राम - एका संगीतकाराच्या नजरेतून

    29-Mar-2023
Total Views |
भारतातल्या जवळपास सर्वच प्रांतांतील संगीत आविष्कारांत राम गायला जातो आणि हे आविष्कारही नाना परीचे आहेत. केरळचे ‘रामनाट्टम्’ नृत्यनाट्य, राजस्थानमधील ‘रामरसायन’ हे नृत्यात्म काव्यगायन, उत्तरेतील ‘रामलीला’, ओडिशातील ‘चम्पू’ हा कथागीत प्रकार इ. नृत्य, नाट्य आणि कथन यांची सांगड घालणार्या आविष्कारांत संगीत अर्थातच नाना प्रकारे रंग भरते.
 

chaitanya kunte
 
 
श्रीरामाची प्रतिमा अगदी अबोध वयापासूनच माझ्यासमोर सतत होती. कारण, बालपणीची, आरंभीच्या घडणीची महत्त्वाची वर्षे पुण्यातल्या सदावर्ते राम मंदिराच्या परिसरात गेली. रामजन्माचा सोहळा, कीर्तन, भजन या सार्यांाच्या संस्कारातून लहान वयात भाबडी देवभक्ती मनात रुजली. उत्सवात रामपंचायतनाच्या मूर्तींना सजवण्यासाठी फुलांचे हार बनवणे, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे व दागिने यांचे संच जोडणे अशा गोष्टी आम्ही लहान मुले फार उत्साहाने, मौजेने करत असू. रामदासी संप्रदायाची अवतीभवती साचल असायची. त्यामुळे सवाया, करुणाष्टके इ. कानावर सतत पडे आणि ते आमच्याही नित्यपठणातही असे. शिवाय, ‘गीतरामायण’ या एकूणच मराठी कानांना आणि मनांना व्यापणार्याभ सांगीतिक आविष्काराचे पडसादही मनावर होतेच!
 
पुढे भाबड्या श्रद्धेची जागा चिकित्सक वैचारिकतेने घेतली. मग रामच काय, एकूणच ‘धर्म’ हा विषय केवळ आस्थेचा न राहता विश्लेषक बुद्धीने तपासणी करण्याचा, प्रश्न उभे करण्याचा आणि त्यातून मुळापर्यंत जाऊन उत्तरे शोधण्याचाही झाला. महाविद्यालयीन काळात इतिहास, भारतविद्या आणि पुरातत्वशास्त्र यांचा अभ्यास करताना राम आणि रामकथा यांचे अनेक तपशील, संदर्भ कितीतरी अंगांनी आकळत गेले.
 
‘वाल्मिकी रामायण’ आणि विविध भारतीय भाषांतील प्रांतीय रामकथा, बृहद् भारतात लोककथांतून प्रचलित असलेली रामगाथा यांत वर्णिलेला राम एकसारखा नाही - त्यात विलक्षण वैविध्य आहे. राम या ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे एका भव्य देवरूपात झालेले उन्नयन थक्क करणारे आहे. भारतीयांची मानसिकता खास लवचिक आहे - म्हणून तर ती एका बाजूला राम या व्यक्तीच्या गुणदोषांची चिकित्सा करते, रामाचे न्यूनही (सीता, शंबूक अशा व्यक्तींशी संबंधित वर्तनातले) दाखवते व त्याला दोषी ठरवते आणि दुसर्याम बाजूला श्रीराम या दैवताची उपासनाही परमभक्तीने करते. दक्षिणेतील आळवार, उत्तरेतील रसिक संप्रदाय, रामानंदी पंथ, महाराष्ट्रातील रामदासी पंथ यांनी श्रीराम हा केवळ विष्णूचा अवतारच नव्हे, तर प्रत्यक्ष हरिरूप (ईश्वराचे देहरूप) मानले आणि हे देहरूप मानल्यामुळे अर्थातच रसिक संप्रदायाने रामाचे केवळ उदात्त रूप चित्रित नाही केले - त्याला शृंगार, विलास, वात्सल्य, अशा अनेक भावनांची डूब दिली.
 
