किशोरी विकास प्रकल्प : समाज जागृतीचा संकल्प

    20-Oct-2021
Total Views | 416
seva _1  H x W:


समाजातील अत्यंजांपर्यंत पोहोचून त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारी ‘सेवा सहयोग संस्था, मुंबई’ आणि परिसरातीलच नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, आरोग्य आणि महिला बाल सक्षमीकरणासाठी ‘सेवा सहयोग संस्था’ काम करते. ‘सेवा सहयोग संस्था’ समाजाला ग्रासणार्‍या विविध प्रश्नांना थेट सामोरी जाते. किशोरवयीन मुलींचे प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत. त्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि एकंदर विकास यामध्ये ‘सेवा सहयोग’ महत्त्वाची भूमिका निभावते. किशोरवयीन मुलींसाठी ‘सेवा सहयोग’चा किशोरी विकास प्रकल्प सुरू आहे. त्या प्रकल्पासंदर्भात या लेखात मांडणी केली आहे.



गीता मोघे - सेवा सहयोग फाऊंडेशन’चा ‘किशोरी विकास’ प्रकल्प हा मुलांसोबत काम करताना जाणवलेल्या गरजेतून निर्माण करण्यात आला. समाजातील बदललेली जीवनशैली, कुटुंबव्यवस्था, समाजमाध्यामतून होणार्‍या माहितीचा ओघ, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रश्न, बालक पालकांमधील कमी होत चाललेला संवाद त्यातून निर्माण होणारे भय मुलांमध्ये अस्वस्थता निर्माण करीत असल्याचे जाणवते. समाजात निर्माण झालेल्या गरजेतून ‘किशोरी विकास’ प्रकल्पाची आवश्यकता भासते. वयवर्षे १२ ते १८ व्या वर्षांपर्यंत होणार्‍या शारीरिक, मानसिक, भावनिक बदलांना सुयोग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी  किशोरींच्या सोबत मैत्रिणीच्या नात्याने सोबत राहिले पाहिजे. मुलींना भावनिक मदत केली पाहिजे. ‘किशोरी विकास’ प्रकल्पाच्या अभ्यासक्रमातून एक सक्षम, सजग, तेजस्वी, तरुणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची संकल्पना आहे की मुलींच्या आयुष्यातील  १२ ते १८ वर्षांपर्यंतचा काळ हा संक्रमणाचा काळ असतो. या तिच्या आयुष्याचा प्रवास एका वेगळ्या वळणाच्या वाटेवरून सुरू होतो. याच काळात मुलींमध्ये शारीरिक, मानसिक बदल घडतच असतात. तसेच, याच काळात कुटुंबातील व्यक्ती आणि  आजूबाजूच्या लोकांचा या मुलींकडे पाहण्याचा किंवा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्या बदलांना खंबीरपणे, सजगतेने सामोरे जाण्यासाठी मुलींमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे. ‘किशोरी विकास’ म्हणजे संस्कार, प्रबोधन याचबरोबर आधुनिक जगात वाटचाल करताना किशोरींना जे जे आवश्यक असेल ते ते शिक्षण देते. या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत आरती नेमाणे.



या उपक्रमात स्फूर्तिगीते, वीरांगना, खेळ,  आरोग्य, आहार, व्यक्तिमत्व विकास, आणि लैंगिक शिक्षण आधारित सत्र, मुक्तसंवाद, बौद्धिक चर्चा, मुलींना दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरतात. शहरी तसेच ग्रामीण शाळा, वस्तीमध्ये किशोरी वर्ग सरू झाले आहेत. आठवड्यातून एक तास महिन्यातून चार तास हा वर्ग होतो. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलींना त्याचा फायदा होईल व जास्तीत जास्त किशोरी पुढे भविष्यात खंबीर, कर्तव्यदक्ष, ‘आत्मनिर्भर’ आणि सजग होतील, यात शंका नाही.



