जपूया सह्याद्रीतील ‘प्रदेशनिष्ठता’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2021   
Total Views |

Sahyadri _1  H
सह्याद्रीच्या खोर्‍यात आढळणारी वन्यजीवांची प्रदेशनिष्ठता ही थक्क करणारी गोष्ट आहे. सोप्या भाषेत प्रदेशनिष्ठता म्हणजे एखादी गोष्ट स्थानिक असणे. थोडक्यात, एखादा जीव जगामध्ये केवळ विशिष्ट भूभागामध्येच आढळत असल्यास त्याला इंग्रजीमध्ये ‘एन्डेमिक’ आणि मराठीत ‘प्रदेशनिष्ठ’ असणे म्हणतात. सह्याद्रीच्या पर्यावरणीय परिसंस्थेत प्रतिकिलोमीटर प्रदेशनिष्ठ जीवांची ही विविधता बदलते. प्रामुख्याने ही प्रदेशनिष्ठता छोट्या जीवांमध्ये आढळते. साप, सरडे, पाली, कोळी, चतुर, मासे, फुलपाखरे अशा छोट्या जीवांमध्ये ती विपुल प्रमाणात दिसून येते. मात्र, ही समृद्ध जैवविविधता सह्याद्रीमध्ये छोट्या-छोट्या भूप्रदेशांमध्ये मर्यादित आहे. उदा. नव्याने शोधलेली ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’ ही गोड्या पाण्यातील माशाची प्रजात जगामध्ये केवळ आंबोलीतील महादेव मंदिर परिसरातील कुंडामध्येच आढळून येते किंवा ‘निमास्पिस आंबा’ ही पालीची प्रजाती जगात फक्त आंबा घाटातच दिसते. त्यामुळे अशा सूक्ष्म आणि मर्यादित अधिवास क्षेत्रात अस्तित्व असणार्‍या जीवांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आंबोलीतील स्थानिक लोकांच्या मदतीने ‘शिस्टुरा हिरण्यकेशी’च्या अधिवासाचे संवर्धन करण्याच्या निमित्ताने या चळवळीला सुरुवात झाली आहे. अशा चळवळी इतर भागांतही सुरू करणे आवश्यक आहेत. कारण, सह्याद्रीच्या पर्यावरणामध्ये वाढणार्‍या मानवी हस्तक्षेपामुळे हा अधिवास नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे लोकांनीच पुढाकार घेऊन छोट्या हरित कप्प्यांमध्ये आढळणार्‍या प्रदेशनिष्ठ जीवांचा अधिवास वाचविणे गरजेचे आहे. सह्याद्रीमधील प्रदेशनिष्ठ जीवांच्या अधिवासाचे संवर्धन करणे का महत्त्वाचे आहे? याविषयी सह्याद्रीमध्ये वन्यजीव संशोधनाचे काम करणार्‍या तज्ज्ञ अभ्यासकांकडून जाणून घेतलेली त्यांची मते...

 

 
 
