मुंबई : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध झाली असून भाजप खा. रामदास तडस यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच्या अध्यक्षपदासाठी तीन जणांनी अर्ज केले होते. परंतु, काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने रामदार तडस यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संस्थेअंतर्गत मागील सहा-सात दशकांपासून राज्यातील सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आहे. कुस्ती टिकावी, महाराष्ट्राच्या मातीतून मल्ल घडावे आणि महाराष्ट्राच्या मातीतील मल्लांना जागतिक पातळीवर संधी मिळावी हा या स्पर्धेचा उद्देश आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद बरखास्त झाली होती.
संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी पवारांच्या अध्यक्षतेतील राज्य कार्यकारिणी तक्रारी असल्याचा ठपका ठेवत बरखास्त केली होती. त्यामुळे लगेच निवडणूक लावण्यात आली. मागची ३२ वर्ष महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुकीची परंपरा आहे. या वेळेस देखील ही परंपरा कायम राहिली.
कोण आहेत रामदास तडस?
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा २ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रामदास तडस हे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या विधानपरिषदेतून दोनदा आमदार झाले. तसेच रामदार तडस नगरपरिषदचे अध्यक्षही होते. त्यानंतर २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एसटी महामंडळाचं संचालक पदही भूषवल आहे. त्यानंतर २०१४मध्ये भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले.