भारतात पाळली जाणारी मादागास्कर 'लेमूर' प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर

    दिनांक  15-Jul-2020 11:52:58
|
lemur_1  H x W:

 

'आययूसीएन'ची माहिती
 
 
 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतातील परदेशी प्राण्यांच्या (एक्सझाॅटिक) व्यापारामधील मादागास्कर लेमूरच्या प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर पोहोचल्या आहेत. मादागास्करमध्ये नैसर्गिक अधिवासातील सुमारे एक तृतीयांश म्हणजेच ३१ टक्के लेमूर प्रजाती विलुप्त होण्यापासून अवघ्या एक पाऊल अंतरावर असल्याची माहिती इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययुसीएन) या संस्थेने प्रसिद्ध केली आहे.

 
 
 
 
 
  
 

आययूसीएनने वन्यजीवांच्या अधिवासाच्या सद्यपरिस्थितीबाबत जाहीर केलेल्या यादीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वन्यजीवांच्या अधिवासाची सद्यपरिस्थिती पडताळण्यासाठी १,२०,३७२ प्रजातींचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये ३२ हजार, ४४१ प्रजाती या जगातून नामशेष होण्याच्या जवळपास असल्याची माहिती समोर आली. यामध्ये मादागास्करमध्ये नैसर्गिक अधिवासातील सुमारे एक तृतीयांश म्हणजेच ३१ टक्के लेमूर प्रजाती धोक्यात आल्या आहेत. भारतात परदेशी प्राण्यांच्या व्यापाराच्या माध्यमातून मादागास्करमधील लेमूर प्रजातींची पाळण्यासाठी देवाण-घेवाण होते. ही देवाण-घेवाण बऱ्याचदा कायदेशीर नसते. वर्षभरापूर्वी 'डीआरआय'ने परदेशी प्राण्यांच्या तस्करीच्या अनुषंगाने मुंबई आणि नवी मुंबईत मारलेल्या धाडीत मादागास्कर येथील दुर्मीळ असे 'व्हाईट-ब्लॅक रुफेड लेमूर' सापडले होते. 'आययूसीएन'च्या 'रेड लिस्ट'मध्ये हा प्राणी 'क्रिटिकली एन्डेन्जर' म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 
 
 

काही दिवसांपूर्वी 'आययूसीएन'ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार लेमूर या प्राण्याच्या ३३ प्रजातींची नोंद 'क्रिटिकली एन्डेन्जर' या पातळीमध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच त्या नामशेष होण्यापासून एक पाऊल मागे आहेत. तर मादागास्करमधील लेमूरच्या १०७ पैकी १०३ प्रजाती जंगलतोड आणि शिकारमुळे विलुप्तीकडे पोहोचल्या आहेत. व्हरेरॉक्स सिफाकाआणि जगातील सर्वात लहान मर्कट 'मॅडमे बर्थ माऊस लेमूरया प्रजीतींची नोंद पूर्वी एन्डेन्जर' पातळीमध्ये होती. आता त्याची नोंद 'क्रिटिकली एन्डेन्जर' पातळीमध्ये करण्यात आली आहे. वनजमिनींवरील मानवी अतिक्रमण, कचरा, शेती, कोळशाच्या खाणी आणि इंधनासाठी सुरू असलेल्या लाकूडतोडीमुळे या प्रजातींचा नैसर्गिक अधिवासात घट होत असल्याचे आययूसीएनने म्हटले आहे. मादागास्करप्रमाणेच आफ्रिकेतील ५३ टक्के मर्कट प्रजाती या नामशेष होण्याच्या पायरीपर्यंत पोहोचल्या आहेत.

 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.