प्रदेशनिष्ठता जपणे गरजेची - डॉ. वरद गिरी, ज्येष्ठ उभयचर/ सरीसृप संशोधक

सह्याद्रीमध्ये संरक्षित वनक्षेत्राचा प्रदेश कमी असला, तरी अस्तित्वात असलेल्या राखीव वनक्षेत्रांमध्ये प्राणी आणि वनस्पतींची समृद्ध जैवविविधता आढळते. या प्रदेशात आजवर केलेल्या सर्वेक्षणातून उलगडलेल्या उभयचर आणि सरीसृपांच्या बहुतांश प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. एखादी प्रजाती एका विशिष्ट प्रदेशातच का आढळते, यामागे खूप कारणे दडलेली असतात. त्या भागाची उत्क्रांती, तेथील भौगोलिक परिस्थिती या सर्वांचा प्रभाव तेथील जैवविविधतेवर होतो. म्हणून प्रदेशनिष्ठ प्रजातीचे महत्त्व खूप असते. त्या केवळ विशिष्ट भागातच आढळतात आणि तेथे काही बदल झाला तर त्या नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. वन विभाग, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्यजीव संवर्धन करणार्‍या संस्थांमुळे 2006 पासून सह्याद्रीमध्ये उभयचर आणि सरीसृपांच्या नोंदीला सुरुवात झाली. याचा परिणाम म्हणजे ’बुफो कोयनाएन्सिस’ या नव्या टॉड प्रजातीचे आणि ’राब्डॉप्स ऑलिव्हेशियस’ या नव्या सापाच्या प्रजातीचा शोध लागला, ज्या प्रदेशनिष्ठ आहेत. त्यानंतर या भूप्रदेशामधून आजतागायत अनेक प्रदेशनिष्ठ उभयचर आणि सरीसृपांच्या प्रजातींचा शोध लागला असून संशोधनाचे काम सुरू आहे. या प्रदेशात संरक्षित नसलेले वनक्षेत्र प्रचंड मानवी दबावाखाली आहे. ही वने संरक्षित नसल्यामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. खाणकामही वाढत आहे आणि त्यांचे मुख्य लक्ष्य पठार आहे. इतर दबाव हे कृषी आणि गुरे चराईच्या स्वरूपात आहेत. यामुळे एक परिपूर्ण अधिवास नष्ट होण्याची आणि एकमेकांना जोडलेल्या अधिवास क्षेत्राचे विखंडन होण्याची शक्यता आहे.
 
 
 
वनक्षेत्रांच्या तुकड्यांचेही संरक्षण आवश्यक - तेजस ठाकरे, वन्यजीव संशोधक
 
पश्चिम घाटामधील मध्य आणि दक्षिण घाट रांगांपेक्षा सह्याद्री किंवा उत्तर-पश्चिम घाट हा उत्क्रांतीच्या चक्रानुसार फारच नवीन आहे. यामागचे कारण म्हणजे काही दशलक्ष वर्षांपूर्वी दख्खनच्या प्रदेशात झालेल्या ज्वालामुखीय घटना. त्यामुळे सह्याद्री किंवा उत्तर-पश्चिम घाटामधील प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती तुलनेत उत्क्रांतीच्या अनुषंगाने नवख्या असून या अधिवासावर वनांची निर्मिती होऊ लागल्यानंतर त्यामध्ये विविधता येऊ लागली. सह्याद्रीमध्ये बर्‍याच प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत. त्या दक्षिणेकडील भागांमध्ये सापडत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, याठिकाणी पूर्वी आकारमानारुप समान दिसणार्‍या आणि मोठ्या भूप्रदेशात सापडणार्‍या प्रजाती या अनुवांशिकीय रचनेनुसार वेगवेगळ्या म्हणजेच स्वतंत्र प्रजाती असल्याचे लक्षात येत आहे. अशा स्वतंत्र प्रजाती या सह्याद्रीमध्ये छोट्या-छोट्या भूभागांसाठी प्रदेशनिष्ठ आहेत. त्यांच्या वर्गीकरणामुळेच (टेक्सोनोमी) अलीकडच्या काळात त्यांच्या अधिवास क्षेत्राच्या जतनाची निकड समोर आली आहे. सह्याद्रीतील अजूनही काही भूभागांमध्ये मानवी हस्तक्षेप झाला नसला, तरी त्यातील बहुतांश भाग लहान तुकड्यांमध्ये विखुरला गेला आहे. आपली वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजांचा प्रचंड दबाव त्याच्यावर आहे. खाणकाम आणि एकपीक शेती पद्धतींचा त्याला धोका आहे. म्हणूनच ’शिस्टुरा हिरण्यकेशी’सारख्या संकटग्रस्त प्रजातींचा शोध घेणे आवश्यक असून आपल्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्यासाठी संशोधक, स्थानिक लोक आणि सरकार यांच्या सर्व प्रयत्नांची गरज आहे.

