‘समिधाच सख्या या...’ या निष्ठेतून झालेले वैचारिक ’मंथन’

    18-Mar-2023
Total Views |
 
Dr. Satchidananda Shevde
 
 
डॉ. सच्चिदानंद शेवडे वाक्-ब्रह्म आणि शब्द-ब्रह्म दोन्हीचे उपासक. कसदार लिहिणे आणि ते आपल्या अमोघ वाणीतून लोकांपर्यंत पोहोचवणे ही एक अवघड साधना. ते अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि वाणीत स्पष्टता आहे. कुठेही विषयांची किंवा विचारांची गुंतवळ नाही. ते प्रखर राष्ट्रविचारक आहेत, हे नक्की. म्हणजे जे देशाच्या हिताचे आहे, असे त्यांना अभ्यासाअंती पटते तेव्हा ती बाजू ते घेतात. त्यानंतर, ’तीक्ष्ण उत्तरे। हाती घेऊनी बाण फिरे।’ या तुकोबारायांच्या तत्त्वानुसार व्यक्त होतात. ‘एक राष्ट्रप्रेमी विचारवंत’ या भूमिकेतून ते तथाकथित विचारवंतांना, ’डाव्या विषवल्लीला’ अवघड वाटावेत, असे प्रश्न घालण्यास कचरत नाहीत. तशीच त्यांची रोकठोक भूमिका असते.
 
एखाद्या लेखारंभी उचित संस्कृत श्लोक निवडणे व त्याच्या अर्थाच्या अनुषंगाने लेखन विषयावर ऊहापोह करणे हा त्यांचा लेखनविशेष. याचा अनुभव ’प्रहार’ किंवा ’मंथन’ वाचताना येतो. त्यांनी आतापर्यंत 50 वर पुस्तकं लिहिली आहेत.
समाजमाध्यमांना पराङ्मुख राहण्यात धन्यता मानणार्‍या विचारवंतांसारखे ते नाहीत. त्यांनी नव्या पिढीची नाडी ओळखली आहे. ते आपले सडेतोड विचार ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’ या माध्यमांतून सतत मांडत असतात. तरुण पिढीची वैचारिक जिज्ञासा पुरवतात, विविध ज्वलंत विषयांवर व्यक्त होतात. सोबतीला अव्याहत चालणारी व्याख्यानं आणि स्तंभलेख असतातच.
उघडपणे आपल्याला पटते ती बाजू घेणारे विचारवंतदेखील हल्ली कमी झाले आहेत. ‘मध्यममार्गी’ अधिक झाले आहेत. आमच्या व्यवस्थापनशास्त्रात एखाद्या स्केलवर ’अति डावे-डावे-मध्यम-उजवे-अति उजवे’ असे पाच पर्याय असताना ‘मध्यम’ मार्ग निवडणार्‍यांना फारसे विचारात घेतले जात नाही. तसेच, आजच्या सामाजिक व्यवस्थेचे झाले आहे. आपल्याला अभ्यासांती एक बाजू घेणे भाग पडते, त्यामागे आपली निष्ठा प्रामाणिकपणे उभी करणे भाग पडते, तरच त्या विचारांचा परिणाम व्यवस्थेवर होतो, दिसून येतो. पण, त्यालादेखील अभ्यासाचे अधिष्ठान असावे लागते, नेमके हेच मला त्यांचे वेगळेपण वाटते.
 
एक लेखक म्हणून त्यांची राजकारणाची, समाजकारणाची, इतिहास-भूगोल, संस्कृतीकारणाची जाण उत्क्रांत आहे, ती त्यांच्या तथ्याधारित मांडणीतून जाणवते. ते निर्भीक आहेत कारण ते निरपेक्ष विचारवंत आहेत.
 
’मंथन’ हे त्यांचे 51 वे पुस्तक माझ्या वाचनात आले. नुकतेच ’प्रसाद प्रकाशना’ने त्याचे पुण्यात बालगंधर्व सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विचारवंत डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले. या पुस्तकात 20 वैचारिक लेख आहेत, ते विविध विषयांना स्पर्श करणारे आहेत, उद्बोधक आहेत.
 
