न केला; पण खरेतर हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल.
 
हा विषय ठरविण्याचे कारण असे की, दर रामनवमीला मी बाबूजींचे संपूर्ण ‘गीतरामायण’ ऐकतो. बाबूजींचे स्वर, शब्दप्रभुत्व... पण नंतर तो विचार मनातून विरून जायचा. तेव्हा या वेळी ‘रामायण’ हाच विषय घ्यायचे, असे ठरवले. हा विषयच असा आहे की, वाल्मीकी रामायणापासून ते गदिमांपर्यंत अनेक साहित्यिकांनी, कवींनी, प्रकांड पंडितांनी या विषयावर भरपूर काम केले आहे. तेव्हा “वासुदेव तू वेगळे काय करून दाखविणार”, असे वाटायचे. मग, या विषयावर चित्रमाला करायची की, नाही हाही विचार आला. तेव्हा रामसेतू बांधतानाची खारीची गोष्ट आठवली. अनेक वानर आणि रामाचे बलाढ्य साथी भलेमोठे दगड आणि वृक्ष टाकून सेतू बांधत होते. त्या वेळी एक खार आपल्या अंगाला वाळूचे कण लावून जमेल त्याप्रमाणे त्या दगडांच्या खाचेत भरत होती. त्यामागे तिची भावना हिच होती की, त्या पवित्र कार्यामध्ये आपलाही काहीतरी वाटा असावा. यावरून ‘खारीचा वाटा’, ‘खारीची सेवा’ हा वाक्प्रचार रूढ झाला. मग, मला वाटले की, भले इतरांनी या विषयात काम केले असेल; पण आपली चित्रे केल्याने काही उणीव निर्माण होणार नाही. उलट, ती भरण्याचे काम आपली चित्रे करतील; पण एक चित्र अनेक गोष्टी सांगून जाते. त्या दृष्टिकोनातून मग मी संपूर्ण चित्रमाला रेखाटली. जवळजवळ एक चित्र सोडले, तर प्रत्येक चित्रात खार दिसते. ती खार म्हणजे मी. मी...त्या प्रत्येक प्रसंगाचा साक्षीदार...
 
25 मे, 2014 रोजी माझे पहिले चित्र पूर्ण झाले. आधी खूप विचार केला की, सुरुवात कुठून करायची. मग, हनुमंताच्या चित्रापासूनच सुरुवात करायचे ठरले. असे पौराणिक विषय हाताळताना अनेकांचा प्रश्न असतो की, अमूक एक संदर्भ तुम्ही कुठे मिळवला? त्यामुळे संदर्भासाठी ‘तुलसी रामायण’, ‘वाल्मीकी रामायण’, मुरारीबापूंची व्याख्यानेही मी ऐेकली. तेव्हा जिज्ञासूंच्या प्रश्नांना उत्तरे देता येतील, म्हणून यासंदर्भांचा ढाल म्हणून वापर करता येईल, असा त्यामागे विचार होता. हनुमंत आपले हृदय उघडून दाखवतोय, या चित्रापासून सुरुवात केली आणि मी त्या प्रेरणेने संपूर्ण मालिका रंगविली. रामायण हे सर्व भाषांमध्ये भारतात झाले आहे, म्हणून सर्व लिपींमधून मी त्या चित्रावर अक्षरे लिहिली. सप्टेंबर अखेरपर्यंत अशी एकूण 28 चित्रे तयार झाली. अठ्ठावीसच का, तर त्याला काही ठोस कारण नाही. गॅलरीची मर्यादा असते इतकेच...
 