पाली-सरडेही महत्त्वाचे - अक्षय खांडेकर, सरीसृप संशोधक
 
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील पश्चिम घाटाच्या उत्तर भागाला उत्तर पश्चिमी घाट म्हणून ओळखले जाते. ज्याला ’सह्याद्री’ म्हणून स्थानिक पातळीवर संबोधतात. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील मोठा भाग हा महाराष्ट्रात येतो. पश्चिम घाटाच्या इतर डोंगररांगांच्या तुलनेत सह्याद्रीची पर्वतरांग ही उंचीने कमी असून याठिकाणी पठार, सडे, निम-सदाहरित जंगल अशा प्रकारच्या पर्यावरणीय परिसंस्था आहेत. त्यामुळे येथील जैवविविधता समृद्ध आहे. ही अनोखी परिसंस्था बर्‍याच प्रदेशनिष्ठ विशेषत: प्रदेशनिष्ठ पालींचे अधिवास क्षेत्र आहे. पालींच्या नुकत्याच शोधलेल्या ‘आंबा ड्वार्फ गेको’ आणि ’कोयना ड्वार्फ गेको’ या प्रजाती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाट आणि सातारा जिल्ह्यातील कोयनानगर खेरीच जगात कुठेही सापडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचा र्‍हास झाल्यास त्यादेखील कायमच्या नष्ट होतील. अन्नसाखळीमध्ये सरडे आणि पाली महत्त्वाची भूमिका बजावतात. ते उत्कृष्ट नैसर्गिक कीटक नियंत्रक आहेत. त्यामुळे अन्नसाखळी सुरळीत राखण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांचे संवर्धन करण्याचा एकमेव शक्य मार्ग म्हणजे त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे.
 
 
मर्यादित अधिवासामुळे संवर्धनाची गरज - डॉ. दत्तप्रसाद सावंत, चतुर/ टाचणी संशोधक
 
प्रदेशनिष्ठ प्रजातींमध्ये चतुर आणि टाचण्यांचा विचार केला, तर या प्रजातींचा अधिवास हा अतिशय छोट्या भागापुरता मर्यादित असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास पश्चिम घाटाच्या ‘मायरिस्टिका स्वॅप्म’च्या जंगलात आढळणारी ’मायरिस्टिका सफायर’ ही टाचणी केवळ त्या काही चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दलदलीमध्येच आढळते. प्रदेशनिष्ठ चतुर आणि टाचण्यांचा अधिवास नष्ट झाल्यास या प्रजाती कायमस्वरूपी नामशेष होण्याचा मोठा धोका आहे. निलगिरी पर्वत आणि अनामलाई पर्वत या भागात प्रदेशनिष्ठ चतुर आणि टाचण्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे ‘क्लबटेल चतुर’ आणि ‘रीडटेल’ नावाच्या टाचण्या या एका विशिष्ट उंचीवरील पर्वतीय प्रदेशातून वाहणार्‍या गोड्या पाण्याच्या झर्‍यांमध्येच दिसून येतात. अशा झर्‍यांचे पाणी जराजरी प्रदूषित झाले, तरी या प्रजाती तेथे प्रजनन करू शकत नाहीत. परिणामी, त्यांचे अस्तित्व त्या ठिकाणाहून नाहीसे होते. यातील बर्‍याचशा प्रजाती पाण्याच्या उत्तम गुणवत्तेचे द्योतक आहेत. त्यामुळे अधिवासामध्ये होणारे प्रदूषण तसेच बेसुमार जंगलतोड यामुळे अशा प्रदेशनिष्ठ प्रजाती नष्ट होण्याचा धोका अधिकच गंभीर झाला आहे. आकाराने मोठे असलेले चतुर हे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक खाऊन माणसाला एक प्रकारे मदतच करत असतात. जर अशा प्रजाती नष्ट झाल्या तर अन्नसाखळीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध प्रदेशनिष्ठ चतुर आणि टाचण्या यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांचा अधिवास टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
 
