स्वायत्त समाजाच्या दिशेने...

    दिनांक  08-Jul-2019   सत्तेची अनुकूलता निरंतर राहिली पाहिजे आणि त्यासाठी राज्यसत्ता आणि संघ परस्परांना पूरक बनून आपापल्या क्षेत्रात काम करीत राहिले पाहिजेत. श्रीगुरुजींचा हाच दृष्टिकोन होता आणि बाळासाहेब देवरसांचीदेखील हीच दृष्टी होती.

 

केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून संघ आणि भाजप यांच्या संबंधांविषयी प्रसारमाध्यमांतून वेगवेगळ्या चर्चा चालतात. या सर्व चर्चा एकतर्फी असतात. अशा चर्चेत संघाचे कोणी जाणकार शक्यतो भाग घेत नाहीत. जे चर्चा करतात, त्यांचे ज्ञान अर्धवट असते. संघाच्या कामाच्या शैलीबाबत तर ते घोर अज्ञानी असतात. त्यांना असे वाटते की, नरेंद्र मोदी यांना 'नागपुरा'तून आदेश जातात किंवा देवेंद्र फडणवीस यांना 'नागपूर'कडून सूचना येतात आणि मग ते आपली धोरणे ठरवितात. मंत्रिमंडळात कोण असावे, कोण नसावे, याचे निर्णय 'नागपुरा'त होतात आणि त्याची अंमलबजावणी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस करतात. असे काही लिखाण वाचले की, लेखनकर्त्याच्या अज्ञानाबद्दल हसावे की रडावे, काही समजत नाही. मूर्खपणाचा कळस असे समजून या सर्व विषयाकडे दुर्लक्ष करणेच चांगले, असे मानून मी स्वस्थ बसतो.

 

राजसत्तेच्या बाबतीत संघाची ठाम मते आहेत. समाज संघटन, जे संघाला अभिप्रेत आहे ते राजसत्तेच्या माध्यमातून होऊ शकत नाही. संघाला चारित्र्यसंपन्न, राष्ट्रसमर्पित, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणाचा वसा घेतलेल्या हिंदूंचे संघटन अभिप्रेत आहे. हे कार्य कोणतीही राजसत्ता करू शकत नाही. राजसत्तेचे हे काम नव्हे. राजसत्ता जर नको त्या गोष्टी करू लागली, तर तिचे पतन आणि विनाश कुणीही थांबवू शकत नाही. रशियातील राज्यसत्तेने जबरदस्तीने समता आणण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या धर्मभावना मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राज्यशक्तीचा उपयोग केला. परिणाम एवढाच झाला की, १९९० साली रशिया कोसळली. साम्यवादी राज्यसत्ता रसातळाला गेली.

 

सत्ता हस्तगत करणे, ती राबविणे आणि सत्तेद्वारा समाजावर नियंत्रण ठेवणे, हे संघाचे कालही ध्येय नव्हते, आजही नाही आणि उद्याही असण्याचे कारण नाही. सत्ता मिळविण्याची अक्कल संघात नाही किंवा आपल्याला हा जमणारा विषय नाही, असे समजून संघाने हा विचार स्वीकारलेला नाही. सर्व प्रकारची क्षमता असताना तिचा वापर न करता, संघाने केवळ समाज संघटनेच्या कार्याला आणि चारित्र्य निर्माणाच्या कार्याला वाहून घेतले आहे. त्यामागे अतिशय खोलवरचे चिंतन आहे.

 

महात्मा गांधींपासून ते कवी इक्बालपर्यंत सर्वजण सांगतात की, जगात अनेक राज्यसत्ता आल्या आणि गेल्या, संस्कृतींचा उदय झाला आणि त्या लयाला गेल्या. परंतु, भारतीय संस्कृती कधीच लयाला गेली नाही. आक्रमकांनी तिला संपविण्याचा खूप प्रयत्न केला, पण आक्रमक संपले, आपली संस्कृती संपली नाही. ती भक्कम पायावर उभी आहे. तिच्या पायाला धक्का लावण्याची हिम्मत जगात कुणात नाही. ती कधी सुस्त होते, तिच्यातील कर्मप्रवणता कमी होते, त्यामुळे अनेक दोष निर्माण होतात. परंतु, पुन्हा ती दोष काढून नव्याने उभी राहते. हजारो वर्षे हे चालू आहे.

