रोगप्रतिकारकशक्ती आणि इच्छाशक्ती

    दिनांक  11-Jan-2021 23:05:18
|
inda _1  H x W:
 
आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला मजबूत करणे म्हणजे पर्यायाने आपल्या शरीरातील चैतन्यशक्तीला (डायनॅमिक एनर्जी) पोषण देणे होय. ‘डायनॅमिक एनर्जी’ ही आपल्या निसर्गातील मूळ ऊर्जास्रोताचाच एक भाग असल्यामुळे ही ऊर्जा प्रत्येकाच्या शरीरात शुद्ध स्वरुपात असते.
 
(प्युअर फॉर्म ऑफ एनर्जी) त्यामुळे प्रत्येक माणूस हा निरोगी राहतो. परंतु, जेव्हा या चैतन्यशक्तीच्या शुद्धतेला धक्का लागतो, त्यावेळी शरीरातील चैतन्यशक्तीचा निसर्गातील चैतन्यशक्तीशी असणारा समतोल बिघडतो व त्यांची संलग्नता बिघडते. ही संलग्नता बिघडल्यावर मात्र नैसर्गिक शुद्ध शक्ती व शरीरातील अशुद्ध चैतन्यशक्तीमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण होते. ही पोकळी म्हणजेच नकारात्मकता.
 
जसे ब्रह्मांडात कृष्णविवरे असतात आणि या कृष्णविवरांमध्ये अफाट, गूढ खोली (डीपनेस) असते, तसेच मनातील या नकारात्मकतेच्या पोकळ्यांमध्येसुद्धा अनेक चांगल्या गोष्टींना बिघडवून टाकण्याची क्षमता असते. म्हणूनच आपल्याला आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करायची असेल, तर सर्वप्रथम आपल्या या चैतन्यशक्तीला मजबूत करावे लागेल आणि ज्याप्रमाणे अंधाराला दूर करण्यासाठी प्रकाशाची गरज असते, त्याचप्रमाणे मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी सतत सकारात्मक राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मकता जर अंगी बाणवायची असेल तर डॉ. हॅनेमान (होमियोपॅथीचे जनक) यांनी यासाठी मनाला कसे काबूत ठेवायचे, याची शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.
 
 
डॉ. हॅनेमान यांनी सांगितले आहे की, 'Will and the understanding constitute man.' म्हणजे इच्छाशक्ती व सद्सद्विवेकबुद्धीचा दोन्हीच्या संलग्नतेने माणसाचे मन तयार होत असते व या दोन्हींच्या जोरावरच मनात येणारे विचार ‘वाईट की चांगले’ याचे विभाजन केले जाते. कुठल्या विचारांना थारा द्यायचा व कुठल्या नाही, हे या इच्छाशक्तीवरच अवलंबून असते. म्हणूनच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जेव्हा शरीरशास्त्र शिकवले जाते, त्यावेळी ते पूर्णवेळ शिकवले जात नाही, असे सुप्रसिद्ध डॉ. जेम्स टायलर केंट म्हणत असत.
 
‘फिजिऑलॉजी’ किंवा शरीरक्रियाशास्त्राला हा ‘डायनॅमिक एनर्जी’चा अभ्यास कळलाच नाही. त्यामुळे शरीरातील फक्त पेशी व उती यांच्यामधील बदलांना त्यांनी ‘रोग’ असे संबोधले. परंतु, ते रोग का तयार होतात, याचा कधी अभ्यास केलाच नाही. शरीरातील पेशींमधील झालेल्या बदलांना त्यांनी वेगवेगळ्या आजारांची नावे दिली. परंतु, त्या पेशींमध्ये बदल का होतात, याचा अभ्यास केला गेला नाही. हा अभ्यास डॉ. हॅनेमान व होमियोपॅथीच्या त्यांच्या सहयोगींनी केला व जगाला दाखवून दिले की, रोग हा पेशींच्याही पलीकडे ऊर्जापातळीवर होणारी उलाढाल असते.
 
पेशींमध्ये होणारे बदल हे रोगाचा निकाल आहेत, कारण नाही. प्रत्येकाला होणारे आजार हे त्याच्या ऊर्जेच्या पातळीवर तयार होणार्‍या पोकळीतून तयार होतात व त्याचा अंततः परिणाम हा शरीरातील पेशीवर दिसून येतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जा, मन व ठरावीक पद्धतीने दिसणारी लक्षणे या तिघांचाही अभ्यास फार महत्त्वाचा असतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आपल्याला आली इच्छाशक्ती व सद्सद्विवेक बुद्धी चांगली ठेवणे गरजेचे असते. ती कशी चांगली ठेवायची, ते आपण पुढे पाहूया.
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
9869062276
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.