
पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात विकास आणि पुनर्विकास दोन्हीही अगदी वेगात सुरु आहेच. पुण्यात घरांना मागणी असून घरखरेदीच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसते. शहराच्या सर्व भागांत ही मागणी पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रही सक्रिय आहे. शहराच्या मध्यभागात बैठी घरे किंवा प्रशस्त आवार असलेल्या बंगल्यांच्या अनेक वसाहती. त्यात काही भागांत अनेक जुन्या इमारतींचे आयुर्मानही बरेच असून अशा भागांतही पुनर्विकासाचे प्रकल्प आकाराला येत आहेत. अनेक बहुमजली इमारतीही दाटीवाटीने उभ्या राहताना दिसतात. उपलब्ध बांधकाम क्षेत्राचा योग्य उपयोग करून देखण्या, उत्तम, आधुनिक इमारती उभ्या करण्यासाठी वास्तुविशारद आपले कौशल्य पणाला लावताना दिसतात. पुणे शहराचा विस्तारही चहूबाजूंनी मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. त्याच जोडीला शहराच्या मध्यवर्ती भागात उंच इमारतींची वाढ होताना दिसते. या वाढीत पुनर्विकासाच्या योजनांचा वाटादेखील आहे. मात्र, पुनर्विकासाच्या जोडीने तिथे पायाभूत सुविधांच्या पुनर्विकासाचादेखील विचार, अंमलबजावणी झटपट व्हायला हवी. रस्त्यांचे उदाहरण पाहू. जुन्या वसाहतींतल्या नव्या इमारतींत अधिक वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध होईलही. मात्र, या वाहनांना पूर्वीच्या लहान रस्त्यांवरूनच बाहेर पडावे लागणार आहे. तसेच हे लहान रस्ते इतर लहान-मोठ्या रस्त्यांना जिथे मिळतात, ते अनेक चौकही लहानच आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल. एकेकाळी पुणे हे ‘सायकलींचे शहर’ होते. यथावकाश ते ‘मोटार सायकलींचे शहर’ झाले. आता ‘मोटारींचे शहर’ झाले आहे. रस्त्यावरील वाहने सरासरीने अधिकाधिक भाग व्यापू लागली आहेत, हे यातून दिसते. यावर मोठ्या रस्त्यांवर उपाय करता येतात. मार्गिका, सिग्नल, फ्लायओव्हर करता येतात. वन वे सारखी वाहतूक बंधने शक्य होतात. लहान रस्त्यांवर वाढत्या वाहनांचा प्रश्न सोडविणे मात्र आवश्यक आहे. मोठ्या रस्त्यांवर उड्डाणपूल आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा वाढत आहेतच. पण, शहरातील पुनर्विकासाला सार्वजनिक सुविधांच्या पुनर्विकासाची जोड मिळायला हवी. रस्त्यांसह सर्व पायाभूत सुविधांच्या पुनर्विकासाचा एकत्रित विचार करावा लागेल. असे झाले तर त्याचा पुण्यातील राहणीमान सुखकर होण्यासाठी नक्कीच हातभार लागू शकेल.
हा ही सूर राहू दे...
माणसाच्या जगण्यात खाणे आणि गाणे हे दोन आनंदाचे भाग असतात. पुणेकर या दोन्हीत आघाडीवर. शहरातल्या कुठल्याही वर्दळीच्या रस्त्यावरून पायी फिरा. आसपासच्या दुकांनाकडे, व्यवसायांकडे पाहा. त्यात खाण्या-पिण्याशी संबंधित सगळ्या प्रकारचे आऊटलेट मोठ्या प्रमाणात दिसतील. रस्त्यावरच्या रहदारीकडे पाहा, त्यात कुणाचे तरी ‘फूड’ पाठीशी घेऊन दुचाक्या दौडवित निघालेले स्वार दिसतील. जे खाण्याबद्दल तेच गाण्याबद्दल. सप्ताहाच्या अखेरीस सुट्टीत आपापला साज आणि आवाज घेऊन काही जण एकत्र येतात, गाणे-बजावणे करतात. वेगवेगळ्या निमित्ताने संगीताचे कार्यक्रम करतात. पुण्यात वर्षभर संगीताचे सूर उमटत असतात. दिवाळीच्या निमित्ताने तर पहाटेपासून रात्रीपर्यंत वेगवेगळे संगीत कार्यक्रम शहरात होतात. या वर्षीही झाले. दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नान आटोपून, उत्सवाचे कपडे परिधान करून संगीताच्या मैफलींना जाणे ही नावीन्यपूर्ण, आनंददायी कल्पना होती. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात पहाटेचे संगीत कार्यक्रम होतात. त्याने त्यातले नावीन्य, अपूर्वाई ओसरली असली तरी दिवाळीच्या पहाटे गायन-वादन ऐकायला जाणे अनेकांना आवडते. मात्र, पहाटेच्या थंड वातावरणात, बंदिस्त सभागृह नसेल किंवा वातावरण पुरेसे उबदार नसेल सूर कधी कधी साथ देत नाही, अशा लहानशा काही अडचणी वगळल्या, तर ’दिवाळी पहाट’चे कार्यक्रम आजही लक्ष वेधून घेतात. यातले बहुसंख्य कार्यक्रम हे शास्त्रीय संगीताचे किंवा त्यावर आधारित असेच होतात. ते व्हावेतही; मात्र त्यात विविध संगीत प्रकारांना स्थानही देण्याचा विचार करता येईल का? महाराष्ट्राला, भारताला संगीत परंपरेचा मोठा ठेवा लाभलेला. लोकसंगीतातील अनेक प्रकारांना आज वाढत्या प्रमाणात व्यासपीठे मिळाली पाहिजे. दिवाळीतला उत्सव सर्व प्रकारच्या संगीताला सामावून घेऊन शकेल का? पुण्यात हे अशक्य नाही. पुण्याला ईशान्येपासून नैऋत्येपर्यंत संपूर्ण भारतातील संगीत ठेव्याचा विचारही अशा संगीतोत्सवात करता येणे शक्य आहे. अशा आयोजनाचा एक भाग लोकसंगीतातील दुर्लक्षित प्रकारांना किंवा अन्य राज्यांतील संगीत परंपरेला समर्पित असा ठेवता येईल. त्याने परिचय, देवाणघेवाण वाढेल. दसरा-दिवाळीच्या या सूरमय उत्सवात अनेक संगीत प्रकार सहभागी होण्याचा आनंद आगळा असेल.
मनोज तुळपुळे