चित्र-शिल्प-स्थापत्य अशा स्थावर कलांत आणि संगीतादी प्रयोगकलांत रामाची नानाविध रूपे दिसतात. संस्कृत स्तोत्रे, कालिदासाचे रघुवंश इ. काव्ये, तसेच भवभूतीची अभिषेक, प्रतिमा, महावीरचरित आणि उत्तररामचरित, जयदेवाचे प्रसन्नराघव, हनुमान कवीचे हनुमन्नाटक इ. नाटके यांत रेखाटलेला राम किती तरी वेगवेगळा आहे. रामानंद (1410-1510) यांनी जातिभेद न मानणारा ‘श्री संप्रदाय’ स्थापन केला आणि राम हा अवतारी पुरुष म्हणून पूजण्यापेक्षा एक परमतत्त्व म्हणून उपासले. कबीर हे या रामानंदाचेच शिष्य. त्यामुळे कबीरांच्या पदांत राम आहेच - आणि ‘रामरहीम’ही! कवी मणिराम महापात्र (सुमारे 1616चा जन्म) हा बादशाह शाहजहाँ याचा आश्रित कवी. याने कृष्णकाव्याच्या धर्तीवर काही रामकाव्ये लिहिली आहेत - म्हणजे बालकृष्ण लीलांच्या धर्तीवर वाल्मिकी रामायणात न वर्णिलेल्या रामाच्या बाललीला लिहिल्या. अगदी घागरी फोडण्याची वर्णनेही रामाबाबत झाली.
 
हे सारे तपशील पाहिल्यानंतर माझ्या अबोध वयातल्या श्रद्धेचे रुपांतर झाले चिकित्सक तपासणी करणार्याा संस्कृतीशास्त्राच्या अभ्यासकात. त्यामुळे लोकमानसात असलेले प्रभू रामचंद्र आणि अभ्यासकांच्या दृष्टिकोनातला राम यातील अंतर ठळक होऊ लागले. दुसर्याअ बाजूला संगीत क्षेत्रातल्या वाटचालीतही कधी बंदिशींच्या अभ्यासात, तर कधी स्वररचना करण्याच्या कामात ‘राम’ हा विषय हाताळला जाऊ लागला. वेगवेगळ्या दिशांनी आणि नाना कोनांतून एक संगीतकार म्हणूनही मला राम दिसू लागला. माझ्या सांगीतिक प्रवासात भेटत गेलेल्या रामप्रतिमेचा आलेख इथे अगदी थोडक्यात मांडत आहे. हे ‘संगीत राम दर्शन’ प्रातिनिधिक नसून माझे वैयक्तिक आहे, हेही नमूद करतो.
 
वाल्मिकी रामायणातील संगीत
 
संगीतात सापडणार्याल रामाची चर्चा करण्यापूर्वी रामायणातले संगीत कसे आहे, तेही पाहणे रोचक ठरेल. रामायणाची निर्मिती वाल्मिकी ऋषींनी ‘अनुष्टुभ’ छंदात गेली. हा छंद गानसुलभ, पाठ्यसंगीताला, प्रवाही कथनाला साजेसा आहे. या छंदोबद्ध काव्याच्या अंगभूत लयीत, वीणा वाजवत त्याचे गायन लवकुशांनी केले. रामाच्या आदेशावरून कुशलवांनी स्वरलयप्रमाणबद्ध, मूर्च्छनादी भेदांनी युक्त असे मार्गीगायन केले व त्याने अधिकारी श्रोतेही चकित झाले. या कथनात्म गायनाची संथा त्यांना वाल्मिकींनीच दिली. ‘पाठ्यसंगीत’ या सादरीकरणाच्या प्रकाराची खास लक्षणे वाल्मिकीने तपशीलांत नोंदल्यामुळे ही आविष्कारशैली खर्याा अर्थाने आकारास आली, असे म्हणण्यास हरकत नाही. हमरस्त्या, लहान गल्ल्या वा राजमार्ग, ब्राह्मण वा राजांच्या घरी, यज्ञादी प्रसंगांनंतर रामकथा सादर करताना तिचे सांगीत विशेष कोणते असावेत, हे वाल्मिकीने नियमबद्ध केले. आजही लोककलाकार जी सादरीकरणे करतात, ती पठणमार्गाचा अवलंब करतात आणि लवकुशांना आपले आदिपुरुष मानणारे भाटचारण, शाहीर इ. कलाकार त्याच ‘कुशीलव परंपरे’चे वाहक आहेत.
 