 

या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे, तो तिचा धर्म. तिचा धर्म तिच्या अध्यात्म विचारधारेत आहे. अध्यात्म विचारधारा सांगते की, आपण सर्व एका चैतन्याची विविध रुपे आहोत. जे माझ्यात ते तुझ्यात. वरवर जे भेद दिसतात, ते भेद नसून ती विविधता आहे. आतंरिक एकतेचे जतन केले पाहिजे आणि विविधताही जोपासली पाहिजे. मी चैतन्याचे स्वरूप असल्यामुळे जन्मत: मी मुक्त आहे म्हणजे स्वतंत्र आहे. जन्मत: मी सर्वांच्या बरोबरीचा आहे म्हणजे समतायुक्त आहे. जन्मत: मी दुसर्‍याशी जोडलेला असल्यामुळे बंधुभावयुक्त आहे. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता मला अन्य कुणी द्यायची गरज नाही. ती माझ्या अस्तित्त्वाने मला प्राप्त झाली आहे. राज्यघटनेने तिचा स्वीकार केला, हा राज्यघटनेचा सन्मान आहे. या सर्व विवेचनाला 'धर्म' असा शब्द आहे. जो शाश्वत आहे आणि सनातन आहे.

 

संघाच्या संघटनेचा हा आध्यात्मिक पाया आहे. तत्त्वज्ञान कितीही चांगले असले, तरी त्याला तसे काही मूल्य नसते. ते जेव्हा जीवनात प्रत्यक्ष येते, तेव्हा त्याला मूल्य प्राप्त होते. म्हणून संघाचा आग्रह आणि प्रयत्न तत्त्वज्ञान जगण्याचा असतो. तत्त्वज्ञानाची पोपटपंची संघ स्वीकारीत नाही. 'जे बोलू तसे वागू आणि जे बोलू तसेच करू,' हा संघबाणा आहे. आपल्या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य असे की, ते प्रत्यक्ष आणण्याचा प्रयत्न युगानुयुगे चालू असतो. प्रत्येक कालखंडात त्याचे रूप वेगळे असते. कालसापेक्ष विचार करून तत्त्वज्ञानाला समाजरचनेत बसवावे लागते. अशी समाजरचना उभी करताना आपली हजारो वर्षांची परंपरा अशी राहिली आहे की, आपला समाज स्वायत्त, स्वयंशासित, स्वावलंबी आणि समरस असला पाहिजे. 'स्वायत्त' याचा अर्थ समाजजीवन नीट चालण्यासाठी राजसत्तेचा त्यात कमीतकमी हस्तक्षेप हवा. 'स्वयंशासित' याचा अर्थ असंख्य लहानसहान गोष्टी समाजाने स्वत:च्या सामर्थ्यावर सोडवाव्यात, त्यासाठी शासनावर अवलंबून राहू नये. 'स्वावलंबी' याचा अर्थ समाजजीवन चालण्यासाठी ज्या गरजा असतात, त्या आपापल्या क्षेत्रातूनच पूर्ण कराव्यात. त्यासाठी परिश्रम करावे आणि 'समरसते'चा अर्थ समाजातील सर्व माझे आत्मिय बांधव आहेत. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, या भावनेने जगावे.

 

