वन्दे लोकाभिरामं...

    29-Mar-2023
Total Views |
भारतीय माणसाला प्रभू रामचंद्रांची ओळख होण्यासाठी काही वेगळे करायची गरज नसते. रोजच्या जगण्यात ‘राम राम मंडळी’ काय, ‘रामराज्य’ काय किंवा अगदी ’राम म्हटला’पर्यंत. राम भारतीय जनमानसाच्या भावविश्वाचं अभिन्न अंग आहे. आपल्या जन्मासोबतच तो असतो आणि जगण्यासोबतही...
ram 
 
लहानपणी ऐकलेल्या रामकथांतून राम भेटत राहिला. त्यावेळी करमणूक आणि थोडाफार दिला जाणारा उपदेश हे रामकथा सांगण्याचं उद्दिष्ट होतं. त्या काळात पाहिलेला संपूर्ण ’रामायण’ चित्रपट यातूनही रामाची एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली. पण, मनोरंजन आणि उपदेश यापलीकडेही राम आहे, हे जाणवलं मोरारी बापू हरियाणवी यांच्या सलग दहा दिवसांच्या रामकथा श्रवणातून आणि मैथिलीशरण गुप्त यांच्या ’साकेत’ या महाकाव्यातून आणि अर्थातच महाकवी गदिमांच्या गीतरामायणातून.
 
मोरारी बापूंनी रामकथा सांगितली ती सामाजिक अंगाने. त्यासाठी त्यांनी सादर केलेली गीतं आणि रामकथेतून केली गेलेली नैतिकता, मूल्य यांची मांडणी रामकथेकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवून गेली. मैथिलीशरण गुप्तांचा राम ही ‘राम’ या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची केलेली कलात्मक मांडणी आहे. त्यांनी ’हे राम तेरा रूप स्वयं ही काव्य हैं, कोई कवी बन जाये सहज संभाव्य हैं’ अशा पराकोटीच्या विनम्र भावनेतून ही रामकथा मांडली, तर गदिमांच्या काव्यातून रामचरित्रातील विविध पात्रांचा, त्यांच्या विविध पात्रांच्या मानसिक व भावनिक आंदोलनांचा घेतलेला काव्यमय वेध अचंबित करून सोडतो. ‘साकेत’ आणि ‘गीतरामायण’ दोन्ही भारतीय साहित्यातील रामकाव्याचा परमोच्च अविष्कार मानले जातात.
 
आयुष्याच्या आणि आकलनशक्तीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगळेच रामदर्शन घडते. तुम्हाला घडवते, जाणिवा समज विस्तारते, याची अनुभूती येत गेली.
 
आता रामाकडे रंजन, मेसेज, सामाजिकता आणि वाङ्मयीन मूल्य या अंगाने बघू लागलो होतो आणि लक्षात येऊ लागलं की, ती समर्पणाची कथा आहे, बंधुत्वाची आहे, माणसाचं आयुष्य सुखकर व्हावं म्हणून सांगितल्या गेलेल्या चांगल्या वाईटाची आहे, पराक्रमाची आहे, त्यागाची आहे. एकूण भारतीयत्वाची संकल्पना तिचं सार आहे. किंबहुना भारतीयत्व समजून घ्यायचं, तर रामकथा महत्त्वाची आहे.
 
असं काहीबाही रामाचं आकलन होत असतानाच, वयाच्या एका अशा टप्प्यावर आलो जिथे कला आणि साहित्य याकडे काहीशा सजगपणे पाहायची सुरुवात झाली होती. परंतु, साहित्यबाह्य, कलाबाह्य प्रवाहांचे प्रभाव मनावर मोहिनी घालण्याचाही तो काळ.
तेव्हा पुराणकथा, कथानायक आणि कथासार याकडे आजच्या चष्म्याने पाहण्याचा एक ‘ट्रेंड’ निर्माण झाला होता. खरंतर प्रत्येक काळात हे आवश्यकच असतं. ही अशी पुनर्भेट गरजेची असते आणि आपल्याकडे चिकित्सा, प्रश्न आणि मतभेद याला सुरुवातीपासूनच खुला अवकाश आहे. परंतु, तितक्याच खुलेपणाने या सगळ्याकडे पाहण्यापेक्षा काही वेगळ्याच मोजपट्ट्या लावून न्याय-निवाडा करण्याचा एक गमतीदार, विचित्र पायंडा पडू पाहत होता. त्याला मी गमतीने आजच्या ’इंडियन पिनल कोड’ची कलमे लावून तत्कालीन माणसे आणि विचार यांचे मोजमाप करणे म्हणतो. तत्कालीन सामाजिक वास्तवाकडे डोळे झाक करून रामायणाकडे बघता येणार नाही, पण आधीच काही निष्कर्ष काढून ठेवायचे आणि मग या मोजपट्ट्या लावून आपला इतिहास आणि भूतकाळ याचे आपल्याला हवे तसे रेखाटन करायचे, हा खेळ सुरू झाला होता. बरे, हे करताना नेमकं काय लिहिलं गेलं आहे, याचाही धड अभ्यास नाही.
 