राज्याभिषेक, लंकेत रावणाच्या अंतःपुरीचे वर्णन, निसर्गवर्णन करताना संगीताच्या देताना वाल्मिकींनी अनेक संगीतशास्त्रीय संज्ञांचा वापर केला आहे. तो पाहता त्यांना संगीताचे ज्ञान होते. एवढेच नव्हे, तर संगीताचा आस्वाद त्यांना प्रिय होता, हे लक्षात येते. अश्वमेध यज्ञाच्या वेळी सर्व ऋत्विजांमध्ये उद्गात्याचे स्थान आदरपूर्ण होते आणि पुरोहितगणाच्या सस्वर मंत्रोच्चाराने यज्ञभूमीत मंगलमय वातावरण निर्माण झाल्याचा उल्लेख आहे. या मार्गसंगीताखेरीज देशीसंगीताचे रूप असलेले गांधर्वगानही जनाभिरुचीनुसार प्रचलित होतेच. संगीताचा व्यवसाय करणार्यास लोकांत गायक, सूत, मागध, वारांगना यांचा उल्लेख येतो. गायकवर्गाला राजसभेत वेतनावर नियुक्त केले जाई. दशरथाच्या अंत्ययात्रेत सूतांनी गायलेल्या भावपूर्ण स्तुतिगानाचा उल्लेख मिळतो, असे निश्चितच म्हणता येईल की त्या काळात विकसित अशा आणि समाजात प्रचलित असलेल्या संगीताचे दर्शन ‘वाल्मिकी रामायणा’त घडते. आदिम, लोक, धर्म, जन आणि कला संगीत अशा पाच संगीतकोटींतील आविष्कार रामायण काळात स्थिर झाले होते, याची साक्ष हे उल्लेख देतात.
 
संगीतातील राम
 
भारतातल्या जवळपास सर्वच प्रांतांतील संगीत आविष्कारांत राम गायला जातो आणि हे आविष्कारही नाना परीचे आहेत. केरळचे ‘रामनाट्टम्’ नृत्यनाट्य, राजस्थानमधील ‘रामरसायन’ हे नृत्यात्म काव्यगायन, उत्तरेतील ‘रामलीला’, ओडिशातील ‘चम्पू’ हा कथागीत प्रकार इ. नृत्य, नाट्य आणि कथन यांची सांगड घालणार्यात आविष्कारांत संगीत अर्थातच नाना प्रकारे रंग भरते. उत्तर भारतात तुलसी रामायणाचे पाठ हे किती संगीतमय असतात. ‘चैती’सारख्या लोकगीतांतील ‘हो राम’ची पुकार ऐकू येते. मात्र, लोकगीतांत रामलक्ष्मणापेक्षा सीतामाईच अधिक भेटते - स्त्रीगीतांत सीतेच्या वेदनेला व्यक्त करताना समग्र भारतीय स्त्रीने आपले मन मोकळे केलेय.
 
महाराष्ट्रातले संगीत पाहता, रामदासी पंथातील रचनांत नाना प्रकारे रामदर्शन घडणे स्वाभाविकच आहे, पण विशेष म्हणजे संत एकनाथ, वामनपंडित अशा संतकवी, पंतकवींच्या पदांपासून ‘गीतरामायण’ रचल्याने ‘आधुनिक वाल्मिकी’ म्हणून गौरवल्या गेलेल्या ग. दि. माडगूळकरांपर्यंतच कवींच्या भक्तिगीतांपर्यंत रामगीते रचली गेली, गायली गेली. ‘रघुपती राघव राजाराम’ ही पलुसकरांनी स्वरबद्ध केलेली, महात्मा गांधींची आवडती रामधून. तिला जनमानसात अढळपद आहे. पं. विष्णू दिगंबर पलुसकर हे रामभक्त. त्यामुळे त्यांच्या पठडीत बहुवंशी सर्व गायकांनी ‘ठुमक चलत रामचंद्र’, ‘लछुमन धीरे चलो’, ‘पायो जी मैने रामरतन’, ‘निर्बल के बल राम’, ‘भज मन रामचरण सुखदायी’ इ. रामविषयक भजने आवडीने गायली. आधुनिक जनप्रिय ध्वनिमुद्रित संगीतात ‘राम श्याम गुणगान’, ‘भक्तिमाला’ इ. अल्बम्समध्ये रामभक्तीचा संगीताविष्कार झाला आहे.
 
