‘पॅन्डेमिक’ इतकेच जीवघेणे ‘इन्फोडेमिक’

    दिनांक  23-May-2020 22:25:02   
|

infodemic_1  H
भारतात दुष्प्रचार युद्ध किंवा खोट्या बातम्यांचा प्रसार हा कोरोना विषाणूच्या संक्रमणापेक्षाही अधिक वेगाने आणि धोकादायक पद्धतीने होतो आहे. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३०जानेवारीला सापडला. मात्र, त्यापूर्वीच सोशल मीडियावर खोट्या पोस्ट, अफवा, त्यावरचे उपचार याबाबतच्या व्हिडिओंनी थैमान घातले होते. तेव्हा, हा अपप्रचार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणूच्या केसेस जसजशा वाढू लागल्या, तसतसा फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, टिकटॉक यांसारख्या महत्त्त्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर या विषयीच्या अपप्रचारासाठी सर्रास केला जाऊ लागला. महत्त्वाच्या व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करुन त्यांच्या तोंडी चुकीची वक्तव्ये घालणे, ‘लॉकडाऊन’विषयी दिशाभूल करणारी मार्गदर्शक तत्वे यांचा यामध्ये समावेश होता. ‘फेक न्यूज’ म्हणजेच खोटी माहिती आणि बातम्या पसरविणे हा सध्या भारतात जडलेला एक गंभीर आजार आहे. आपल्याकडील कायदा खोटी माहिती /खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यास प्रभावी नाही. कठोर कायदा करण्याची राजकीय पक्षांची इच्छाशक्ती दिसत नाही. हे केवळ सगळे राजकीय पक्ष, सरकार आणि नागरिकांचेही कर्तव्य आहे. खोट्या बातम्या हा आपला देश, लोकशाही आणि समाजावर परिणाम करणारा घटक आहे. त्यापासून बचावासाठी आजच सर्वांनी मिळून या लढाईत सहभागी व्हायला हवे.

भारतात दुष्प्रचार युद्ध अधिक घातक का?

दुष्प्रचार युद्धाचा विषाणू व दिशाभूल करणार्‍या माहितीच्या महापुराचा सामना फक्त भारताला नाही, तर संपूर्ण जगालादेखील करावा लागतोय. विषाणूचा उगम, त्याचा प्रसार आणि त्यामुळे निर्माण होणारा धोका याबाबत पसरवल्या जाणार्‍या खोट्या बातम्यांमुळे सर्वच देश कमी-अधिक प्रमाणात घेरले गेलेत. अनेक संदेश खोटी, चुकीची माहिती प्रसारित करणारे आहेत. भारतात सोशल मीडिया झपाट्याने वाढत आहे. भारतात ५०-६० टक्के नागरिक विविध प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळेच भारत हा सोशल मीडिया कंपन्यांच्या रडारवर आहे. जगातील इतर देशांशी तुलना केल्यास वेगवेगळ्या जातीजमाती, धर्म, भाषा, राजकीय विचारसरणी यामुळे भारतात दुष्प्रचार युद्ध पसरवणे अधिक सोपे आहे. मात्र, त्याला नियंत्रित करू शकणारी मार्गदर्शक तत्वे अगदीच ढोबळ असल्याने हा दुष्प्रचार गंभीर स्वरूप धारण करतो.खोट्या बातम्या ही सर्वांसाठी मोठी डोकेदुखी

