रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे बोधचिन्ह जाहीर

    दिनांक  08-Apr-2020 22:23:49   
|
logo _1  H x W:
 
 

‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी ‘पीएम केअर’मध्ये ११ लाखांची मदत

नवी दिल्ली (पार्थ कपोले) - हनुमान जयंतीचे औचित्य साधून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. भगव्या पार्श्वभूमीवर धनुर्धारी प्रभु श्रीरामचंद्रांची प्रसन्न मुद्रा, विरासनातील रामभक्त हनुमान आणि ‘रामो विग्रहवान धर्म:’ असे श्रीरामचंद्रांचे नेमके वर्णन करणारा श्लोक असलेले हे बोधचिन्ह आता ट्रस्टची ओळख बनले आहे.
 
 
 
अनेक दशकांच्या न्यायालयीन लढ्यानंतर अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीचा ताबा हिंदू समाजाला मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार भव्य राममंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला असून रामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू असलेले महंत नृत्यगोपालदास हे ट्रस्टच्या अध्यक्षपदी आहेत.
 
 
गुरुवारी हनुमान जयंतीचे औचित्य साधून ट्रस्टतर्फे बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. गोल आकाराच्या बोधचिन्हाच्या केंद्रस्थानी भक्तांना अभय देणारे प्रसन्न अशी प्रभू श्रीरामाची धनुर्धारी मुद्रा आहे, मुद्रेच्या पार्श्वभूमीवर भगवा रंग उठून दिसतो. मुद्रेच्या वरच्या भागात ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ही अक्षरे आहेत, तर मुद्रेच्या दोन्ही बाजूस विरासनातील रामभक्त हनुमान आहेत. ट्रस्टचे संपूर्ण काम हे हनुमानाच्या भक्तीप्रमाणे निरलस भावनेने केले जाईल, असा संदेश त्यातून देण्यात आला आहे. बोधचिन्हाच्या बाहेरील बाजूस असलेली लाल आणि भगव्या रंगातील सूर्यकिरणे ही प्रभू श्रीरामाच्या सूर्यवंशाचे आणि देदीप्यमानतेचे प्रतिनिधीत्व करतात.
 
 
बोधचिन्हाच्या आधारपट्टीकेवरील ‘रामो विग्रहवान धर्म:’ हा वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडातील श्लोक अंकीत करण्यात आला आहे. त्याचा अर्थ असा- ‘विग्रहवान’ म्हणजे ‘धारणावान’ अथवा ‘धारण करणारा.’ ‘विशेषत्वेन ग्राहयति स:’ म्हणजेच ‘धर्म धारण करणारा.’ त्यामुळे ‘धर्म धारण करणारा राम’ अथवा ‘साक्षात धर्म म्हणजेच राम’ असा त्याचा अर्थ होतो.
रामो विग्रहवान धर्म:
साधु: सत्य पराक्रम:
राजा सर्वस्य लोकस्य
देवानामिव वासव:।
 
 
 
 
वाल्मिकी रामायणातील हा संपूर्ण श्लोक असून सीतेचे हरण करण्यासाठी रावण मारिचाकडे साहाय्यासाठी गेला असता, रावणास रामाचे महत्त्व समजावून सांगताना मारिचाने रामाचे त्यात वर्णन केले आहे. त्याचा अर्थ म्हणजे, “राम म्हणजे साक्षात धर्म आहे. तो साधुवृत्तीचा (सज्जन) असून सत्यप्रेमी आणि महापराक्रमी आहे. ज्याप्रमाणे इंद्र हा समस्त देवतांचा राजा आहे, त्याचप्रमाणे राम हा संपूर्ण जगताचा राजा आहे.” त्यामुळे बोधचिन्हामध्ये श्लोकातील पहिल्या ओळीचा वापर करून ट्रस्ट नेहमी धर्माप्रमाणेच आचरण करणार असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.
 
 
‘केंद्र सरकारला सर्वतोपरी मदतीस कटीबद्ध’
 
 
बोधचिन्ह आता ट्रस्टची ओळख असणार आहे. ट्रस्टतर्फे होणारे पत्रव्यवहार, लेटरहेडवरील पत्रव्यवहार आणि अन्य कामांसाठी हा लोगो वापरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना संकटातून देश बाहेर पडल्यावर मंदिर उभारणीविषयी पुढील निर्णय घेतले जातील. आता अनेक दशकांनंतर रामलला ताडपत्रीमधून अस्थायी मात्र सुसज्ज अशा मंदिरात विराजमान झाले आहेत. त्याचप्रमाणे श्रीरामजन्मभूमी ट्रस्टतर्फे कोरोना संकटाच्या निवारणासाठी स्थापित करण्यात आलेल्या ‘पीएम केअर’ फंडामध्ये अकरा लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे “कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी ट्रस्ट कटीबद्ध आहे,” अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख आणि केंद्रीय सहमंत्री विजय शंकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.