बाळासाहेबांनी लावलेला गुलमोहोर वादळात कोसळला !

    08-Aug-2022
Total Views |
 
हिंदुहृसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती जागविणारा गुलमोहोर कोसळलामुंबई दि ८ ऑगस्ट : दादर शिवाजीपार्क येथे रविवारी रात्री वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेला गुलमोहोराचा वृक्ष उन्मळून पडला. याच वृक्षाच्या छायेत बाळासाहेबांचे समाधीस्थळ आहे. मात्र हे झाड विरुद्ध दिशेला उन्मळून पडल्याने समाधीस्थळाची कोणतीही हानी झाली नाही. मात्र स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.


शिवाजीपार्क आणि बाळासाहेब अतूट नाते आहे. शिवसेना भवनचे बांधकाम करताना, त्याठिकाणी असलेले पिंपळाचे झाड काढावे लागणार होते. परंतु ते झाड न तोडता पुनर्रोपित करावे, अशा सूचना बाळासाहेबांनी दिल्या. या पिंपळाच्या झाडाला शिवाजी पार्क मैदानात जागा देत त्याला जीवनदान दिले होते. शिवसेनेने एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केल्यानंतर पहिले झाड या पिंपळाशेजारीच्या जागेवर शिवसेनाप्रमुखांनी लावले होते.याच शिवाजी पार्कच्या मैदानावरती बाळासाहेबांनी आपल्या हातांनी एक गुलमोहराचे झाड लावले होते. याच वृक्षाच्या छायेत बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले होते.


याबाबत किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, “बाळासाहेबांच्या हस्तेच हे गुलमोहराचे झाड लावण्यात आले होते. रविवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास हे झाड कोसळले. यामध्ये बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले. या झाडाची मुळ जिवंत आहेत. त्यामुळे या झाडाचे पुनर्रोपण केले जाते का? याची तपासणी केली जाणार आहे”, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.