भारतीय रागसंगीताचा विचार करता, हिंदुस्थानी संगीतापेक्षा कर्नाटक संगीत हे अधिक भक्तिपर आहे. अर्थातच, कर्नाटक संगीतात रामविषयक अनेक रचना आहेत. कर्नाटक संगीताच्या त्रिमूर्तीपैकी एक त्यागराज हे तर श्रीरामाचे परमभक्त. त्यांच्या कित्येक कृतींत रामाचे गुणवर्णन आहे, त्याची आर्त आळवणी आहे. त्यापैकी ‘रघुवंश सुधा’ (कदनकुतूहल), ‘जगदानंदकारक’ (नटै), ‘सीताकल्याण वैभोगमे’ (शंकराभरण), ‘ब्रोचेवारेवारूरा’ (खमास), ‘नगमोमु कनलेनी’ (आभेरी), इ. कृती विशेष प्रचलित आहेत. ‘मरूगेलरा ओ राघवा’ (जयंतश्री) या कृतीवरून गोविंदराव टेंबे यांनी ‘मधुसूदना हे माधवा’ हे नाट्यगीत रचले आहे.
हिंदुस्थानी संगीतात ‘रामकली’, ‘रामगौरी’ अशी काही रागनामे संकेतपर आहेत. संगीतकारांना रामापेक्षा कृष्ण हा अधिक प्रिय. रागसंगीताच्या बंदिशींत जशा कृष्णलीला सततच आढळतात, तसा राम फारसा भेटत नसला तरीही अनेक पारंपरिक आणि आधुनिक वाग्गेयकारांच्या रचनांत रामवर्णन आहे. ध्रुपद रचयिते तानसेन, बक्शू, सुरतसेन यापासून आधुनिक खयाल रचनाकारांपर्यंत अनेकांच्या बंदिशींत कुठे ना कुठे रामाचे चित्रण आहे. प्रामुख्याने सीतास्वयंवर, वनवास, रावणवध, पुन्हा अयोध्येत येणे असे प्रसंग या बंदिशींत रेखाटले आहेत. शिवाय रामाची प्रार्थना, तारक अशा रामनामाचे माहात्म्य हे विषयही बंदिशींच्या काव्यात वारंवार येतात. गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांनी मराठीतून रामावरचे काव्य रचले आणि ते हे काव्य विविध रागांत गात असत. अब्दुल करीम खांसाहेब ‘आता राम पाही मना’ हे पद बागेश्री रागात गात, त्याची ध्वनिमुद्रिकाही आहे. पं. विष्णू दिगंबर पलुसकर हे तर मोठे रामभक्त. आपल्या उत्तरायुष्यात रागसंगीताच्या आधारे तुलसी रामायण गाण्यात त्यांनी धन्यता मानली. पलुसकरांनी तुलसीदासांची अनेक पदे खयालाच्या बंदिशीच्या रूपाने पेश केले. त्यांच्या शिष्यांत विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर यांनी हाच वारसा चालवत रामवर्णनाच्या नव्या रचनाही केल्या. तेच कार्य बलवंतराय भट्ट ‘भावरंग’, पद्माकर बर्वे यांनी पुढे नेले. रामाश्रय झा ‘रामरंग’ यांनी तर पूर्ण रामायणाचे कथानक अत्यंत सुंदर बंदिशींतून रचले - रसाळ काव्य आणि उचित ‘स्वरताल योजना’ यांमुळे त्यांचे हे बंदिश-रामायण विलोभनीय वाटते. डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांनीही रामायणातील प्रसंग बंदिशीच्या रूपात रेखाटले आहेत.
 
