आयुष्याच्या प्रत्येक वळणावर राम नव्याने सापडत गेला...

    29-Mar-2023
Total Views | 116


Dhanraj Pillay - Shree Ram 
 
मराठीतील प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांचे एक वाक्य मला अजूनही आठवतंय. किंबहुना, माझ्या मनावर ते कोरले गेलेय. वपु म्हणतात, “आपण रामायणातील राम नाही होऊ शकणार, पण याचा अर्थ आपण धोबी बनलेच पाहिजे का?” आज अवतीभवती आपण पाहिलेत तर या जळीस्थळी संशय घेणार्याी, तक्रार करणार्या धोबींचीच भाऊ गर्दी वाढत चालली आहे. रामाच्या जवळ जायचे असेल, तर या धोबींपासून दूर राहायला शिकले पाहिजे. अर्थात, ‘धोबी’ हा शब्द मी प्रतिकात्मक वापरलाय. रामायणाच्या कथेतील. नाहीतर उद्या माझ्या घरासमोर मोर्चा थडकायचा. गमतीचा भाग सोडून देऊया...पण, खरच आपल्या प्रत्येकाचे आयुष्यच रामाने व्यापलेले आहे.
 
जात-पात-धर्म यांच्यापलीकडे मानवी मूल्य जपणारा तो राम... माझ्या मनातील राम हा असा सर्वसमावेशक आहे. सर्वांना सामावून घेणारा... सगळ्यांना ऊर्जा देणारा...
 
हॉकीच्यानिमित्ताने मी तसा अवघं जग फिरलोय. जग फिरताना विविध संस्कृती, तेथील लोकं, त्यांच्या उपासना पाहायला मिळाल्या. अनेक देशांतील देवळात गेलोय. पण, लंडन आणि विशेषतः मलेशियातील रामाचे देऊळ हे प्रत्येकाने पाहायलाच पाहिजे असे आहे. मलेशियात मी गेलो की आवर्जून रामाचे दर्शन घेतो. मन निवांत होते... लढण्याची जिद्द मिळते...
 
राम तुम्हाला जगण्याची दिशा देतो. राम तुम्हाला लढण्याची जिद्द देतो. राम तुम्हाला प्रेमाची दिक्षा देतो. राम तुम्हाला पालकांच्या प्रति कर्तव्याची जाण देतो. वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी साम्राज्याचा त्याग करून वनात जाणारा राम एकमेवद्वितीया... शत्रूवरही प्रेम करायला शिकवणारा असा हा राम... क्रोधातही शांतता शोधणारा असा राम मला अधिक भावतो. माझे चहाते मला नेहमी सांगतात की, धनराज, तू हॉकीच्या मैदानावर अधिक आक्रमक असतोस... असेनही, पण खरं सागूं का, त्या आक्रमणात वैयक्तिक श्रेष्ठत्वापेक्षा देशाच्याप्रती समर्पणाची भावना अधिक असायची.
 
राम हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा एक स्थायी भाव आहे. आपल्या सगळ्यांत तो आहे. फक्त तो उमगावा लागतो. मॅच महाराष्ट्रात असली आणि कधीकधी आम्ही मॅच हरायला आलो की प्रेक्षकांतील लोक म्हणायचे की, ‘आता मॅचमध्ये काही राम उरला नाही.’ आमच्यासाठी हे वाक्य चेतवण्यासाठी पुरेसे ठरायचे. आमच्यातील आणि खेळातील राम संपलेला नाही, हे दाखवण्यासाठी मग आम्ही आजून जोमाने खेळायचो.
 
विजयानंतर मातू नका, हे रामाने आम्हाला शिकविले. लहानपणी आईकडून रामाच्या गोष्टी ऐकल्याचे आठवते. पण, जसजसा मोठा होत गेलो, तसतसा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर राम नव्याने सापडत गेला.
 
राम महान होता, पण त्याआधी तो आई-वडिलांचा नम्र मुलगा होता. आपल्या भावांचा विश्वासू सखा होता... हनुमानसारख्या सर्वशक्तिमान भक्ताचा तो दाता होता... आपण रामासारखे महान होऊ शकत नाही, पण आपल्या उभ्या आयुष्यात आपण आपल्या आई-वडिलांचा गुणी मुलगा नक्कीच होऊ शकतो. आपल्या भावंडाचा विश्वासू सखा नक्कीच होऊ शकतो. आपण प्रत्येकाने इतके जरी केले, तर रामराज्य आल्याशिवाय राहाणार नाही!
 
- धनराज पिल्ले

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121