भारताचे बदलते जागतिक धोरण

    11-Apr-2021   
Total Views | 115

india _1  H x W





काळानुरूप जगाचा विस्तार हा झपाट्याने होत आहे. त्यामुळे जगाच्या पटलावर अनेक समीकरणे वेगाने बदलताना दिसतात. त्यात जगाच्या पाठीवर विविध देशांची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि विशेषत्वाने आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने असणारी धोरणे बदलताना दिसत आहेत. तेव्हा भारतानेही नवीन बदलत्या धोरणांच्या अनुषंगाने आपले धोरण आता बदलण्यास सुरुवात केली आहे, असे दिसून येते.



सध्याच्या घडीला भारताने जगात जे स्थान निर्माण केले आहे. तसेच, जगाच्या पटलावर भारताची जी छबी आहे, त्या दृष्टीने विचार करता जगातील कोणत्याही राष्ट्राला भारत व भारताच्या भूमिकेला दुर्लक्षित करून चालणार नाही. मात्र, ज्या वेगाने वैश्विक घटनाक्रम घडत आहेत, त्यावरून त्याच वेगाने विविध देशांमधील संबंध नवीन पद्धतीने परिभाषित होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांच्या आताच्या भारत यात्रेच्या माध्यमातून नवीन संकेत समोर येत आहेत.
 
 
 
महत्त्वपूर्ण म्हणजे या काळात, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या रशियाच्या समवेत भारत-रशियाच्या वार्षिक शिखर परिषदेच्या तयारीसंदर्भात, आण्विक, अवकाश आणि संरक्षण क्षेत्रातील दीर्घकालीन भागीदारी आणि संबंधांच्या विविध आयामांचा समावेश केला. भारत आणि रशिया यांच्यात दीर्घ काळापासून मजबूत संबंध आहेत, यात काही शंका नाही आणि जागतिक स्तरावर समानता आणि सन्मान यावर आधारित एक भक्कम भागीदारी म्हणून याकडे पाहिले जाते. पण हेही खरे आहे की, गेल्या काही वर्षांत या मोर्चावर संबंध हवे तसे मुलायम राहिलेले पाहावयास मिळाले नाहीत.
 
 
कदाचित त्यामागील मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर बदलणारी स्थित्यंतरे असू शकतात. गेल्या काही वर्षांत, जगभरातील परिस्थिती बदलत असताना, मुत्सद्दी स्तरावर वेगवेगळ्या देशांमधील नवीन सामंजस्य विकसित होत आहे. बदलत्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये भारताने आपली मजबूत उपस्थिती नोंदविली आहेच. परंतु, ज्या वेगाने नवीन जागतिक घडामोडी घडत आहेत. त्या देशांनुसार संबंधदेखील नव्याने परिभाषित केले जात आहेत. या दृष्टिकोनातून, रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांची भारत भेट नक्कीच महत्त्वाची आहे.
 
 
जगात नवीन मुत्सद्दी समीकरण तयार होत असल्याने भारत पूर्णपणे तटस्थ राहू शकत नाही. विशेषत: त्यावेळी ज्यावेळी जगात घडणार्‍या कोणत्याही सामान्य उलथापालथीचा परिणाम भारताच्या हितावरही होऊ शकतो. शीतयुद्धानंतरच्या काळात शांतता आणि सहकार्याची घोषणा जागतिक दृष्टिकोनातून बळकट झाली आहे. परंतु, अमेरिका आणि रशिया यांच्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संघर्ष होण्याच्या मार्गाने विविध ध्रुवांचे संतुलन नवीन आकार घेऊ शकते. ही चिन्हे लक्षात घेता, भारत नेहमी जागरुक राहिला आहे. म्हणूनच एकीकडे अमेरिकेशी असणार्‍या संबंधांना जोपासताना दुसरीकडे रशियाबरोबरच्या जुन्या व बळकट नात्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता भारत बाळगताना दिसतो.
 
 
वास्तविक, या वर्षाच्या अखेरीस भारत आणि रशियादरम्यान वार्षिक शिखर परिषद होणार आहे. या स्तराचे आयोजन करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक आहे, म्हणून दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांमध्ये या विषयावर विशेष चर्चा झाली. परंतु, भारत आणि रशिया यांचा परमाणु, अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भागीदारीचा दीर्घ इतिहास असल्याने नवीन परिस्थितीत या विषयावर विचार होणे स्वाभाविक आहे. याव्यतिरिक्त, ऊर्जा आणि प्रादेशिक क्षेत्रातील भारत आणि रशिया यांच्यात वाढीव सहकार्यासह क्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर ठोस संवाद झाला. खासकरून ‘कोविड-19’ या साथीचे आव्हान आहे.
 
 
 
’कोविड’ प्रतिबंधात्मक लसीविषयी चर्चा होणे ही काळाची गरज आहे. लावरोव यांच्या भेटीपूर्वी रशियन दुतावासाचा संदेश लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, रशिया सद्भावना, एकमत आणि समानतेच्या तत्त्वांवर आधारित सामूहिक कृतींना मोठे महत्त्व देतो आणि संघर्ष आणि गटबाजी नाकारतो. परंतु, काही काळ राजनयिक स्तरावरील नवीन घडामोडींमधील आणि रशिया व चीनच्या पुढाकाराने ‘प्रादेशिक सुरक्षा संवाद मंच’च्या प्रस्तावाला प्रतिसाद म्हणून ’क्वाड’ची स्थापना कशी झाली, हे कसे दिसते? अशा परिस्थितीत भारताला तो संतुलित करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. भारत यासाठी नक्कीच सक्षम आहे.



प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121