28 पैकी जवळजवळ 15 तैलचित्रे, तर 13 चित्रे जलरंगामध्ये आहेत. दोन्ही माध्यमे माझी अत्यंत आवडती... पण सारखे वाटायचे की, ही चित्रमाला पूर्ण होईल की, नाही. इतर जबाबदार्या् सांभाळून कमी वेळेतही मारुतीरायाने ही संपूर्ण चित्रमाला माझ्याकडून पूर्ण करवून घेतली, असे म्हणायला हरकत नाही. रामायण करताना सारखे वाटायचे की, आज राम हे भारतीय समाजमनामध्ये आराध्य दैवत म्हणून प्रचलित आहे. रामायणातील काही गोष्टी चमत्काराच्या आहेत, तर काही गोष्टी अतिमानवी आहेत. खरोखरच, महापुरुषांच्या जीवनामध्ये जे काही चमत्कार किंवा अतिमानवी गोष्टी असतात, त्या खर्याो होत्या की, नव्हत्या याचा मला कुठलाही अनुभव नाही; परंतु त्यांचा उपयोग मानवी मनामध्ये अंधश्रद्धा बळावण्यापलीकडे काहीही नसतो, असेच मला वाटते. त्यापेक्षा त्यांनी जे जीवन अंगिकारले, त्यांच्या जीवनातील संदेश आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याकडे महापुरुष कर्तृत्वाने मोठा होतो, त्या कर्तृत्वाकडे आपण श्रद्धेने बघतो, प्रेरणा मिळावी म्हणून त्या महापुरुषाचे चित्र किंवा मूर्ती लावतो; पण मग देण्या-घेण्याचाच व्यवहार चालू होतो आणि एक वेगळ्या प्रकारची भक्ती चालू होते, तर माझी ही चित्रे त्या प्रकारच्या भक्तीला बळी पडता कामा नयेत. माणूस म्हणून रामाच्या जीवनातून घेण्यासारखे संस्कार काय आहेत, त्याला मी महत्त्व दिले. म्हणूनच माझ्या कोणत्याही चित्रामागे रामाच्या मागे प्रभावळ दाखविलेली नाही. कारण तोही आपल्यासारखाच माणूस आहे. त्याच्याही जीवनात आपल्यासारखेच प्रसंग उद्भवले असणार... म्हणून चमत्कार झाला होता की, नव्हता अशा संदर्भाच्या विषयांना मी स्पर्श केला नाही. म्हणून सीतेच्या अग्निपरीक्षेसारखे विषय मी बाजूला सारले. रामकथा ही लोकांमध्ये संस्कार निर्माण करण्यासाठी आली असून, त्यांच्या मनात आश्चर्य निर्माण करण्यासाठी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवरायांमध्येही रामायणाच्या गोष्टींनी शौर्य आणि स्वाभिमान जागृत केला, हे आपण जाणतोच.
 
लहानपणी आईकडून-आजीकडून ऐकलेल्या गोष्टी, गदिमांचे गीतरामायण आणि दसर्याातील रामलीलेचे प्रयोग, या सर्वांमधून रामायणातील कथांचा संस्कार एकवटला गेला आणि त्याच प्रेरणेतून मी ही चित्रमाला साकारली.
 
रामायणाची सुरुवात मी दशरथाच्या कथेपासून केली आणि मग पुढे चित्र रेखाटत गेलो. लहानपणापासून त्या चार भावंडाचे बंधुप्रेम, शौर्य, वचन देणे, मैत्री, या सगळ्या गोष्टींना महत्त्व देत मी 28 चित्रे पूर्ण केली. आता या 28 चित्रांमध्ये काही महत्त्वाची चित्रे आहेत, त्यांपैकी एक म्हणजे ‘जनक सुता-सीता’. या चित्रात मला सीतेचा जन्म दाखवायचा होता. असे म्हणतात की, सीता पृथ्वीमध्ये दडलेली होती. जमीन नांगरायला गेल्यावर त्याच्यामध्ये एक पेटी होती, ज्यामध्ये सीता होती. त्या पेटीतून काढून सीतेला जनकाने वाढवले. त्यानंतरच्या ज्या तीन बहिणी आहेत, त्यासुद्धा भ्रातृकन्या आहेत. कारण जनकाला मूलबाळ नाही आणि मी एक विचार केला की, स्त्री-भ्रूणहत्या किंवा मुलगी जन्माला आली की, तिला सध्या बाहेर टाकून दिले जाते. कदाचित, तसेही झाले असेल त्या वेळी... त्यामुळे सीता जमिनीतून मिळाली की, तिला जमिनीत कोणी टाकले होते, हा ज्याच्या-त्याच्या संशोधनाचा विषय आहे. जनकांनी मंगलसूचक या दृष्टिकोनातून त्या कन्येला (सीतेला) घरी आणले, तिला वाढवले. दशरथाच्या तिन्ही राण्यांची नावे माहिती आहेत, चारही भावंडांच्या पत्नीची नावे माहिती आहेत; पण जनकाची पत्नी कोण, याची माहिती नाही. त्याचा असेलही उल्लेख; परंतु त्याचे फारसे महत्त्व नाही. तेव्हा जनकाने सीतेला मातृत्व आणि पितृत्व असे दोन्ही प्रकारचे प्रेम दिले आणि म्हणून चित्रांमध्ये नांगर, पेटी आणि मंगलसूचक हाताचे चिन्ह मी दाखविले आहे. चित्रामध्ये सीतेने जनकाचे बोट धरले आहे आणि जनकाच्या चेहर्याचवर आणि एकूणच हावभावात मातृत्वाची भावना स्पष्टपणे दिसून येते. म्हणून ‘जनक सुता-सीता’ अर्थात, जनकाची कन्या सीता. ही सर्व कुठलीही प्रसंगचित्रे नाहीत. कारण प्रसंगचित्र म्हटली की, त्यामध्ये वर्णने असतात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे वर्णन नाही. वर्णनापेक्षा रंगयोजना, देहबोली अशाप्रकारे दिलेली असते ती की, त्यातला भाव, बोधच अनुभवता येईल. तोच प्रेक्षकाच्या मनामध्ये संक्रमित होईल. अशाच प्रकारे मी सगळी चित्रे केली आहेत. व्यावसायिक नाटकांमध्ये सेट्स असतात, पेहराव-वेशभूषाही अगदी सत्य वाटावी अशीच असते; पण याउलट प्रायोगिक नाटकांमध्ये एवढे मोठे सेट्स नसतात किंवा ती नाटके वर्णनात्मक नसतात. नेमके भाव अभिनयातून कसे संक्रमित होतील, त्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे माझी चित्रेही अशीच असतात की, ज्याचा आशय थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडेल.
 
