नवी दिल्ली : (Air India Tokyo-Delhi Flight) अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागते तर कधी उड्डाण रद्द करावे लागत आहे. अशात आता पुन्हा अशीच घटना समोर आली आहे. एअर इंडियाचे टोकियोवरुन दिल्लीला येणारे एक विमान अचानक कोलकाता विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टोकियोच्या हनेडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केलेलं हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र, या विमानाच्या केबिनमधील तापमान अचानक वाढल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पायलटने विमान तातडीने कोलकात्याच्या दिशेने वळवले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरवण्यात आले. याबाबत माहिती देताना एअर इंडियाने म्हटले आहे की, "विमान सुरक्षितपणे कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आले असून आम्ही आमच्या प्रवाशांना तातडीने दिल्लीला घेऊन जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहोत."
एअर इंडियाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की "२९ जून रोजी हनेडावरून (टोकियो) दिल्लीसाठी उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान एआय-३५७ च्या केबिनमध्ये सातत्याने तापमान वाढत होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विमान तातडीने उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोलकाता विमानतळ सर्वात जवळ असल्याने हे विमान कोलकात्याच्या दिशेने वळवण्यात आले. पायलटने हे विमान नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर उतरवले. आम्ही विमानाची तपासणी करत आहोत. या अनपेक्षित लँडिंगमुळे प्रवाशांची गैरसोय झाल्यामुळे कोलकात्यामध्ये आमची ग्राउंड टीम प्रवाशांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत पुरवण्यासाठी सक्रिय आहे."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\