रामदासी मठातील ज्ञानोपासना!

    दिनांक  21-Jul-2021 22:24:16
|

Ramdas_1  H x W
 
अनेक सद्ग्रंथांचा संग्रह मठांतून केलेला असल्याने समर्थांचे मठ हे अध्यात्मविद्येची, त्यांच्या अभ्यासाची केंद्रे झाली होती. समर्थशिष्य हे सुशिक्षित आणि अभ्यासू होते आणि त्याचबरोबर ते ज्ञानाची प्रचिती घेणारे कृतिप्रधान साधक होते. त्यांच्या लोकोद्धाराच्या कार्याला वैचारिक बैठक व योग्य दिशा या ग्रंथलेखनाने, ग्रंथवाचनाने मिळत असे. त्यासाठी ज्ञानार्जन आवश्यक होते.
 
 
 
समर्थ रामदासांच्या अंगी अनेक गुणविशेष होते. त्यापैकी समर्थ वाड्.मयातून प्रगट होणार्‍या काही गुणविशेषांच्या आधारे स्वामींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या चरित्रघटनांचा शोध घेता येतो. स्वामींना एकांताची आवड होती. एकांत अनुभवत असताना अध्यात्मग्रंथांचा अभ्यास करावा आणि अनुभवाला येईल तो अर्थ मनात पक्का करावा, त्यासाठी प्रचिती महत्त्वाची, असे स्वामी म्हणतात. ग्रंथाच्या वाचनाने आपली अनुभव संपन्नता वाढते. एकाग्र चित्ताने ग्रंथातील अर्थाचा बोध घ्यावा, या संबंधीची चर्चा मागील लेखातून करण्यात आली आहे. समर्थांचे ग्रंथप्रेम सर्वश्रुत आहे. समर्थस्थापित बहुतेक मठांतून अभ्यासकांसाठी स्वहस्ते लिहून ठेवलेले आहे. ग्रंथ होते, पोथ्या होत्या. त्याकाळी छपाईचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे हस्तलिखित ग्रंथांना महत्त्व होते. त्याकाळी ग्रंथांच्या प्रती उतरवून घेण्याची जबाबदारी सुशिक्षित वर्गाची होती, समर्थशिष्य शिकलेले व अभ्यासू असत. म्हणून शिष्यवर्गाने आपला वेळ फुकट न घालवता, ‘दिसामाजी काही तरी लिहावे’ असा नियम स्वामींनी घालून दिलेला होता. अनेक सद्ग्रंथांचा संग्रह मठांतून केलेला असल्याने समर्थांचे मठ हे अध्यात्मविद्येची, त्यांच्या अभ्यासाची केंद्रे झाली होती. समर्थशिष्य हे सुशिक्षित आणि अभ्यासू होते आणि त्याचबरोबर ते ज्ञानाची प्रचिती घेणारे कृतिप्रधान साधक होते. त्यांच्या लोकोद्धाराच्या कार्याला वैचारिक बैठक व योग्य दिशा या ग्रंथलेखनाने, ग्रंथवाचनाने मिळत असे. त्यासाठी ज्ञानार्जन आवश्यक होते. रामदासस्वामींनी हिंदुस्थानभर अनेक मठ स्थापून तेथे विद्यार्जनाची सोय करुन ठेवली होती. ग्रंथांच्या प्रती स्वहस्ते कशा लिहून ठेवाव्यात, त्यांचे जतन कसे करावे, या संबंधीची तपशीलवार माहिती शिष्यांना व्हावी म्हणून स्वामींनी दासबोधात ‘लेखनक्रिया’ नावाचा स्वतंत्र समास लिहिला आहे. दासबोधातील या 19.1 समासात अक्षर कसे काढावे, या संबंधी सूचना दिल्या आहेत. अक्षर वाटोळे, सरळ, मोकळे, स्पष्ट आणि वळणदार असावे. समासात वर्णन केल्याप्रमाणे स्वामींचे स्वत:चे अक्षर वळणदार, सुंदर, ‘चालिल्या मुक्तमाळा जैशा’ या प्रकारातले म्हणजे माळेत ओवलेल्या सुबक मोत्यांसारखे होते. आज छपाईकलेत तसेच संगणक, लॅपटॉप यांच्या उपलब्धतेत विलक्षण प्रगती झाली असल्याने वळणदार अक्षर काढण्याचे महत्त्व उरले नाही. तरी सुशिक्षित नीटनेटक्या माणसाचे अक्षर सुंदर व वळणदार असावे, याला महत्त्व आहे, हे नाकारता येत नाही.
 