 
कोळ्यांची प्रदेशनिष्ठताही महत्त्वाची - राजेश सानप, कोळी संशोधक
 
हवामान, झाडांचे प्रकार, भक्ष्य या सगळ्या गोष्टींनादेखील प्रदेशनिष्ठ प्राण्यांच्या जीवन चक्रामध्ये असामान्य महत्त्व आहे. असे प्राणी जर नष्ट झाले किंवा त्यांची संख्या खूप कमी झाली, तर त्यांना वाचवणे फार अवघड होईल. कोळीदेखील याला अपवाद नाही. सूक्ष्म अधिवास क्षेत्रातील एक शिकारी प्राणी म्हणून कोळी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ’थ्रिगमोपीयस इग्निसिस’ ही टॅरॅन्टुलाची प्रजात आंबोलीत आढळणारी प्रदेशनिष्ठ प्रजात आहे. भारतातील सर्वात मोठ्या टॅरॅन्टुलापैकी ही एक आहे. तसेच केवळ महाराष्ट्रातील पुण्याच्या परिसरात आढळणारी ’इंडोथेल ड्युमिकोला’ ही टॅरॅन्टुलाची प्रजातदेखील प्रदेशनिष्ठ आहे. याशिवाय मुंबईतील आरे दुग्ध वसाहतीमधून नुकताच ’रॉबस्ट ट्रॅपडोर’ (हॅप्लॉक्लास्ट्स व्हॅलिडस) या टॅरॅन्टुला प्रजातीचा शतकानंतर पुनर्शोध लावण्यात आला. प्रदेशनिष्ठ कोळ्यांवर होणारे दुष्परिणाम हे अन्न साखळीच्या अगदी शेवटच्या स्तरापर्यंत संक्रमित होऊ शकतात. मुळातच कोळ्यांच्या भारतातील सर्वसाधारण भौगोलिक विस्तारावर किंवा त्यांच्या परिसंस्थांवर कमी अभ्यास झाला आहे. तसेच प्रदेशनिष्ठ कोळी प्रजातींचे वाघ किंवा हरणांप्रमाणे विस्थापन किंवा पुनर्वसन करणे शक्य नाही. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत फार कमी कोळ्यांना संरक्षण दिले गेले असल्याने, विविध संवर्धन उपक्रमामध्येदेखील कोळी दुर्लक्षित केले गेले जातात. अशा कोळ्यांचे संवर्धन करायचे असेल तर त्यांचा अधिवास वाचवण्याखेरीज पर्याय नाही.
 
 
फुलपाखरांचेही संवर्धन - हेमंत ओगले, फुलपाखरू अभ्यासक
 
संपूर्ण जगातील प्राण्यांच्या संख्येच्या तुलनेत कीटकांची संख्या जवळपास 70 टक्के आहे. जवळपास सर्वच झाडांचे परागीकरण हे कीटकांमुळे होत असल्याने संपूर्ण अन्नव्यवस्था कीटकांवर अवलंबून आहे. फुलपाखरेही यामधील खारीचा वाटा उचलतात. फुलपाखरांचे जीवनचक्र काही विशिष्ट वनस्पतींवर अवलंबून असते, या वनस्पती ज्या भागात विपुल प्रमाणात आढळतात तसेच तेथील वातावरण जर पोषक असेल तरच ती फुलपाखरू त्या भागात दिसतात. ज्या भागात फुलपाखरांची जैवविविधता आणि घनता अधिक असते ते भूभाग पर्यावरणीय संतुलन आणि समृद्धतेने श्रीमंत असल्याचे आढळते. याचाच अर्थ फुलपाखरांची विविधता आणि घनता हे त्या जंगलाचे किंवा परिसराचे जैविक निर्देशक आहेत, असे म्हणणे चुकीचे होणार नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@