‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम दि. १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या पंधरवड्यात राबवली गेली. या मोहिमेची काल दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत, आपल्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, राष्ट्रव्यापी स्वच्छता श्रमदानाने सांगता झाली. त्यानिमित्ताने या मोहिमेचे स्वरूप आणि भविष्यातही, अशीच यशस्वी लोकचळवळ राबविण्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
भारत हा अतिशय विविधतेने नटलेला आणि एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न, अशा गुणवैशिष्ट्यांनी भरलेला देश आहे. असे असूनही याच भिन्न-भिन्न प्रवृत्तींच्या एकतेमध्येच भारताचे सामर्थ्य सामावलेले आहे आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते विशेष करून जाणवते, उजळून निघते. ‘स्वच्छ भारत अभियान’ (स्वच्छतायुक्त भारतासाठीची मोहीम), हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एक प्रमुख उपक्रम, आपल्या देशात सामूहिक इच्छाशक्ती काय साध्य करू शकते, याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ (SBMAG) ही मोहीम, स्वच्छ, निरोगी आणि चिरंतन भारत घडवण्यासाठीची लोकचळवळ (जनआंदोलन) आहे. तथापि, ही मोहीम केवळ तेवढ्यापुरता तातडीने कार्यवाही करून नंतर सोडून देणारी नाही. ही मोहीम शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन, धोरणांचा पाया रचते. सरकारच्या विविध विभागांनी संयुक्तपणे उचललेल्या पावलांमुळे, हे साध्य झाले आहे.
या उपक्रमाला चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने माझा संपूर्ण चमू, या मोहिमेअंतर्गत दररोज अथक परिश्रम घेत आहे. त्यासाठी राज्याराज्यांमध्ये नियमित भेटी आणि उच्चस्तरीय आढावा घेणे सुरू आहे. या संकल्पामुळेच आम्ही ‘स्वच्छ भारत मोहीम (SBMAG) २.०’अंतर्गत ४.४ लाखांहून अधिक गावांना ‘ओडीएफ प्लस’ दर्जा मिळवून दिला आहे आणि ११.२५ कोटींहून अधिक घरगुती शौचालये आणि २.३६ लाख समाज स्वच्छतागृह संकुले बांधली आहेत.
’स्वच्छता हीच सेवा’ मोहीम, हा या उपक्रमाचा आत्मा, एक महत्त्वाचा घटक आहे. ही चळवळ या अभियानातील जनभागीदारी म्हणजेच सामूहिक लोकसहभाग वाढवण्याला बळ देते. आपण या आधीच २०२२ मध्ये, ’स्वच्छता ही सेवे‘चा सखोल परिणाम अनुभवला आहे. या मोहिमेत २०२२ मध्ये सुमारे दहा कोटी लोकांनी श्रमदान केले आणि यावर्षी गेल्या १२ दिवसांच्या कालावधी पूर्वीपर्यंत सुमारे नऊ कोटी लोकांनी श्रमदान केले आहे, तर या १२ दिवसांत, दररोज सरासरी १.६७ कोटी लोकांच्या सहभागासह आतापर्यंत २० कोटींहून अधिक लोक विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. या प्रचंड लोकसहभागामुळेच आपण यावर्षी देशातील सात टक्क्यांवरून ७५ टक्के गावे ‘ओडीएफ प्लस’ झाल्याचा उल्लेखनीय टप्पा गाठताना पाहिले आहे.
यावर्षी केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, केंद्रीय पंचायती राज आणि ग्राम विकासमंत्री गिरिराज सिंह, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासह, मी ही मोहीम सुरू केली. १५ दिवस चालणारी ही मोहीम, यावर्षी दि. १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या पंधरवड्यात राबवली जात असून, याची सांगता दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत, आपल्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, राष्ट्रव्यापी स्वच्छता श्रमदानाने झाली. यावर्षी ‘स्वच्छ भारत मिशन’ ग्रामीण आणि शहरी या दोहोंच्या माध्यमातून, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
’स्वच्छता ही सेवा’ ही सर्वसामान्य मोहीम नाही. ही मोहीम म्हणजे, सामुदायिक जबाबदारीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने आणि स्वच्छता, हा प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. हा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी, स्वतःहून श्रमदानात सक्रिय सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन आहे. यावर्षी ’कचरामुक्त भारत’ या संकल्पनेअंतर्गत, स्वच्छता हे सामूहिक कर्तव्य आहे आणि स्वच्छता हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यावर भर देण्याचे, या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेच्या यशाविषयी विचारमंथन करताना, या विलक्षण प्रयत्नाच्या सूक्ष्म पैलूंचा सखोल आणि बारकाईने अभ्यास करणे आपल्यासाठी आवश्यक आहे.