रामाचे विविध आयाम दाखवणार्या काही निवडक बंदिशी-
 
रामस्तुति - राम जय जय मन भावन नमो नारायण (आसावरी, झूमरा)
राम प्रशस्ति- प्रबल जस किरति चहुं देस देसमें (हमीर कल्याण, द्रुत झपताल)
रामभक्ति - राम भज राम भज रे मना (भीमपलास, झपताल), रब ध्यान दावे (गौडसारंग), अब मैं राम राम कह टेरो (गौडसारंग - रचनाकार तानसेन)
रसिक पंथातील रसिल्या रामाचे वर्णन - रंगीली रामकी अंखियाँ (पूर्वी, त्रिताल), राम राम रसिया (भीमपलास)
राम वनवास गमन - जोगिन के भेस (आसावरी, त्रिताल - रचनाकार प्रल्हाद गानू)
राम विरह - मिल जाना राम पियारे (भीमपलास, त्रिताल)
सीतेचे विरहगीत - कब हो कपि (मालकंस)
लंकेची मोहीम - धायो रे सज कर दल (शंकरा - रचनाकार बैजू बावरा), राम रघुवीर (अडाना, रूपक - रचनाकार रामाश्रय झा)
लंका विजय - आयोरी जीत राजा रामचंद्र लंका नगर (रागेश्री, झपताल), दशहरा मुबारक होय तुमको (रचनाकार बैजू बावरा)
अयोध्येत रामाचे स्वागत - चलो री माई रामसिया दरसन को (श्री - रचनाकार अनंत मनोहर जोशी)
रामाचे राजत्त्व - राजनके राजा (मालकंस)
रामभक्ताचा अनुराग - अंखियाँ रामरूप अनुरागी (पूर्वी, त्रिताल)
कृष्णराधेच्या होरीच्या पुष्कळ रचना आहेत, मात्र रामसीतेच्या अभावानेच. त्यापैकी ‘जमुना तट राम खेले होरी’ या होरीची अलाहाबादच्या जानकीबाईची ध्वनिमुद्रिका 1920च्या दशकात गाजली होती. ही रामसीतेची होरी पाहा-
खेलत राम सिया संग होरी पिचकारी उडत, चली चंद्रमुखी चित चहुं ओरी।
चोवा चंदन अबीर कुमकुम हाथ लिये सब आये पिया प्यारी प्यारी पिया ऊपर उडत परस्पर जनककिशोरी॥
 
तसेच रामसीतेचा हा ‘झूला’ देखील फार लोभस आहे-
 
सिया संग झूले बगिया में राम ललना, जहां पड़ा है हिंडोला आठों जाम ललना।
गोरे रंग जानकी, सांवरे सलोने प्रभू, छबी ऐसी बनी मानो रति काम ललना॥
रामसिया झूलै लखन झूलावै, मुनिमन भयो है निहाल ललना॥
श्यामदास यह रूप की निकासी, मोरे हिया में बसहू सियाराम ललना॥
 
या झूल्यात सुकुमारी सीतेच्या हिंदोल्याचे मोहक वर्णन आहे -
 
धीरे धीरे झुलाओ सुकुमारी सिया हो।
झूले सरजू के तीर, पहरे रेशम की चीर, नागिन बेनिया डुलाए, सुकुमारी सिया हो ।1।
झूले अवधबिहारी संग सिया सुकुमारी, झोंका धीरे लगाओ, सुकुमारी सिया हो ।2।
 