दुसरे एक चित्र म्हणजे ‘आकाशाशी जडले नाते.’ या चित्रामध्ये दाखवलेय की, राम हे व्यक्तिमत्त्व इतके जबरदस्त आहे की, त्याच्या वागणुकीची उत्तरे भल्याभल्यांना शोधता येत नाहीत आणि म्हणून तो कोणीतरी अलौकिक असे म्हटल्यावर प्रश्नच येत नाही... तो विष्णूचा अवतार.. तोच जाणे खरे काय ते... इतके ते महान व्यक्तिमत्त्व आहे की, आपल्या पत्नीवरती प्रचंड प्रेम करतो, तिला सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करतो आणि मनामध्ये दु:ख साठवून कठोरसमयी तिचा त्यागसुद्धा करतो. तेव्हा त्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा हा आकाशापर्यंत भिडलेला आहे. त्याचा थांगपत्ता लागत नाही; परंतु त्याचे पाय जमिनीवर आहेत आणि सीता ही भूमिकन्या आहे. याचे दोन अर्थ होऊ शकतात की, ती कृषिवलाची किंवा जनकाची कन्या आहे आणि ती गवसणी घालतेय म्हणून चित्रात सीतेच्या टाचा उंचावलेल्या दाखविल्या आहेत. आकाश कितीही मोठे असले, तरी क्षितिजावरती ते खाली येते आणि क्षितिजापर्यंत भूमीचे पसरणे, क्षितिजावरती आभाळ खाली येणे, या दोन्ही प्रतीकात्मक गोष्टी मनामध्ये तयार झाल्या आणि त्यावरून ‘आकाशाशी जडले नाते’, हे चित्र तयार झाले. यातून हेच सूचित करायचे आहे की, पती-पत्नीला एकामेकांविषयी आदरभाव असला पाहिजे. पतीने आपल्या पत्नीला कधी दासी समजू नये आणि पत्नीनेही एवढा स्वाभिमान बाळगू नये की, पतीच्या स्वाभिमानाला धक्का बसेल. क्षितिजावरती जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा कोणाचेही मोठेपण कमी होत नसते. या दोघांच्या मिलनामध्ये स्वस्तिक चिन्ह काढले आहे.
  