’विज्ञानांधळेपणा’ या पहिल्याच लेखात ’अंधश्रद्धा’ हा शब्द चुकीचा का आहे, यावर ते टिप्पणी करतात. ’श्रद्धा’ या शब्दातच ’आंधळेपणा’ अनुस्यूत आहे, अशी त्यांची भूमिका. एखाद्या शब्दाच्या अर्थाचा ते चिकित्सकपणे शोध घेतात. सहसा नास्तिक मंडळी अकारणच आस्तिकांच्या वाटेला जातात. आस्तिक कधीही नास्तिकाला देवाचे अस्तित्व मान्य करायला सांगत नाही; नास्तिक मात्र अगोचरपणे हे काम करत असतात. संविधानाने जे अभिव्यक्तिस्वातंत्र्य त्यांना देऊ केले आहे, तसेच ते आस्तिकांनाही दिले आहे, याचे भान असायला नको का? असा प्रश्न ते विचारतात. असे कैक प्रश्न या पुस्तकात आलेल्या लेखन-विषयाच्या अनुषंगाने ते विचारतात आणि वाचक अंतर्मुख होतो, त्याला जाणीव होते- ‘अरे, असे प्रश्न आपण का उघडपणे विचारत नाही? का आपण श्रद्धा विषयांवर होणारे आघात निमूटपणे सहन करतो?’
 
लेखक बर्‍याच वेळा प्रश्नार्थक शैलीचा आधार घेऊन वाचकांना भ्रमित करणारे नास्तिकांचे प्रश्न स्वतःच विचारून त्याची उत्तरं पुरवतात. त्यामुळे लेख संवादात्मक होतात. या पुस्तकातील लेख सुटसुटीत असून एकेका विचारशलाकेला वाहिलेले आहेत.
या पुस्तकात आलेले विषय त्यांनी कैक उदाहरणांनी विशद करून सांगितले आहेत. उदा. ‘रॉकेट्री’, ’गायटन’, ‘रोश व्हर्सेस अ‍ॅडम्स’, ‘अ‍ॅलेक्स हॅले’, ‘फ्रॉम नोन टू अननोन’, ’सिरीभूवलय’, ’कटपयादी’, डॉ. क्रुसो, डॉ. त्रिन्डले, इत्यादी.
 
’कोऽहं कथमिदं जातम्?’ हा लेख हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान व त्यामागील भूमिका समजावून देणारा आहे. ’विश्वमहान संस्कृती’ हा लेख वाचताना जाणवते, खरेच आपण मुघल आणि इंग्रज हाच इतिहास इतका विस्तृत शिकलो आहोत की, त्याआधी कित्येक शतके गाजवणारा तेजाचा इतिहास आपल्या विस्मृतीत गेला आहे. उदा. नंद, शुंग, मौर्य, महामेघवाहन, गुप्त, चोल, पल्लव, कदंब, चेर, पांड्या, सातवाहन, यादव, शिलाहार, विजयनगर, राष्ट्रकूट, चालुक्य, सोळंकी, जाट, राजपूत, बुंदेले, आहोम, शीख, मराठे इ.
’संघर्ष रामजन्मभूमीचा’ या लेखातून ज्वलंत विषयाचा इतिहास थोडक्यात आपल्या डोळ्यासमोर साकारतो, कित्येक पिढ्यांचा लढा कसा फलद्रूप झाला, याची माहिती मिळते. तसेच ’जोखडयुक्त काश्मीर’ सारखा लेख ‘370 कलम’ हटवणार्‍या निर्णयाचे राष्ट्रबांधणीतील महत्त्व अधोरेखित करतो. या विषयावर तर त्यांनी ’काश्मीरनामा’ नावाचे ऐतिहासिक पुस्तक लिहिले आहे, तो त्यांचा ’पीएच.डी’चा प्रबंध-विषय होता. ’राष्ट्रांतर’ हा लेख मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व आणि तसे झाले नाही, तर होणारे परिणाम, यावर प्रकाश टाकतो. या पुस्तकात निवडलेले विषय कायम चर्चेत राहणारे आहेत, त्यावर कैक वेळा ’मंथन’ होते म्हणून ते कदाचित या संग्रहात लेखकाने घेतले असावेत.
 