डॉ. अशोक. दा. रानडे यांचा ‘राम गाणे’ हा अत्यंत अभ्यासपूर्ण कार्यक्रम विख्यात गायक, रचनाकार, गुरू आणि संस्कृतीसंगीत शास्त्राचे अध्वर्यू डॉ. अशोक. दा. रानडे यांनी 2009 साली ‘राम गाणे’ या संकल्पनाधारित मैफलीतून संगीत आणि राम यांचा अनुबंध फार सुरेख व्यक्त केला होता. त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनातून राम विषयक सांस्कृतिक संदर्भ उलगडले गेले आणि रचनांच्या प्रत्यक्ष गायनातून त्या संगीताचा आस्वादही घेता आला. डॉ. रानडे यांनी फार मार्मिकपणे नमूद केले होते, एकाच वेळी महानायक, महामानव, दैवत व अवतार इतक्या जबाबदार्या पेलणार्याो रामाचे दर्शन घडविण्याचा यत्न भारतांत व भारताबाहेर अनेक शास्त्रांनी व कलांनी केला आहे. भारतीय संगीतच याला अपवाद कसे असेल? संगीताने रामकथा तर टिपली, पण त्याबरोबरच व्यक्तींचे भावरूप, प्रसंगांभोवतालचे भावनांचे जाळेही वेधक पद्धतीने समोर आणले. म्हणूनच एकाच वेळी कथा, कथेचा तत्त्वार्थ, प्रसंगाचे तात्पर्य आणि भावनिक आशय यांनी ‘रामाचे संगीत’ आपल्याला आवाहन करते. संत, संगीतकारव कवी यांनी आपआपला राम गाण्यांतून उभा केला. रामदास, मणिराम, रघुनाथपंडित, कृष्णंभट, एकाजनार्दन, विठ्ठल बिडकर, वामन पंडित, सुरतसेन, बैजू बावरा, कबीर, रसिक संप्रदायी कवी आणि अनामिक पण या गीतयात्रेत सामील होते. डॉ. रानडे यांनी या कार्यक्रमात नामावली, ध्रुपद, ख्याल, लावणी, भजन, पद, ओवी, ठुमरी इ. गीतप्रकारांतून एकूण 22 रचनांच्या पेशकाशीतून रामाचा अनोखा शोध मांडला होता. रामाविषयी वेगळे सांगीतिक भान तयार करणारा, अत्यंत समृद्ध अनुभव देणारा हा कार्यक्रम सुदैवाने युट्यूबवर उपलब्ध आहे, जिज्ञासूंनी त्याचा लाभ अवश्य घ्यावा.
 
माझ्या संगीतरचनांत राम
 
संगीतकाराच्या भूमिकेतून मीही ‘राम’ हा विषय हाताळला. 12व्या शतकातील जयदेवाचे ‘गीतगोविंद’ हे कृष्णकाव्य सर्वपरिचित आहे. त्याच धाटणीत 15-16व्या शतकातील जयदेव नावाच्याच एका कवीने ‘रामगीतगोविंद’ हे संस्कृत काव्य रचले. या काव्यातील रामावरच्या अष्टपदी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर आणि पलुसकरही गात असत. मात्र, आकाशवाणीवर ‘रामगीतिकाव्य’ एक विशेष कार्यक्रम सादर करताना मी त्यातील काही अष्टपदी स्वरबद्ध केल्या. ‘रामवदनमतिमंजुविलोकय’मध्ये रामाचे रूपवर्णन आहे, त्यास मी स्वरबद्ध करताना रामाच्या व्यक्तित्वाशी सुसंगत वाटेल अशा - भारदस्त असूनही मधुर वाटणार्या - शुद्धकल्याण रागाची निवड मी केली. ‘परशुरामवलोक्य सकोपं’मध्ये राम-परशुराम युद्धाचा आवेग राग अडानामधून दाखवला. वसंत रागात ‘विहरति हरिरिह सरयू तीरे’चा आल्हाद व्यक्त केला. ‘शृणु मम वचन’मधील कैकेयीचा क्रोध मारवा रागातून साकारला. चित्रकूट पर्वतावरील सीतारामांची पर्णकुटी व त्यांचा विहार यांचे वर्णन मांझखमाजच्या प्रसन्न सुरांतून केले, तर अशोकवनातील सीतेचे विरहक्रंदन ‘सीदति सीताऽशोकवने’मध्ये राग मालगुंजीतून उमलले. राम-रावण युद्ध प्रसंग सोहनी रागाच्या तीव्र स्वरांतून, तर रावणवधानंतरचा रामाचा जयजयकार भैरवीच्या कोमल सुरांतून सजवला.
 