सर्वत्र स्पष्टपणे दिसून येणारी स्वच्छता आणि त्याच स्वच्छतेच्या तसेच इतर व्यापक अनुषंगाने स्वच्छता कर्मचारी मित्रांचे कल्याण, हे उद्देश साध्य करताना कोणतीही तडजोड न करणे, हा या मोहिमेचा गाभा आहे. आपल्या समाजातील नेहमीच अनामवीर नायक राहिलेले आपले, हे सफाई कर्मचारी मित्र! समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची ओळख निर्माण करून देणे, हा या मोहिमेचा एक प्रशंसनीय पैलू आहे. आपला सभोवताल परिश्रमपूर्वक स्वच्छ राखून देखभाल करणार्या, या मंडळींची उन्नती साधण्याची गरजदेखील, ही मोहीम अधोरेखित करते.
सार्वजनिक ठिकाणे स्वच्छतेच्या सौंदर्याने पुन्हा एकदा नटवण्याच्या उद्देशाने, प्रचंड रहदारीच्या सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यापासून ते स्वच्छता साधणार्या साधनसामुग्रीचे आणि व्यवस्थांचे नियमित नूतनीकरण, अशा उपक्रमांची एक प्रभावी मालिका, ‘एसएचएस-२०२३’च्या माध्यमातून पाहायला मिळते. या सोबतच ही मोहीम, नदीकाठ, जलस्रोत, पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता राखणे, ही आपली नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याप्रती असलेली बांधिलकी दृग्गोचर करते. पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांच्यातील सहयोगाद्वारे, या दृष्टिकोनाला अनुरूप, अशी एक भक्कम कचरा व्यवस्थापन यंत्रणा सज्ज होऊ घातली आहे.
या संकल्पपूर्तीसाठी, सर्व सरकारी यंत्रणांच्या एकत्रित सहयोगाचा ‘एसएचएस-२०२३’अंतर्गत अंगीकारलेला दृष्टिकोन या टप्प्यावर प्रत्यक्ष राबवणे, हेदेखील महत्त्वाचे आहे. या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे, पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS) आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MOHUA) या व्यतिरिक्त अन्य ५९ सरकारी विभाग, ३० हजारांहून अधिक उपक्रम सुरू करण्यात आणि देशभरात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी, आतापर्यंत ७.५ लाख लोकांना सहभागी करून घेण्यात यशस्वी ठरले आहेत. याशिवाय, या मोहिमेने मिळवलेले सर्वात लक्षणीय यश म्हणजे, या चळवळीसाठी समाजातल्या प्रत्येक घटकाचे घडून आलेले अभूतपूर्व असे अभिसरण.
विद्यार्थी, सरकारी कर्मचारी आणि स्थानिक समाजासह सर्व स्तरातील लोक, एका सामायिक कारणासाठी एकत्र येत आहेत. युवा मानसिकता, कचर्याच्या पृथक्करणाचे म्हणजेच कचर्याची विल्हेवाट लावण्याकरिता, ओला-सुका असे कचर्याचे विविध प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचे महत्त्व ओळखून ते स्वीकारत आहेत. यातूनच आपापल्या समाजामध्ये आपापल्या समुदायांमध्ये स्वच्छतेचे पुरस्कर्ते, अग्रदूत निर्माण होत आहेत. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्य विशेष कार्यक्रम, प्रादेशिक सीमा ओलांडून म्हणजेच एखाद्या विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित न राहता सर्वत्रच, उद्देश पूर्तीची सामूहिक भावना वाढीस लावत आहेत.
यावर्षी झालेली ‘स्वच्छता ही सेवा’ (SHS) पोर्टलची सुरुवात हेदेखील, या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. या सर्व उपक्रमांंतर्गत होत असलेल्या स्वयंसेवी कार्याची, हे पोर्टल बारकाईने नोंद घेते, अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये पूर्वी कधीही जोखता न येणारी पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचे प्रमाण, या पोर्टलमुळे चाचपता येणार आहे, त्यामुळे अशा मोहिमांमध्ये सहभागी नागरिक आणि संस्थांच्या प्रामाणिक आणि असामान्य योगदानाची न्याय्य दखल घेण्याच्या शिष्टसंमत पद्धतीला मूर्त स्वरूप येत आहे. त्याचबरोबरीने ’स्वच्छता ही सेवा २०२३’ या उपक्रमामध्ये ‘भारतीय स्वच्छता लीग’ या देशव्यापी आंतरशहर स्वच्छता स्पर्धेला सामावून घेतल्यामुळे, या मोहिमेत स्पर्धात्मक भावना चेतवली आहे.
मी सर्व देशवासीयांना विनंती करू इच्छितो की, श्रमदानाची भावना आत्मसात करावी, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या शिकवणीतून धडे गिरवावे आणि यापुढेही अशाच स्वच्छता श्रमदानात सक्रिय सहभाग घेऊन आपली गावे, शहरे संपूर्ण स्वच्छ बनवण्यात आपापल्यापरीने योगदान द्यावे.
गजेंद्र सिंह शेखावत
(लेखक भारत सरकारचे जलशक्ती मंत्री आहेत.)