मुंबई : दहशतवाद विरोधी पथक आणि महाराष्ट्र पोलिसांनी मिळून सोमवारी सकाळी पडघ्याच्या बोरीवली गावात मोठी छापेमारी केली. कुख्यात दहशतवादी साकीब नाचण याच्या घरातही छापा टाकण्यात आला. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव २०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अद्याप या कारवाईचा तपशील समोर आलेला नाही, मात्र रविवारी रशियावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आणि सध्याच्या छापेमारीमुळे साकीब नाचणचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. यात अनेक रशियन हवाई तळांना लक्ष्य केले आणि किमान ४० लढाऊ विमाने - बॉम्बर्स आणि मल्टीरोल लढाऊ विमाने - उड्डाण करण्यापूर्वीच जमिनीवर पाडली. हे हल्ले रशियन सीमेच्या आत ४००० ते ५००० किमी अंतरावर करण्यात आले आहेत. युक्रेनने आधीच हे ड्रोन रशियामध्ये तस्करी करून विमानतळांजवळ तैनात केले होते, ज्यामुळे ते अचूकतेने विमानांना लक्ष्य करू शकत होते. भारतातही असाच प्रयत्न करण्यात आला होता, परंतु भारतीय यंत्रणांनी तो वेळीच हाणून पाडला.
सदर घटना पडघा गावात घडली होती, जे २०२३ मध्ये एका मोठ्या दहशतवादी कटाचे केंद्र बनले होते. पडघा हे गाव जणू भारतातील आयसिसचे एक प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर होते. कुख्यात दहशतवादी साकिब नाचनने या गावाला 'अल-शाम' असे नावही दिले होते. त्याहून पुढे गाव शरिया कायद्यांनुसार चालवण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले होते.
साकिब नाचन हा स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया सारख्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता आणि त्याने मुंबईत अनेक दहशतवादी हल्ले केले होते. २००२ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर झालेले बॉम्बस्फोट आणि २००३ मध्ये विलेपार्ले आणि मुलुंड स्थानकांत झालेले स्फोट या हल्ल्यांनंतर, नाचनला अटक करण्यात आली, परंतु तो २०१७ मध्ये तुरुंगातून बाहेर आला आणि त्याने पडघाला त्याच्या दहशतवादी योजनांचा आधार बनवले.
त्यानंतर २०२३ मध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पडघा येथे एक मोठी कारवाई केली. या छाप्यात ४४ ड्रोन जप्त करण्यात आले, जे मुंबईवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आले होते. याशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रे, स्फोटके आणि कट्टरपंथी साहित्य देखील जप्त करण्यात आले. पडघाची घटना आणि रशियावरील ड्रोन हल्ला हे अनेक प्रकारे एकमेकांशी जोडलेले आहेत. पडघा येथील दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करण्यासाठी ड्रोन तयार ठेवले होते त्याचप्रमाणे युक्रेनने रशियन हवाई तळांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोन आधीच तैनात केले होते. भारताने मात्र हा डाव तेव्हा उधळून लावला.