‘रामदास पदावली’ या कार्यक्रमात मी संत रामदासांच्या संगीताच्या संदर्भात वेगळ्या ठरतील अशा काही निवडक रचना मांडल्या. त्यात पूर्णत: रागसंगीतातून संत रामदासांचे रामवर्णन उभे केले. ‘वदन सुहास्य रसाळ हा राघव’ हे चंपाकली रागात इकवाई ठेक्यात खयाल म्हणून पेश केले. ‘राम कृपाकर विठ्ठल साकार, दोघे निराकार एकरूप’ मध्ये रामदासांनी राम आणि विठ्ठलात त्यांना जे अद्वैत दिसले, ते व्यक्त केले आहे. त्याला ‘परज कालिंगडा’ या छायालग रागात द्रुत एकतालातील छोटा खयालाच्या रूपात मांडले. ‘इथे का रे उभा श्रीरामा’मधले द्वैत मांझखमाजच्या स्वरांतून दाखवले, तर ‘राम माझी माय कधी भेटईल’मधील कासाविशी राग प्रतीक्षाच्या आर्त स्वरांतून व्यक्त झाली. ‘मनू वेधला हो’ हे रामाच्या राजसभेचे वर्णन करणारे सुंदर पद आहे. त्यात रामदासांनी मृदंगाचे आणि नृत्याचे बोल पेरले आहेत. हे पद मी मध्ययुगीन प्रबंधाच्या रुपात श्यामकल्याणच्या आधारे स्वरबद्ध केले. रामदासांनी श्रीरामावर काही हिंदी रचनाही केल्या होत्या, त्यांपैकी ‘बसो मोरे नैनन में रघुबीर’ला खमाज रागात, जत ठेक्यात ठुमरी शैलीत पेश केले, तर ‘जित देखूं उत रामही रामा’ हे पहाडी धुनेत, पंजाबसिंधकडच्या लोकसंगीताच्या शैलीत सादर झाले. कार्यक्रमाच्या अंती ‘आनंदू रे आजि आनंदू’ हे रामजन्माचे पद सादर करताना आनंद, वात्सल्य, उदात्त भाव या सर्वांना साद देणार्याु भैरवीची स्वरयोजना केली. ‘ऋतुचक्र’ या संकल्पना मैफलीत चैत्र महिन्याचे वर्णन करताना ‘चैतहीकी तीथनवमी तौ नौबती बजाई हौ, बाजई दशरथराज दुवार कौसल्याके मंदर हौ’ हा तुलसीदास कृत सोहरमी सारंगच्या धुनेत लोकगीताच्या शैलीत पेश केला होता.
 
या काव्यरचना स्वरबद्ध करण्याखेरीज मी स्वरचित खयालाच्या बंदिशीतूनही मला भावलेले रामरूप व्यक्त केले. राग ‘आनंद भैरव’च्या बंदिशीत ‘मन रे नाम सुमरो राम, जो नाम लेत तर जात जनम। एक वो ही जीवन को आधार, भव पार होत सुख मिलत परम॥’ असे रामनामाचे महत्त्व व्यक्त केले. बागेश्रीरागात ‘बिनती सुनो मोरी अवधपुर के बसैया’ ही फार सुंदर, भावपूर्ण अशी पारंपरिक बंदिश आहे. तिला जोड बंदिश म्हणून मी रामाचे गुणवर्णन करणारी बंदिश रचली-
 
राम गुण गाऊं नितही, राम पद ध्याऊं नितही, राम जस बखानूं नितही।
पाऊँ विश्राम मन को, सुधबुध विवेक ओज अरु धीर पाऊँ, छब देख जानकीपती की॥
 
एक व्यक्ती आणि देवता म्हणून मला अभिप्रेत असलेला श्रीराम मी गंभीर प्रकृतीच्या श्री रागातील, तेवरा तालातील या ध्रुपद प्रकारच्या प्रबंधातून व्यक्त केले आहे-
 
वंद वंद पदारविंद श्रीराम जनप्रतिपाल हे।
वंद पुरुषोत्तम सीतापति दशमुखांतक दाशरथी रघुनाथ हे।
वंद धीरप्रतापी गुणनिधी शांतमूर्ती पीतवसन सुश्याम हे।
वंद राजीवनयन सुंदर रघुकुलतिलक राम हे॥
 
- डॉ. केशव चैतन्य कुंटे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.