कुंडलिनीशक्ती - ज्ञान-विज्ञान भाग 21

    22-Mar-2023
Total Views |
Kundalini Shakti


उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानंवसादयेत् ख आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ख (अ.6-श्लोक 5)



मनुष्याने स्वत:चा उद्धार स्वतःच्या प्रयत्नानेच करायचा असतो. स्वतःला अधोगतीस जाऊ देऊ नये. आपणच आपले बंधू व आपणच आपले शत्रू असतो. दुसरा किंचित साहाय्य करेल, उद्धार नव्हे. डोक्यावर हात ठेवून अथवा पत्राद्वारेकुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न अशास्त्रीय अतएव भ्रामक आहे. केवळ भावना विवशतेमुळे कुंडलिनी जागृत झाल्यासारखी वाटेल, पण खर्‍या अर्थाने ती जागृत होणार नाहीच. साधकांनी आपला विवेक सतत जागृत ठेवून साधना करावी. भावनेचा आवेग ओसरल्यानंतर, त्या व्यक्तीला व्यथाविकार उत्पन्न होऊन प्रसंगी त्या व्यक्तीचे अध:पतनसुद्धा होऊ शकते.


रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात याची अनेक उदाहरणे दिली आहेत. एक मुलगा कुंडलिनी जागृत होत असताना भावनातिरेकाने प्रत्येकाच्या पायाची धूळ आपल्या माथ्याला लावायचा. त्याची ती अवस्था पाहून रामकृष्णांनी संबंधित लोकांना त्याला सांभाळण्यास सांगितले, अन्यथा तो मुलगा अध:पतित होईल, असे स्पष्ट बजावले आणि झाले तसेच. काही दिवसानंतर तो मुलगा सर्व दुर्गुणांनी संपन्न झाला. उसने अवसान असे किती काळ टिकणार? कुंडलिनी जागृत करवून घेतलेल्या अनेकांचे असे झालेले लेखकाने पाहिले आहे. असली भंपक माणसे निरहंकाराऐवजी अहंकाराने भरलेली दिसतात. काहींना अतिशय त्रास सहन करावा लागतो आणि तो त्रास दूर करणे, हे कुंडलिनी जागृत करण्याचे नाटक करणार्‍यांच्या क्षमतेबाहेरचे असते. असली प्रकरणे लेखकाने हाताळली आहेत.

‘धर्म’ म्हणजे काय?


‘श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्। स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः॥’ (श्लो.35. अ.3)
‘श्रेयान् स्वधर्मो विगुणः: परधर्मात्स्वनुष्ठितात्। स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥‘(श्लो.47. अ.18)


यात उपयोगित केलेला धर्म शब्दाचा अर्थ धर्मपंथ, संप्रदाय अथवा मजहब नव्हे. गीता लिहिली, त्यावेळेस जगात कोणताही धर्म नव्हता. एक वैदिक परंपराच सर्वत्र विद्यमान होती. ख्रिश्चन, मुसलमान आदी धर्मपंथ नंतर निघाले. त्यामुळे ‘धर्म’ या शब्दाची व्याख्या निराळीच असली पाहिजे आणि ती म्हणजे ‘पिंडधर्म’ अथवा ‘पिंडरचना’ होय. याच पिंडधर्माला अथवा पिंडरचनेला गुणाणुरचना असे म्हणतात. गीता स्पष्टच सांगते की, दुसर्‍याची गुणाणुरचना किंवा धर्म कितीही उच्च वाटला आणि स्वतःचा पिंडधर्म कितीही निम्न वाटला, तरी तसल्या उच्च वाटणार्‍या धर्माचा प्रवाह परिणाम स्वत:च्या पिंडावर करवून घेतल्यास साधकास अतिशय त्रास (किल्बिषम) होऊन त्याची अवस्था भयावह होऊन तो कुठलाच राहत नाही. असल्या बळजबरी शक्तिपाताने साधकाला अतिशय त्रास व अध:पतन सहन करावे लागते.