त्यानंतरचे चित्र आहे, ‘गुंफिते, बदरी बिजांची तपमाला.’ रामायणामध्ये ‘स्पर्शमुक्ती’ आणि ‘दर्शनमुक्ती’च्या गोष्टी आहेत. अहल्येचा उद्धार हा स्पर्शमुक्तीने झाला आणि शबरी ही दर्शनाने मुक्त झाल्याचा उल्लेख आहे. शबरी ही मूळची निशादकन्या आहे आणि तिच्या तरुणपणी, तिच्या लग्नासमयी हजारोंनी बकर्या् आणलेल्या असतात. तिच्या लग्नाच्या जेवण समारंभात बकर्यांयच्या भोजनाचा बेत असतो. “एवढी मोठी हिंसा केवळ माझ्या लग्नखातर होणार आहे”, हे कळताच ती लग्न सोडून पळून जाते. मग, ती मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन सेवा करते व शबरीचा शिष्या म्हणून मातंग ऋषी स्वीकार करतात. मातंग ऋषी शबरीला सांगतात की, तुला श्रीरामचंद्राच्या दर्शनाने मुक्ती लाभेल. तेव्हापासून ती रोज रामाच्या आगमनाची तयारी करते.
 
रामाची नित्य आराधना-तपस्या करते आणि मग खरेच एकेदिवशी राम-लक्ष्मण तिकडे येतात. रामाला गोड लागावी म्हणून स्वत: चव घेतलेली, उष्टी केलेली बोरे शबरी रामाला देते. रामाने ती गोडीने खाल्ली, तरी लक्ष्मणाला ते आवडले नाही म्हणून तो दुसरीकडे तोंड करून बसतो. हा प्रसंग सगळ्यांना माहिती आहेच. तेव्हा यामध्ये मी वेगळे काय केले तर...जो आपला आराध्य दैवत आहे, तो आपण उष्टी केलेली बोरेसुद्धा नैवेद्य म्हणून रुचीने खातोय, तर मग त्याने टाकलेल्या बिया या प्रासादिक नाहीत का? त्या काही केवळ कचरा होणार नाहीत. त्यालाही तेवढेच महत्त्व आहे. माझ्या उष्टेपणाचा जर त्याला अव्हेर नसेल, तर मी तरी त्याने टाकलेल्या बियांचा अव्हेर कसा करायचा? आणि म्हणून शबरी त्या बोरांच्या बियांची माळ गुंफताना मी दाखविली आहे. म्हणून चित्राचा ज्या वेळी मी विचार करतो, त्या वेळी त्या चित्राचा आशय किती उंचीवर नेता येईल, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. तेव्हा शबरी मात्र तपमालेसाठी बियांची गुंफण करते. मी हे चित्र त्या आदरभावनेने केले आहे, म्हणून प्रत्येक चित्रात मी खार दाखविली आहे.
 
नंतरचे एक चित्र म्हणजे लंकादहनाचे. आता या लंकादहनाची अनेक चित्र, चित्रपट, प्रसंग आपण पाहिलेले आहेत. तेव्हा लंका खाली जळतेय आणि मारुती वरून उडतोय, हे आपण नेहमी पाहिलेले चित्रच मला पुन्हा दाखवायचे नव्हते. मला मारुतीरायाची शूरता दाखवायची होती. चित्रात केवळ त्या इमारतीचा खांब जळतोय आणि मारुती जल्लोष करतोय, असे दाखवत त्याची शेपटी उगारलेली आणि त्याला अग्नी लावलेला आहे. या एका चित्रातून मारुतीने काय शक्तीने, जोशाने लंका जाळली, हे मला त्याठिकाणी मारुतीच्या हावभावातून दाखवायचे होते. त्याची भव्यता न दाखवता, त्याचे शौर्य दाखवावे, हाच उद्देश यामागे होता. अनेकांना या चित्रात जो मारुती आहे, तो नेहमी पाहतो त्यापेक्षा काहीसा वेगळाही वाटेल; परंतु तो बलदंड, ताकदवान दाखविण्यापेक्षा मी त्याची भक्ती आणि सेवावृत्ती दिसेल, याची खबरदारी घेतली. कारण ताकदवान मारुतीमुळे त्याच्या बुद्धिमत्तेचा परिचय येत नाही. तेव्हा मारुतीकडे बघून आपल्यालाही तशीच शरीरयष्टी लाभली पाहिजे, असेच प्रत्येकाला वाटते.
 