परवा एका मुलीने फेसबुकवर लिहिलं, ‘मला रावणासारखा भाऊ हवा, जो बहिणीसाठी धावून येईल.’ बिचारीला माहीत नव्हतं की, रावणाने शूर्पणखेच्या पतीला ठार मारलं होतं. हे तिला अपेक्षित असावे काय? कदाचित तिने सोयीचे तेवढेच उचलले असावे. तात्पर्य, अशा साहित्यबाह्य प्रभावातून रामायणाकडे बघण्याच्या ‘ट्रेंड’ला काही काळ मीही बळी पडलो, पण सोबतचे मित्र, होणार्याू वाङ्मयीन चर्चा आणि निखळ साहित्यिक अवकाश यामुळे फार काळ या वैचारिक गोंधळात अडकून राहिलो नाही. अनेकांना तर हेही माहीत नसतं की, हा त्यांचा वैचारिक गोंधळ आहे. असो.
 
पण, पुन्हा एकदा रामकथेकडे निखळ अभ्यासू नजरेने तो काळ आणि त्या काळातलं वाङ्मयीन प्रकटीकरण या अंगानं पाहात राहिलो. नंतर ठरवून संपूर्ण वाल्मिकी रामायण वाचून काढलं. त्यामध्ये जोडल्या गेलेल्या कथा, मूळ कथा या सगळ्यांचा धांडोळा घेतला आणि लक्षात आलं की, यामधलं खूपसं सांकेतिकसुद्धा आहे. उदाहरणार्थ - वाली सुग्रीवकथेमध्ये झाडामागून बाण मारणे वगैरे हे सगळं रूपकात्मक आहे. ज्याच्या पाठीशी राम त्याचा विजय निश्चित, अशा पद्धतीचे सूचन करण्यासाठी वापरलेला तो डिव्हाईस आहे, या अंगानेही त्याकडे पाहायला लागलो आणि एकूणच एखाद्या नाटकांमध्ये ‘बिटवीन द लाईन्स’ शोधण्याचा जो छंद असतो किंवा गरज असते, त्या पद्धतीने रामायणातील सांकेतिक भाषेचाही मी शोध घेऊ लागलो.
 
कथा जे सांगते, त्याच्या पलीकडे एक वेगळा अर्थ दडलेला आहे. त्यातला तो डिव्हाईस, रूपक या सगळ्या गोष्टी गोष्टींचा विचार करत ते समजून घेतलं पाहिजे. वरवर पाहता कामा नये, हे जाणवू लागलं आणि आता रामायण एक वेगळाच कलात्मक आनंद देऊ लागलं होतं. तुलसी रामायणही वाचलं आणि लक्षात आलं की ते मूळ रामायणाचं अत्यंत पोएटिक, रसभरीत आणि नादमय असे निरूपण आहे.
 
मग एक असं लक्षात आलं - राम कथानायक आहे, पण ते तितकच नाही, तर रामानं संपूर्ण देशाला एका धाग्यामध्ये जोडण्याचं काम केलं आहे. भाषेची, रंगाची, दिसण्याची, नैसर्गिक, भौगोलिक सर्व प्रकारची विविधता असलेल्या या देशाच्याही रशियासारख्या चिरफाळ्या होत नाहीत, याचं कारण काय असावं? याचं कारण राम आहे, असे मला जाणवू लागले. म्हणजे रामकथेत असलेली नैतिकतेची आणि मूल्यांची संकल्पना ही ‘आसेतु हिमाचल’ एकच आहे. चारही दिशांना योग्य-अयोग्य, पापपुण्य यांचे निकष एकाच आहेत. भाऊ कसे असावेत, राजा कसा असावा, राजा आणि राज्य (इथे परत लोकशाहीची आजची संकल्पना आणून ‘राजा’ या शब्दावरती आक्षेप घेण्याचे कारण नाही, समजून घ्यावे) यावरची निष्ठा कशी असू शकते, नात्या- नात्यातील समर्पणाची भावना, त्याग कसा असू शकतो... आणि असावा, याबद्दलची भावना एकच आहे. साध्यासुध्या सामान्य लोकांचे बळ एकत्रित करून एक मोठे ध्येय साध्य केले जाऊ शकते, यावरचा विश्वास एकच आहे.
 
हे सर्व पाहिलं आणि लक्षात आलं. देशभराची ही विविधता बाह्य अंगाची आहे, अंतरंग एक आहे आणि ते रामकथेनं अभंग ठेवलं आहे. उगीच नाही राम आणि रामकथा यावर प्रहार करण्याचे प्रयत्न होत. कारण, अशा आक्रमकांना हे नीट कळलं आहे की, हा धागा क्षीण झाला, तर दुफळी अवघड नाही आणि नेमकं हेच रामकथेचं बलस्थान आहे, किंबहुना आपल्या देशाचंही!
आता राम कला, साहित्य, समाज, राजकारण, परराष्ट्र कारण अशा सर्व अंगाने दिसू लागतो आणि मग तो इतिहास आहे की पुराण आहे, की तो नाहीच, कधी नव्हताच का? या सगळ्याला काहीच अर्थ उरत नाही उरतं ते फक्त एकच की, राम हा एक विचार आहे, ते एक तत्त्वज्ञान आहे. मनुष्यत्वाचं वैश्विक तत्त्वज्ञान आणि आजही अभ्यासाचा, कुतूहलाचा आणि विस्मयचकित होण्याचा लाडका विषय आहे.
 
रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
 
- अभिराम भडकमकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.