शासनावलंबी समाजरचना उभी करणे, हे संघाचे काम नाही. महात्मा गांधी यांनीदेखील हाच विचार 'हिंद स्वराज्य' या पुस्तकात मांडलेला आहे. मृत्युपूर्वी त्यांनी काँग्रेस विसर्जित करून तिचे लोकसेवा संघात रूपांतर करावे, असे लिहून ठेवले. सेवा राणी झाली पाहिजे आणि सत्ता तिची दासी झाली पाहिजे, ही गांधीजींची भूमिका होती. गांधीजींनी जे १९४८ साली सांगितले, ते डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली सांगून तशी कृती करायला प्रारंभ केला. हे जे दर्शन आहे, ते अतिशय भव्य आहे. ते प्रत्यक्षात येण्यासाठी हजारो, लाखो समर्पित कार्यकर्ते, ध्येयनिष्ठ समर्पित मनुष्यबळ याची जशी आवश्यकता आहे, तशीच अनुकूल सत्तेचीदेखील आवश्यकता असते. संघ सत्तेचे राजकारण करीत नाही, हे जितके खरे, तेवढे हेदेखील खरे आहे की, संघ सत्ता आपल्याला अनुकूल राहील, अशा प्रकारचा विचारही करीत असतो. यामुळेच श्रीगुरुजींना जनसंघ स्थापनेमध्ये पुढाकार घ्यावा लागला आणि संघकामातील अनेक ज्येष्ठ प्रचारकांना राजनीतीमध्ये पाठवावे लागले. त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच राहिली की, त्यांनी घटनात्मक राजनीती शिकून घ्यावी, आपल्या जीवनमूल्यांशी तडजोड करू नये आणि सत्ता हे जनसेवेचे साधन मानून काम करावे. आपले निर्णय आपण करावेत. संघाला त्यात ओढू नये.

 

जगाचा इतिहास पाहता, कोणतेही भव्य दर्शन राज्यसत्तेच्या अनुकूलतेशिवाय सर्वमान्य होत नाही आणि त्याचा स्वीकार सर्वमान्य होत नाही. येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ ३०० वर्षे त्याचा धर्म सर्वत्र पसरला नाही. रोमन सम्राट कॉनस्टंटस्टाईन याने जेव्हा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, तेव्हा त्याने राज्यसत्तेच्या माध्यमातून युरोपात ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. त्याचा पुढचा इतिहास चांगला नाही आणि तो मानवतेला काळीमा फासणारा आहे. हे जरी खरे असले तरी आज जगभर जे ख्रिश्चन पसरले आहेत, त्याचे श्रेय कॉनस्टंटस्टाईनला द्यावे लागते. मोहम्मद पैंगबर यांची इस्लामची शिकवणूक, जोपर्यंत राज्यसत्ता मानत नव्हती, तोपर्यंत तिचा स्वीकार अरबांनी केला नाही. ज्याक्षणी सत्ता आणि इस्लाम एक झाले, त्याक्षणी इस्लामचा झपाट्याने प्रसार झाला आणि बघता बघता अरबस्तान ते भारत, मध्य आशिया, इराण याठिकाणी इस्लामचा प्रसार झाला.

 

भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धर्म त्याच्या जन्मापासूनच राजमान्यता पावलेला धर्म आहे. राजा बिंबीसार, राजा प्रसेनजित इ. अनेक राजांनी गौतम बुद्धांचा सन्मान केला आणि त्यांच्या धर्माला राज्यमान्यता दिली. सम्राट अशोकाने राज्यसत्तेच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा जगभर प्रचार केला. मार्क्सच्या दर्शनालासुद्धा जेव्हा रशियाची राज्यसत्ता मिळाली, चीनची राज्यसत्ता मिळाली, त्या दर्शनाचा जगभर प्रचार झाला. दर्शनांचा हा इतिहास पाहता, त्यातून काही अनुमाने काढता येतात. पहिले अनुमान असे की, दर्शन प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल राज्यसत्ता आवश्यक आहे. दुसरे अनुमान असे की, जी दर्शने केवळ राज्यसत्तेवर अवलंबून राहतात, त्या दर्शनांचा र्‍हास राज्यसत्तेच्या र्‍हासाबरोबर होत जातो. जी दर्शने सत्ताकेंद्रित होतात, त्यांचे आयुष्य मर्यादित असते. संघदर्शनाचे काय होणार आहे? या ठिकाणी अन्य दर्शने आणि संघ यातील महत्त्वाच्या अंतराविषयी जाणून घेतले पाहिजे.