तेव्हा मारुतीसारखीच सेवावृत्ती आणि भक्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. कारण आजच्या काळात संस्कारांची फार आवश्यकता आहे. चिथावणी देणारे अनेक विषय आज आहेत; पण मर्यादा दर्शवणार्याय अनेक विषयांची संख्या आपल्याकडे कमी होत चालली आहे. म्हणून मी संपूर्ण चित्रमालेला ‘मर्यादा पुरुषोत्तम’ हे नाव दिले. पुढे ‘राम’ हा शब्द लावला नाही. कारण या कथेचा विचार करताना, या कथेतील प्रत्येक व्यक्ती ‘मर्यादा पुरुषोत्तम’ आहे. लक्ष्मण आहे, मारुती आहे, कुंभकर्णही आहे... ‘निद्रिस्त सत्यवचन’ म्हणून कुंभकर्णाचेही एक चित्र आहे. तरीही, लंकादहनातील वानराची उग्रता मी त्याठिकाणी आणली आहे.
‘राम द्यावा, राम घ्यावा’ हे आणखी एक चित्र... खारीच्या कथेमध्ये खार बघते की, जो कोणी सेतूबांधणीसाठी दगड समुद्रात टाकतोय, त्या प्रत्येक दगडावर रामनाम अंकित आहे. मला या चित्रात दाखवायचे आहे की, हे काम पवित्र हेतूने आणि भक्तीने केले जातेय; पण जी काही वाळू टाकली जातेय, त्यावर रामाचे नाव नाही. म्हणून ती खार एक छोटासा दगड घेऊन येते आणि मारुतीला म्हणते, “याच्यावरती पण एक रामाचे नाव लिहून दे.” माझी सेवा घ्यावी आणि मला आशीर्वाद द्यावा. अर्थात, ‘राम द्यावा, राम घ्यावा...’
 
त्यानंतर शेवटचे चित्र केले ते ‘रामं रमेशं भजे.’ सगळी चित्रे तयार झाल्यानंतरचे हे अठ्ठाविसावे चित्र. पहिले चित्र मारुतीरायाचे केले तर वाटले की, शेवटच्या चित्रातही मारुती आला पाहिजे. आपल्याकडे पूर्वीपासून लोकमानसामध्ये एक श्रद्धा आहे की, जिथे-जिथे रामकथा सुरू आहे, तिथे हनुमानाला स्थान असते किंवा त्याची उपस्थिती असते. रामायण पारायणाच्या वेळीही एक पाट रिकामा ठेवला जातो. तेव्हा मी विचार केला, मला तरी मारुतीराया तसे दिसले नाहीत; परंतु नीट विचार केला तर लक्षात येईल की, मारुतीने मागणी केली होती की, “जोवरी कथा भुवरी, तोवरी जन्म असावा.” म्हणजेच रामकथेचे जे अस्तित्व आहे, तेच मुळी मारुतीरायाचे अस्तित्व आहे. आपण लगेच शेपटीधारी वानराने तिथे येऊन बसावे, अशी अपेक्षा करतो. रामकथा हिच मुळी चिरंतन आहे. याचे चिरंजीवित्व हेच मारुतीरायाचे चिरंजीवित्व आहे आणि हे पिढी दरपिढी द्यायचे आहे. प्रौढांच्या मुखातून नव्या पिढीला रामायण ऐकायला मिळावे, अशी रचना रामकथेची झाली आहे. यावर प्रत्येकजण नवनवीन प्रकारे भाष्य करतेय. 300 पेक्षा जास्त प्रकारे रामायण लिहिले गेले आहे, असे म्हणतात. 14 रामायणे प्रसिद्ध आहेत; परंतु रामकथा ही चिरंजीव आहे.
 
त्याच्यामध्ये मी ही एक छोटसे पुष्प गुंफले. ही रामकथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. चित्रामध्ये माझा नातू डोळे बंद करून झांजा घेऊन उभा आहे आणि त्याच्याकडून मारुतीराया भजन म्हणून घेतोय, असे चित्र मी रेखाटले आहे. त्यामध्ये खार दाखविलेली नाही. कारण त्यातून मला रामकथेचे चिरंजीवित्व दाखवायचे आहे. तिथे साक्षीदार राहून मला रामायण संपवायचे नाही. म्हणून ‘रामं रमेशं भजे’ अर्थात, राम आणि रमेश अर्थात रमाईषाचे आपण भजन करावे, म्हणून मूर्ती न दाखविता चित्रात मी पोथी दाखवली आहे. कारण मूर्ती न ठेवता नातवाला रामायण सांगायचे आहे, त्याच्याकडून ते वदवून घ्यायचे आहे, आचरणात प्रतिबिंबित करायचे आहे... पण याचा अर्थ 28 चित्रांमध्ये रामायण संपते, असा मुळीच नाही. ते केवळ प्रदर्शनापुरते संपते, एवढेच! 27-28 चित्रांना जेव्हा खत मिळते, तेव्हा आणखी विषय सूचत जातात; परंतु मी विषयांची पुनरावृत्ती करणे टाळतो. तेव्हा या विषयाला धरून आणखीन काही वेगळी चित्रे नक्की करता येतील. चित्रमाला कुठे संपत नाही, ती चालूच असते.
 