देशभरात खोट्या बातम्या ही सर्वांसाठी एक मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. काही कंपन्यांनी आपापल्या परीने यासंदर्भात कामही सुरू केले आहे. मध्यंतरी ‘स्पॅम’ असल्यामुळे फेसबुकने 1100 पेक्षा अधिक पेजेस बंद केली. या पेजेसच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचे तपासणीअंती लक्षात आल्यामुळे ही पेजेस बंद करण्यात आली. खोटा प्रचार करणारी, खोटी सामग्री पसरविणारी, तसेच नियम आणि अटींचे पालन न करणारी सर्व खाती बंद करण्याचा अधिकार सोशल मीडियाची सेवा पुरविणार्‍या कंपनीला आहे, असे तत्त्वतः मानले जाते. परंतु, खोट्या बातम्या आणि सामग्री पसरविण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढल्याने याची अंमलबजावणी कठीण आहे. व्हॉटसअप, टिकटॉकच्या माध्यमातून खोडसाळ व्हिडिओ आणि खोटे मेसेजेस पसरवले जातात. अनेकदा ते जातीय, धार्मिक तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. भारतात दुष्प्रचार युद्ध हा अनेकांचा व्यवसाय ठरलाय.
भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील ‘आयसीएमआर’ या सर्वोच्च संस्थेने खुलासा करून लोकांनी चुकीच्या उपचारांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर केले होते. ‘एप्रिल फूल’च्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या अफवांचे मेसेजेस पसरवले जावू नयेत, याची खबरदारी घेण्याचे आदेश मुद्रितमाध्यमे आणि प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांनाही देण्यात आले होते. एप्रिलच्या सुरूवातीपासून सरकारकडून ‘लॉकडाऊन’ वाढवले जाणार असल्याचे, देशात आणीबाणी लादली जाऊन लष्कर सर्वकाही ताब्यात घेणार असल्याचे व्हिडिओ आणि मेसेजेस व्हायरल झाले. मात्र, भारतीय लष्कराने हे वृत्त साफ फेटाळून लावले.
खोट्या बातम्यांच्या गुन्ह्यांविषयी कठोर कायदा जरुरी
भारतीय माहिती-तंत्रज्ञान कायद्याचाही (२०००) या दृष्टीने फारसा उपयोग होत असल्याचे दिसत नाही. कारण, या कायद्यात खोट्या बातम्यांचा उल्लेखसुद्धा नाही. तांत्रिकदृष्ट्या पाहावयाचे झाल्यास, जेव्हा एखादी व्यक्ती खोट्या बातमीचा प्रसार-प्रचार करते, तेव्हा त्यामागे एखाद्याच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करण्याचा हेतू असतो आणि त्यासाठी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डमध्ये संबंधित व्यक्ती फेरफार करते. भारतीय दंडसंहितेनुसार, खोटे दस्तावेज तयार करणे (फोर्जरी) आणि मानहानी करणे हे दोन्ही गंभीर गुन्हे मानले गेले आहेत. कायदा राबविणार्‍या संस्था खोट्या बातम्यांऐवजी अपहरण, बलात्कार, हत्या अशा वास्तविक गुन्ह्यांना अधिक महत्त्व देतात. खोट्या बातम्यांच्या गुन्ह्यांविषयी एक कठोर कायदा तर तयार केलाच पाहिजे; शिवाय देशाची एकता, अखंडता आणि स्वायत्तता धोक्यात आणण्याच्या मानसिकतेविरुद्ध लढण्याची तयारी संपूर्ण देशाची व्हायला पाहिजे.
प्रकाशन, प्रसारण आणि खोट्या बातम्या ‘फॉरवर्ड’ करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारने यासंदर्भात नवी मार्गदर्शक सूत्रे जारी करायला हवीत. त्याद्वारे ‘फेक न्यूज’ रोखण्याकामी सोशल मीडिया कंपन्यांची कर्तव्ये आणि जबाबदार्‍या स्पष्ट करायला हव्यात. खोट्या बातम्या पसरविणे हा शिक्षापात्र गुन्हा मानला जायला हवा आणि दोषी आढळणार्‍या व्यक्तीला शिक्षेची तरतूद करायला हवी. याखेरीज इंटरनेटचा वापर करणार्‍या सर्व व्यक्तींना म्हणजेच ‘नेटिझन्स’ना खोट्या बातम्यांच्या बाबतीत अधिक जागरुक आणि संवेदनशील बनवायला हवे. खोट्या बातम्या नियंत्रित करण्याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. खोट्या बातम्या पसरविणार्‍यांवर कठोर कारवाई करणे सोशल मीडिया कंपन्यांनाही बंधनकारक करायला हवे. खोट्या बातम्या पसरविण्याच्या गुन्ह्यांमध्ये या कंपन्यांना सहआरोपी केले तर यावर नक्कीच आळू बसू शकतो.
उपाययोजना
अशा प्रकारच्या दुष्प्रचार युद्धाला प्रतिबंध घातला जावा यासाठी, सर्वच देशांना पुढे येऊन आवाहन करण्याची वेळ आली. जागतिक आरोग्य संघटनेने या महामारीचा सामना करताना दुष्प्रचार युद्धाच्या रुपाने निर्माण झालेल्या या परिस्थितीला ‘इन्फोडेमिक’ (infodemic) असे संबोधले असून विश्वासार्ह आणि वैज्ञानिक माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
अर्थात हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही संस्था चीनच्या ताटाखालचे मांजर आहे.जागतिक आरोग्य संघटनेने जर वेळेवर कोरोनाविषयीची माहिती दिली असती, तर आपल्याला हजारो प्राण वाचवता आले असते. परंतु, चीनच्या दबावाखाली येऊन या संस्थेने कोरोनाची माहिती जगापासून खूप दिवस लपवून ठेवली. जेव्हा अशक्य झाले, तेव्हाच ती माहिती जगाला देण्यात आली. हीच संस्था चीनबरोबर हजारो माणसांच्या माणसांचे बळी जाण्याकरिता जबाबदार आहे.
देश एकाचवेळी चिनी विषाणूसोबतच खोट्या बातम्यांच्या विषाणूसोबतही लढत आहे, जे सारख्याच प्रमाणात जीवघेणे आहेत. खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे सरकारी यंत्रणा, केंद्र सरकार, राज्य आणि स्थानिक पातळीवर असंख्य अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे.
खोट्या बातम्या केवळ देशांतर्गत व्यक्तींकडूनच पसरविल्या जातात असे नव्हे, तर ‘नॉन स्टेट ऍक्टर्स’ म्हणजे देशाबाहेर बसलेल्या काही व्यक्तीही याकामी सक्रिय असतात. अशा खोट्या बातम्यांचा प्रचार आणि प्रसार भारताची एकता, अखंडता आणि स्वायत्तता यावर परिणाम करू शकतो, हे लक्षात घेऊन हा दुष्परिणाम टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जाण्याची गरज आहे. खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी भारतात कायदा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जरुरी आहे.
खोट्या बातम्या पसरविण्याच्या वृत्तीला लगाम घालणे, ही काळाची गरज आहे. जर हे आपण वेळीच ओळखले नाही आणि कृती केली नाही तर लोकशाही, समाज आणि राष्ट्र म्हणून आपल्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून या लढाईतील सैनिक बनवायला हवे. खोट्या बातम्यांचा परिणाम लोकांवर होऊ नये, यासाठी त्यांच्यात जागरूकता मोहीम चालविणे गरजेचे आहे. धोरणकर्त्यांबरोबरच हे सर्वसामान्य लोकांचेही कर्तव्य आहे. त्यांनी या लढाईत सक्रिय व्हायला हवे. भारत आज जर खोट्या बातम्यांच्या संकटाबाबत जागरूक झाला नाही, तर आगामी काळात आपला देश आणि आपली लोकशाही फार मोठ्या प्रमाणावर प्रभावित होऊ शकते. म्हणून, प्रत्यक्ष कृती आणि जनजागृतीला आजच सुरुवात झाली पाहिजे
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.