"सामाजिक न्यायासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा राज्य शासनाकडून सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी पुरस्कार सोहळा संपन्न"

    11-Jun-2025
Total Views |



मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर आणि विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सामाजिक न्यायासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणादायी व्यक्तींच्या विचारांनी सन्मानित करणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आजवरचा सर्वात प्रेरणादायी आणि भावनिक सोहळा ठरला आहे."


मुख्यमंत्र्यांनी यावेळी यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक सन्मानिताचा विशेष गौरव करत म्हटले की, "राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या सज्जन शक्तींच्या कार्यामुळे महाराष्ट्राची सामाजिक शृंखला अधिक मजबूत होत आहे. सरकार अशा सजग कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजघटकांचे कल्याण साधणार आहे."


ते पुढे म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध आहे. संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरकार घरोघरी संविधान उद्देशिका पोहोचवणार असून, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी बळकट करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील."


कार्यक्रमात पुरस्कृत मान्यवरांमध्ये महिला-पुरुष आणि ज्येष्ठ गटातील सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, मागासवर्गीय कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच प्रेरणादायी जीवन जगणारे युवक यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र आणि धनादेश रक्कम असे होते.


या सोहळ्याचे आयोजन सामाजिक न्याय विभागाने प्रभावी पद्धतीने केले असून, राज्य शासनाच्या वतीने पुढील वर्षांपासून हा सोहळा आणखी भव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
या वेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गौरवित मान्यवरांसाठी मोफत प्रवास सुविधा आणि काही विशेष सवलती जाहीर कराव्यात, अशी विनंती केली. या विनंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "ही सकारात्मक मागणी असून, त्यावर लवकरच निर्णय घेऊन घोषणा केली जाईल," असे आश्वासन दिले.


पुरस्कार प्राप्त संस्थांमध्ये महिला- पुरुष आणि ज्येष्ठ वर्गातील सामाजिक कार्यकर्ते, दिव्यांगांसाठी आणि वंचित व उपेक्षित वर्गात कार्य करणाऱ्या संस्था आणि युवा प्रेरणास्त्रोतांचा समावेश होता. या गौरव सोहळ्यामुळे सामाजिक क्षेत्रातील सकारात्मक कार्याला बळ मिळेल आणि सज्जन शक्तींना शासनाची साथ लाभेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्यांचा सन्मान म्हणजे राज्याची बांधिलकी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


"समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. सामाजिक न्याय विभागाने मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका प्रभावीपणे पार पाडली आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले आहे, त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. या पुरस्काराने शासनाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली असून, सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि संघटनेचे मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र शासन सामाजिक न्यायाची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत राहील."


संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र)


पुरस्कारासाठी निवड कठीण, तरीही सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन


"या वर्षी सामाजिक न्याय विभागाकडे ११५० हून अधिक नामांकने आली होती. त्यातून केवळ १३० लोकांची निवड करणं हे अतिशय कठीण होतं. प्रत्येकाचं समाजासाठीचं योगदान महत्वाचं आहे, त्यामुळे सर्वांनाच पुरस्कार देणं शक्य न झाल्यानं खंत वाटते. तरीही पुस्कारप्राप्ती सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्व समाजसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण सरकारसोबत जे सामाजिक कार्य करता, त्याला तोड नाही. या पुरस्कारप्राप्त मान्यवरांसाठी मोफत प्रवास व इतर सवलती मिळाव्यात, अशी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती करत आहे."


सामाजिक न्यायासाठी कार्य करणाऱ्यांचे योगदान म्हणजे समाजप्रबोधनाचा खरा आधार – डॉ. हर्षदीप कांबळे
प्रधान सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग


हा दिमाखदार सोहळा म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या योगदानाची अधिकृत पोहोचपावती आहे. भेदभावाच्या सर्व सीमा ओलांडून जे समाजासाठी कार्यरत आहेत, त्यांचा सन्मान हा आपल्या व्यवस्थेचा गौरव आहे. शासन आणि प्रशासन सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी कायम उभे आहे. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!