चित्रकला ही आजच्या दिवशी केवळ मनोरंजन करणारी, घरातली भिंत सजवणारी एवढ्यापुरतीच मर्यादित राहता कामा नये. त्या चित्रांनी काही संस्कारही द्यायला पाहिजेत. म्हणूनच रामायणावर एवढ्या मालिका, चित्रपट येतात. तेव्हा तुम्ही नुसती स्थिरचित्र दाखवून काय मिळवता? असा प्रश्न उद्भवू शकतो; पण मला वाटते की, कथा-कादंबरी वाचताना, चित्रपट-नाटक पाहताना त्या वेळी आपला विचार वाचनानुसार, पाहण्यानुसार पुढे सरकत असतो आणि ज्या वेळी चित्रपट-कथा समाप्त होते, तेव्हा आपले विचारही तिथेच थांबतात. त्यामुळे चित्र मात्र स्थिर असते; पण विचारांना गती मिळत असते. तेव्हा चित्रासमोरून गेल्यावरही आपली विचारशृंखला सुरू राहते. त्यामुळे स्थिर चित्र हे पाहण्यापुरते जरी स्थिर असले, तरी ते विचारांना गती देणारे असते. त्यामुळे चित्रकारांनी अशी संस्कार देणारी चित्रे काढावीत. सगळीच चित्रे अगदी तशीच हवी, असे माझे म्हणणे नाही. त्यामध्ये मनोरंजनाचा, सौंदर्याचा भागही असतो; परंतु मनोरंजन आणि सौंदर्य हे कलेमध्ये उपजत असते. चित्रकला जर संस्कारवाहक झाली, तर ती अधिक कल्याणकारी होऊ शकते.
 
बंड करून केलेली चित्रे अनेक आहेत, समाजमन दूषित-कलुषित करणारे अनेक विषय आहेत; परंतु कधीकधी समाजमनाला एक चांगला विचार, संस्कार कलाकारांनी द्यायला हवा. बंडखोर म्हणूनच आपण शड्डू ठोकावा, असे मला वाटत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला पटतीलच असे नाही. जसे की, सीतेने केलेला त्याग त्या वेळीही कोणाला पटला नाही आणि आजही मला पटत नाही. त्याचे धर्ममार्तंड किंवा विद्वान कसेही समर्थन करू देत. तेव्हा आदर्श हा कोणाचा घ्यायचा, हे ज्याचे त्याने ठरवावे; पण कितीही रामासारखे वागायचे ठरवले, तरी आपण असा त्याग करू शकत नाही. त्यामुळे ते चित्र अक्षम्य परित्याग व्यक्त करते. म्हणजेच सगळ्याच गोष्टींचे समर्थन करावे, असे मला वाटत नाही. काही गोष्टी घेण्यासारख्या असतात, तर काही विचार करायला लावण्यासारख्या असतात. तेव्हा कठीण प्रसंग आला, तर कसे वागावे आणि कसे वागू नये, याचीही शिकवण मिळत असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ही चित्रमाला केली. लोकांना खरोखरचं ती आवडली. जेव्हा एखादे चित्र डोळ्यातून हृदयाकडे जाते, तेव्हा ते चिरकाळ टिकते. ते रक्ताभिसरणाबरोबर तुमच्या अंगात संपूर्ण पसरते. बुद्धी फक्त विचार आणि तर्काला जन्म देत असते. बुद्धीलासुद्धा हृदयाचे स्थाने मिळावे, या दृष्टिकोनातून मी ही चित्रमाला केली आहे. यशापयशाचा भाग मोजायची गरज नसते. कारण लोक आठवण ठेवतात...
 
- वासुदेव कामत
  
(शब्दांकन : विजय कुलकर्णी)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.