’श्रीराम आदर्शाचा दीपस्तंभ’ हा लेख तर संपूर्ण अपरिचित अशा रामायणावर प्रकाश टाकतो, त्यात मूळ श्लोकांचा संदर्भ आणि श्लोक पुरवल्यामुळे तो वाचनीय झाला आहे. जाबालीचे मत खोडणारे श्रीराम आणि त्यांची नैतिक भूमिका यातून वाचकासमोर येते.
 
’शोध श्रीलंकेचा’ हे त्यांचे शेजारी राष्ट्राविषयीचे पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे, आपल्याला आपल्या शेजार्‍याबद्दल काहीही माहिती नाही, असे खेदाने नमूद करावे लागते. या पुस्तकातील ’रामायण आणि श्रीलंका’ हा छोटा लेख जरी वाचला तरी त्याचा प्रत्यय येईल. फार कशाला, श्रीलंकेतील या स्थानांची नावेदेखील आपल्याला परिचित नसतात, उदा. केलानिया, नुवारा एलिया, गुरुलुपुथा, युद्धगणाव, पोलोन्नारुवा, दिवुरूमवेला, दोवा, कातरगामा इ.
 
’परशुराम: अपसमजांचे निराकरण’ या लेखात पुन्हा प्रश्न विचारून उत्तरे शोधली आहेत. रूढ असमज कसे चुकीचे आहेत, ते पटवून दिले आहे. उदा. ’21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली,’ असे म्हणणे हेच विरोधाभासी आहे. कारण, निःक्षत्रिय म्हणजे एकही क्षत्रिय उरला नसणे आणि हे कर्म एकदाच होऊ शकते, वारंवार नव्हे! ’जमदग्नींचा उल्लेख ’जितक्रोध’ असा आला असताना त्यांना संतापी समजणे चुकीचे आहे’ इत्यादी व अशा स्पष्टीकरणामुळे आपणच एक वाचक म्हणून आपल्यावर विविध माध्यमांतून थोपल्या जाणार्‍या गोष्टींचा डोळसपणे विचार करू लागतो.
 
’धर्मच्छलाचा लेखाजोखा’मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात केलेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल रोखठोक प्रतिपादन केले आहे, तरी तो काळाकुट्ट इतिहास दडपण्यामागील राजकीय बोटचेपीपणा अधोरेखित केला आहे. अनंत काकबा प्रियोळकरांच्या ’द गोवा इन्क्विझिशन’ या पुस्तकाचा मागोवा घेत हा लेख लिहिला आहे. तो बरेच अपरिचित संदर्भ पुरवून जातो, वाचकाला अस्वस्थ करतो. क्रांतिकारक आणि दहशतवादी यांची तुलना करण्यास देखील जे मागेपुढे पाहत नाहीत, त्यांच्यासाठी ’क्रांतिकारकांचा अध्यात्मवाद’ हा विषय निवडलेला आहे, त्यात वासुदेव ब. फाडके, चापेकर बंधू, स्वा. सावरकर, मदनलाल धिंग्रा, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, कर्तारसिंग सराबा, विष्णू गणेश पिंगळे, राजेंद्र लाहिरी, गोपीनाथ साहा इ.च्या राष्ट्रभक्तीने प्रेरित अधिष्ठानावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ’नाहित्य संमेलन’ या लेखात साहित्यात घुसलेल्या राजकारणावर ऊहापोह केला आहे.
 
मराठी साहित्यक्षेत्र गढूळ होत चालले असताना एखादा विचारवंत सातत्याने लिहिता राहतो, बोलता राहतो, राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन पेटता राहतो, हे सोपे नाही. ’समिधाच सख्या या...’ या निष्ठेतूनच त्याचे अनुष्ठान चाललेले असते. दाहक आणि आश्वासक या दोहोंचा एकत्रित अनुभव घेण्यासाठी ’मंथन’ अपरिहार्य!
 
पुस्तकाचे नाव : मंथन
 
लेखक : डॉ. सच्चिदानंद शेवडे
 
प्रकाशक : प्रसाद प्रकाशन, पुणे
 
मूल्य : 240 रू.
 
पृष्ठसंख्या : 158
 
- जीवन तळेगावकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.