‘किशोरी विकास’ प्रकल्पाची पार्श्वभूमी  आपण समजून घेऊ. ‘सेवा सहयोग’ संस्थेला हे कार्य करण्याची गरज का भासली? सामाजिक पार्श्वभूमी काय होती? तर ‘किशोरी विकास’ हा प्रकल्प पौगंडावस्थेतील म्हणजे १२ ते १८ वयोगटाातील मुलींसाठी राबविला जातोे. सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘सेवा सहयोग संस्थे’ची स्थापना झाली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेव्यतिरिक्त अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उद्देशाने ‘समुत्कर्ष प्रकल्पा’ची सुरुवात झाली. हा प्रकल्प अनेक वस्त्यांमध्ये घेतला जाऊ लागला. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली अभ्यासिकांमध्ये मुलींची उपस्थिती अतिशय कमी होती. ज्या येत होत्या, त्याही अनियमित होत्या. एकूणच पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत जागरुकता नव्हती. मग मुलींची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. ज्या वस्त्यांमध्ये अनौपचारिक सर्वेक्षण केले, त्यातून अनेक निष्कर्ष समोर आले.

- कुपोषण.
- लहान वयात बालविवाह.
- स्वत:बद्दल जाणी नसणे, आत्मजागृकतेचा अभाव असणे.
- लैंगिक भेदभाव जाणीवपूर्वक केला जातो.
- आई-वडील कामावर जात असल्यामुळे लहान वयात घरातील आणि लहान भावंडांच्या जबाबदार्‍या पार पाडणे.
- सभोवतालच्या वातावरणामुळे शारीरिक आणि लैंगिक असुरक्षितता जाणवणे.
- पालकांचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक स्तर निम्न असणे.
- शाळेपासून घरापर्यंतचे अंतर दूर असणे.
 

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना पाहून वाटले की,  समाजातील या महत्त्वपूर्ण आणि विकसनशील वर्गाबद्दल काहीतरी केलेच पाहिजे, या विचाराने ‘किशोरी विकास’ प्रकल्पाची सुरुवात झाली. कारण, हाच वर्ग पुढे जाऊन समाज परिवर्तन करणार आहे, याचा परिणाम समाजाच्या प्रगतीवर होणार आहे. प्रकल्पाची नेमकी उद्दिष्टे : फक्त शैक्षणिक गोष्टीवर भर न देता एकूणच ‘किशोरीं’च्या शैक्षणिक, सामाजिक, मानसिक, भावनिक बदलांबाबत विचार करण्याचे ठरले.  त्यानुसार-
 
- मुलींना सुरक्षित आणि पूरक वातावरण निर्माण करून देणे.
- किशोरवयीन मुलींना एकमेकींबद्दल आपुलकीची तसेच सहकार्याची भावना निर्माण करावी आणि व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
- सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी मदत करणे.
- आत्मविश्वास वाढवणे.
- आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करणे.


यासाठी नियोजनबद्ध प्रकल्पाची निर्मिती करण्याचे ठरले. अर्थात, हे आव्हान वाटते तेवढे सोपे नाही. प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करून ते सोडवण्याचा प्रयत्न करणे हे मोठे अवघड काम आहे. मग अर्थातच त्यातील काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरले.




उद्दिष्टपूर्तीसाठी केलेले उपक्रम आणि कार्यपद्धती

प्रत्येक काम करत असताना आलेल्या अनुभवावरून या प्रकल्पाची कार्यपद्धती विकसित करण्यात आली. किशोरावस्था ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचा काळ असतो. तसाच त्याचा परिणाम व्यक्तिगत विचार, आयुष्य, सवयी, गुण यावर होत असतो. या वयात आधाराची, समजून घेऊन आधाराची गरज लागते. या संकल्पनेनुसारच या प्रकल्पाच्या सत्रांची आखणी करण्यात आली. प्रकल्पाच्या  प्रत्येक सत्रात विद्यार्थीनींचा सहभाग असावा अशीच रचना केली.
 
 

प्रकल्पाचे उद्देश 


- किशोरवयीन मुलींना आपले विचार व्यक्त करण्यास स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जाणीव होण्यास मदत करणे.
- स्वमताने निर्णय घेण्यासाठी आपल्या समस्या स्वत:हून सोडवण्यासाठी योग्य निवड व मदत करणे.
- आत्मविश्वास वाढवण्यास व्यक्तिमत्त्व खुलवण्यास योग्य मदत करणे.  
- मुलींना सुप्त कलागुणांना व्यावसायिक माहिती कलात्मक गुण देऊन प्रोत्साहन करणे.
- मुलींची सहनशीलता, विचार, व्यक्त करण्याची क्षमता यांना प्रोत्साहन देणे.