 
 
समर्थ संप्रदायातील प्रत्येकाने विद्येची उपासना केली पाहिजे, याकडे समर्थांचे लक्ष असे. अर्थातच ‘अक्षरशत्रू’ माणसाला या संप्रदायात प्रवेश नव्हता, हे उघड होते. लिहिणे, वाचणे, ‘अर्थान्तर सांगणे’ सांप्रदायिकांसाठी आवश्यक होते. नुसते वाचन, लेखन पुरेसे नव्हते, तर शिष्यांना ग्रंथातील एखाद्या अवतरणावर विवेचन किंवा भाष्य करावे लागे. अवतरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास आवश्यक होता. ‘अर्थान्तर सांगणे’ या बाबीच्या पूर्ततेसाठी विद्याभ्यासाची जरुरी होती. ज्या माणसाला विद्येची अभिरुची नाही, ज्ञानाची जो उपासना करीत नाही, असा माणूस समर्थांच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. अशा माणसाला स्वामी ‘म्हैसमंगळू’ म्हणजे ‘निर्बुद्ध’ म्हणतात.
 
 
ग्रंथ नाही कथा नाही। नाही ज्ञान उपासना।
निश्चयी येकही नाही। तो प्राणी म्हैसमंगळू॥
 
 
अशा निर्बुद्ध माणसाप्रमाणे ज्याला लिहिता येत नाही किंवा वाचनाची ज्याला आवड नाही, अशी माणसे संप्रदायाच्या कामासाठी उपयोगाची नव्हती. ज्ञानाची जिज्ञासा नसणारी ही माणसे कधी कोणाला काही विचारत नाहीत. तसेच, त्यांना कोणी काही विचारले, तर त्यांना काही सांगता येत नाही. थोडक्यात, अशा माणसाच्या वागण्याला कसलेच ताळतंत्र नसते. वागण्यात, बोलण्यात, पोरकटपणा असतो. समर्थांच्या मते, अशा माणसाची अवस्था दयनीय असते. स्वामी म्हणतात,
 
 
लिहिणे नाही वाचणे नाही। पुसणे नाही सांगणे नाही।
नेमस्तपणाचा अभ्यास नाही। बाष्फळपणे॥
 
 
या प्रकारच्या माणसांना समर्थसंप्रदायात स्थान नव्हते, हे उघड आहे. संप्रदायाच्या प्रवर्तकाच्या अंगी ज्या गुणांची आवश्यकता असते ते सारे गुण समर्थांच्या जवळ होते. तथापि तत्कालीन इतर संप्रदाय, जसे झपाट्याने वाढले तसा समर्थसंप्रदाय वाढला नाही, याचे मुख्य कारण म्हणजे सांप्रदायिकांची केवळ संख्या वाढवण्यावर स्वामींनी भर दिला नाही. संप्रदायात येऊ इच्छिणार्‍या माणसाची योग्यता पाहूनच त्याला संप्रदायात प्रवेश दिला जाई. ऐर्‍यागैर्‍यांना तेथे प्रवेश नव्हता. समर्थसंप्रदायातील प्रवेशासाठी स्वामींनी संख्येपेक्षा गुणवत्तेवर भर दिला होता.
 