याबद्दलची स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात घडलेली कथा विचार करायला प्रवृत्त करते. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे उच्च भक्त व योगीसुद्धा होते. ते कधी कधी एखाद्याला स्पर्श करून साधनेसाठी आवश्यक ते बदल घडवत असत. त्यांचा तो अधिकार होता. साधक अवस्थेत असताना स्वामी विवेकानंद यांनी हे अनेक वेळा पाहिले होते. थोडी साधना केल्यावर बुद्धिवान व संशोधक वृत्ती असल्यामुळे त्यांना असे वाटले की, मीदेखील असे करू शकतो आणि त्यांनी एक प्रयोग करायचे ठरविले. एकदा ते व त्यांचा काली नावाचा मित्र दक्षिणेश्वर येथे झाडाखाली बसले होते. विवेकानंद म्हणाले की, “मी ध्यान करायला बसतो. काही वेळाने मला स्पर्श कर.” काली ‘हो’ म्हणाला. स्वामी विवेकानंद काही क्षणातच खोल ध्यानात निघून गेले. काही वेळाने कालीने त्यांना स्पर्श केला. विवेकानंद यांनी ध्यान संपवून कालीला विचारले, “मित्रा, तुला काय अनुभव आला?” काली म्हणाला, “माझ्या हातातून विद्युत प्रवाह वाहिल्यासारखा माझा हात थरथरत होता. काही केल्या थांबत नव्हता.” हे ऐकून स्वामी विवेकानंद खूप आनंदित झाले. इतक्यात त्यांचा दुसरा मित्र राखाल धावत आला व विवेकानंदांना म्हणाला, “तुम्हाला ठाकूरांनी लगेच बोलवले आहे.” खरे गुरु अंतर्यामी असतात. ठाकूर म्हणजे रामकृष्णांना शिष्यांचा हा प्रताप लगेच बसल्या ठिकाणी कळला. विवेकानंद तिथे गेल्या गेल्या रामकृष्ण खूप रागावले व म्हणाले, “जमा होण्याआधीच खर्च? तुला कळतंय का तू काय केलंस ते? तो भक्तीमार्गाने व्यवस्थित चालला होता. तुझा ज्ञानमार्ग. आता तो कुठलाच राहणार नाही. सात महिन्याचा गर्भपात झाल्यासारखे हे झाले आहे. जा आता. पुन्हा असं करू नकोस.”

पुढे कित्येक दिवस कालीवर त्याचा परिणाम होता. तो विचित्र पद्धतीने ध्यानाला बसत असे. त्याची उपासना पद्धतीच बदलून गेली. रामकृष्णांनी नंतर त्याला सावरून घेतले, तो भाग वेगळा. कालीचा धर्म कमी प्रकारचा असल्यामुळे उच्च धारणायुक्त विवेकानंदांच्या त्या उच्च धर्माचा त्याच्या पिंडावर विपरित परिणाम झाला. असे बलपूर्वक धर्मपरिवर्तन करू नये, असे गीता वरील श्लोकाद्वारे स्पष्ट सांगते. असे असता गीतेतील श्लोकांचा खोटाच आशय घेऊन शक्तिपाताने कुंडलिनी जागृत करण्याचे अशास्त्रीय व अवांच्छनीय प्रयोग सध्या फार चालले आहेत. असला अधर्माचार आता थांबविला पाहिजे, अन्यथा अध्यात्माच्या नावावर पाखंड व बुवाबाजी माजल्याशिवाय राहणार नाही. असल्या पाखंड्यांची तरी कुंडलिनी जागृत झाली आहे काय, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पुन्हा सांगायचे म्हणजे कुंडलिनी जागृतीकरिता ध्यान आणि सद्विचार हे उत्तम साधन आहे. परंतु, काही योगासने, प्राणायाम प्रक्रिया, गहन एकाग्र अवस्थेत जाऊन तप करणे, देहभान विसरून नामजप करणे यांसारख्या साधनांनी कुंडलिनी जागृत होऊ शकते. चित्त एकाग्र करणे हा त्या मागील मुख्य हेतू आहे. आपले शरीर हवे तेवढे शुद्ध नसते. त्यातील योगनाड्या बद्ध झालेल्या असतात. त्या शुद्ध आणि मुक्त करण्याकरिता काही योगासनांची आवश्यकता असते.

योगासने


वैदिक परंपरेत प्रत्येक शब्द बुद्धिपुरस्सर वापरला जातो. त्यामागे एक शास्त्र असते. ‘आसन’ शब्द दोन उपशब्दांद्वारे प्राप्त केला गेला आहे. ‘आ’ म्हणजे जे प्राप्त केले ते सर्व मिळून आणि ‘सन’ म्हणजे पुढे जाणे, असा ‘आसन’ शब्दाचा आशय आहे. वैदिक परंपरेत सर्व कर्म आत्मज्ञान प्राप्तीकरिता केले जाते. मग आत्मज्ञानासाठीच आसने केली जातात हे वेगळे सांगायला नको, आसनांच्या सतत अभ्यासाने शरीर निरोगी राहून मन सुद्धा प्रसन्न राहते. मन प्रसन्न झाल्यास बुद्धी संतुलित राहून चित्त शुद्ध अवस्थेत राहते. चित्ताची शुद्ध अवस्था म्हणजेच ज्ञान होय. अशा रीतीने आसनांची धाव आत्म ज्ञानाकडे असते हे यावरून दिसून येईल.


-योगिराज हरकरे

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)






 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.