‘किशोरी’ वर्गासाठी इतर उपक्रम
 

1)मुक्त संवाद : स्थानिक विशेष व्यक्ती, वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे, ऐतहासिक स्थळे, आपल्या शहराची-गावाची माहिती मुलींना देेतात.
2)महिन्यातून एकदा शक्य झाल्यास एक महिला डॉक्टरांची भेट आयोजित करण्यात येते. वर्षातून एकदा मुलींची हिमोग्लोबिन, कॅल्शियम, लोह तपासणी केली जाते.
3)स्व-संरक्षण आधारित ‘ज्युडो’, ‘कराटे’, लाठीकाठी, मर्दानी खेळ, मुलींना प्रात्यक्षिके दाखविले जातात. यासंदर्भातला प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जातो.
4)वार्षिक शैक्षणिक  सहल  आयोजित केली जाते.
5) नवरात्रीमध्ये ‘किशोरी’ उत्सव साजरा केला जातो. सामान्यत: वयात न आलेल्या मुलींचे कन्यापूजन केले जाते. मात्र ’किशोरी विकास’ प्रकल्पामध्ये वयात आलेल्या कुमारिकांचे पूजन केले जाते.
6)दिवाळीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
7)तीळगूळ समारंभ (पालक एकत्रीकरण)
8)वस्ती एकत्रीकरण-पालक प्रबोधन. 9)मुलींचे शिबीरही आयोजित करण्यात येते. यात(सूर्यनमस्कार, प्रात्याक्षिके, योग, महिला डॉक्टर, गट चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक प्रात्याक्षिके ‘स्लाईड शो’, यशस्वी महिलेची मुलाखत वगैरे विषय असतात.


प्रत्येक मुलीला स्वयंपूर्ण करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवत जातो. त्यात कार्यकर्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यासाठी या किशोरींना प्रशिक्षण देणार्‍या भगिनींना प्रशिक्षित केले जाते. त्यांनी आपले अध्यापन सुंदर होण्यासाठी भरपूर गाणी, गोष्टी, विविध प्रेरणादायी व्हिडिओ, पेपरमधील बातम्यांची कात्रणे यांचा संग्रह करावा असे सूचित केले जाते. आपण स्वत: बोलण्यापेक्षा मुलींना जास्त संवाद साधण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यांच्यातील धीटपणा वाढविण्याचा प्रयत्न करावा. मुलींच्या शंकांचे निरसन करावे. त्यादृष्टीने चर्चा घडवून आणावी. मुलींसारख्या उणिवा, चुका-वाईट वर्तन उगाळत बसून बोलू नये. मुलींच्या छोट्या-छोट्या गोष्टींचे कौतुक आवर्जून करून आत्मविश्वास वाढवावा वगैरेबाबात प्रशिक्षित केले जाते.
 


‘किशोरी विकास’ प्रकल्प समितीची अध्यक्ष म्हणून मला वाटते की, आजकाल आपण पाहतो की अनेक शाळांमध्ये विद्यार्थिंनींसाठी ‘किशोरी विकास’ संकल्पना राबविली जाते. मात्र हा विषय एका तासाच्या सत्रात संपवला जातो. ‘सेवा सहयोग’ संस्थेने या विषयाचे महत्व जाणत या विषयासाठीच उपक्रम सुरू केला आहे. सेवावस्तीमध्ये आणि ग्रामीण दुर्गम भागामध्ये ‘सेवा सहयोग’च्या अभ्यासिका चालतात. या अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि समाजालाही भेडसावणारे प्रश्न चटकन समोर येतात. भौतिकतेचा विळखा पडलेल्या जगात मुलींनी संस्कारक्षम पण सक्षम आयुष्य जगावे यासाठी सेवासहयोगचा ‘किशोरी विकास’ प्रकल्प कटिबद्ध आहे.


9833994753
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121