 
स्वामींनी त्या काळाला अनुसरुन कोदंडधारी रामाची व वीर मारुती, दास मारुती यांची उपासना करायला लोकांना सांगितले. हे जरी खरे असले, तरी लोकांनी ज्ञानाचीही उपासना करावी, असा समर्थांचा आग्रह असे. ज्ञानोपासनेसाठी ग्रंथांची आवश्यकता असते. ज्ञानोपासकांचे ग्रंथांवर प्रेम असले पाहिजे, तरच त्यातील विचारांचा ते उपयोग करुन घेतील आणि ग्रंथांची नीट काळजी घेतील, हे जाणून स्वामींनी आपल्या सर्व मठांतून अध्यात्मग्रंथाच्या संग्रह करून ठेवण्याची सोय करून ठेवली होती. लोकोद्धाराचे काम करणार्‍या व ज्ञानार्जनाची साधने सांभाळणार्‍या या मठांवर समर्थांचे नियंत्रण असे. सर्व मठाधिपतींना आपल्या मठाचे वृत्त चाफळला स्वामींकडे पोहोचवावे लागे. तशी शिस्त होती. समर्थ रामदासांच्या पूर्वी कोणीही संताने अथवा सत्ताधीशाने हिंदुस्थानभर मठस्थापना करून तेथे ग्रंथालये, अध्यात्मकेंद्रे उभारण्याचा अवाढव्य खटाटोप केला नाही. प्रत्येक मठातून ग्रंथ उतरवून ठेवण्याची कल्पनाही समर्थांचीच! स्वामींनी मठांचा, संस्कार केंद्रांचा, ज्ञानोपासनेचा प्रचंड व्याप शिष्यांच्या साहाय्याने स्वबळावर उभा केला होता. सांभाळला होता. पुढे काळाच्या ओघात आणि दुष्ट, दुराचारी, धर्मद्वेषाने पछाडलेल्या आक्रमकांच्या तडाख्याने समर्थांचे अनेक मठ नष्ट झाले. त्याबरोबर ज्ञानार्जनाची साधनेही नष्ट करण्यात या दुष्टांनी आनंद मानला.
 
 
रामदास स्वामींनी केलेल्या देशभर भ्रमंतीत लोकांची धार्मिक, राजकीय अनास्था, सांस्कृतिक बेफिकिरी पाहिली होती. लोकांमधील अडाणीपणा त्यांनी बघितला होता. थोडक्यात सर्वच क्षेत्रातील अवकथा पाहून स्वामींचे हृदय पिळवटून गेले होते. लोकांना तशा स्थितीत पाहून स्वामींना विस्मय वाटत होता.
 
 
फिरे दास उदास लोकांस पाहे।
मनामाजि थक्कित होऊन राहे॥
 
 
स्वामींना याचे आश्चर्य वाटत होते की, कोणीही सूज्ञ, अज्ञ सत्ताधीश अथवा धर्मपीठाचे आचार्य यासंबंधी बोलत नाहीत. जिथे बोलणेच नाही तिथे कृती तर दूरच राहिली, अशा परिस्थितीत समाजव्यवस्था सावरण्यासाठी स्वामींना मठस्थापनेची कल्पना सुचली असावी. हे झाले निमित्तकारण, तथापि स्वामींचा स्वभावच मुळात आव्हाने स्वीकारणारा होता. त्यांच्या ठायी झुंजार वृत्ती होती. व्याप-खटाटोप-साक्षेपी उद्यमशीलता हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यामुळे कुठल्याही कठीण परिस्थितीत हातावर हात ठेवून स्वस्थ न बसता स्वामी त्यातून मार्ग काढत. यातूनच मठस्थापनेच्या कल्पनेचा जन्म झाला असावा. समर्थांच्या ग्रंथातून आत्मप्रचिती महत्त्वाची असल्याने त्या ग्रंथातून स्वामींचे आत्मचरित्र कसे उलगडता येते, ते पुढील लेखात पाहू. (क्रमश:)
 
 
- सुरेश जाखडी
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.