पालघर - महसूल विभागाचे १२१ हे. कांदळवन क्षेत्र वनांसाठी वळते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2021
Total Views |

mangrove _1  H


राज्यातील १६८ चौ.किमी कांदळवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महसूल विभागाने पालघरमधील आपल्या मालकीचे १२१ हेक्टर कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे वळते केले आहे. त्यामुळे राज्यात वन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या कांदळवन क्षेत्रात वाढ झाली आहे. राज्यात सद्यपरिस्थितीत ३२० चौ.किमी क्षेत्र कांदळवनांनी आच्छादलेले असून त्यापैकी केवळ १६८ चौ.किमी क्षेत्र वन विभागाच्या मालकीचे आहे.
 
 
राज्यात किनारपट्टी परिसरात पसरलेले कांदळवन क्षेत्रांची मालकी सरकारच्या विविध संस्थांकडे आहे. याशिवाय साधारण १३ हजार हेक्टर खासगी जागेवर कांदळवन क्षेत्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २००७ आणि २०१८ साली सर्व सरकारी कांदळवन जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यावर गेल्या काही महिन्यांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बैठका घेऊन या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत. जानेवारी महिन्यात ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेने आपल्याकडील कांदळवन जमिनींचा ताबा वन विभागाकडे दिला होता. त्यानंतर आता महसूल वन विभागाने देखील पालघर जिल्ह्यातील १२१ हेक्टर क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी वन कायद्याच्या कलम ४ अंतर्गत प्रस्तावित केले आहे.
 
 
 
 
महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या पालघर जिल्ह्यातील पामटेंभी गावातील कांदळवन जमीन वन विभागाकडे वळती करण्यात आली आहे. २०१९ च्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात ३२० चौ.किमी क्षेत्रावर कांदळवन आहे. पालघरमधून आता वळते केलेले १२१ हेक्टर क्षेत्र मिळून त्यामध्ये केवळ १६८ चौ.किमी क्षेत्र हे वन विभागाच्या ताब्यात आहे. उर्वरित १५२ चौ.किमी क्षेत्र हे इतर सरकारी संस्था आणि खासगी मालकीचे आहे. त्यामुळे सरकारी संस्थांच्या ताब्यातील कांदळवनांच्या जमिनींच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात येणे आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@