आज राजनीतीत जे उच्च स्थानी आहेत, ते सर्व संघस्वयंसेवक आहेत. सत्तास्थानी कोण कोण आहेत, याची नावे येथे देण्याचे कारण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले तरी खूप आहे. ते संघ स्वयंसेवक आहेत. तृतीय वर्ष शिक्षित आहेत. प्रचारक आहेत. असे सर्व स्वयंसेवक विचारनिष्ठेने प्रथम संघाला बांधील असतात. त्यांना मार्गदर्शन करण्याची काही आवश्यकता नसते. आपल्या क्षेत्रात आपण काय केले पाहिजे, ते कसे केले पाहिजे, याचे त्यांना फार उत्तम ज्ञान असते. त्यांना हेही समजत की, संघाचे भव्य ध्येय किंवा दर्शन सत्तेच्या माध्यमातून व्यवहारात येणारे नाही. सत्ता तिला साहाय्यभूत होऊ शकते. सत्तेच्या हातात दंडशक्ती असते. दंडशक्ती भय उत्पन्न करते. या भयापोटी माणसे नीतीने वागण्याचे सोंग करतात. म्हणून ते 'नीतिमान' झाले असे समजण्याचे कारण नाही. प्रशासकीय भ्रष्टाचार केल्यास शासन होईल, ही भीती असते. म्हणून काहीजण भ्रष्टाचार करीत नाहीत. परंतु, भ्रष्टाचार करणे हे पाप आहे, अशी भावना निर्माण झाली की, तो कायद्याचा काहीही विचार करीत नाही.

 

समाज स्वायत्त आणि स्वयंशासित, स्वाभिमानी आणि समरस होण्यासाठी अनुकूल राज्यसत्ता अत्यावश्यक आहे. इंग्रजी भाषेचा प्रयोग करायचा तर 'must' आहे. नेहरुंच्या प्रतिकूल राज्यसत्तेचा अनुभव संघाने घेतलेला आहे. त्यांनी सर्व शक्ती पणाला लावून संघाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींनीदेखील तेच केले. उद्या राहुल गांधी चुकून सत्तेवर आले, तर तसा प्रयत्न पुन्हा करतील. नरेंद्र मोदी यांचे शासन मात्र समाजाला 'स्वायत्त' करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वयंरोजगाराच्या अनेक संधी या शासनाने उपलब्ध केलेल्या आहेत. गॅसची सबसिडी स्वेच्छेने परत करायला लावून स्वयंनिर्णयाची सवय लोकांना लावली आहे. स्वच्छता ही ज्याची त्याने करायची आहे. परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. भारताचा 'योग' त्यांनी जागतिक पातळीवर नेलेला आहे. शरीर आणि मनाचा व्यायाम म्हणजे 'योग' ही आपली हिंदू संकल्पना आहे. तिचा प्रचार नरेंद्र मोदी यांनी सत्तेच्या माध्यमातून केला आहे.

 

सत्तेची अनुकूलता निरंतर राहिली पाहिजे आणि त्यासाठी राज्यसत्ता आणि संघ परस्परांना पूरक बनून आपापल्या क्षेत्रात काम करीत राहिले पाहिजेत. श्रीगुरुजींचा हाच दृष्टिकोन होता आणि बाळासाहेब देवरसांचीदेखील हीच दृष्टी होती. देशाच्या दृष्टीने राष्ट्रीय सरकार अतिशय आवश्यक आहे. समाजाच्या दृष्टीने त्यागी, निरपेक्ष भावनेने काम करणारा, सत्तेपासून शेकडो हात दूर, संघदेखील आवश्यक आहे. आज अमेरिका जगाची महासत्ता आहे. अमेरिकेचा आधार आहे, तिची राज्यघटना म्हणजे सत्ता राबविणारी कायदेप्रणाली. हा एकखांबी तंबू आहे. तो ज्याक्षणी कोसळेल, त्याक्षणी अमेरिका कोसळेल. ब्रिटनची सार्वभौम संस्था आहे तिची पार्लमेंट. ती ज्याक्षणी कोसळेल, त्याक्षणी ब्रिटन नावाचा देश राहणार नाही. भारताचे तसे नाही. ज्या भारतात समाजाला स्वायत्त करणारी राजसत्ता आहे आणि ज्या भारतात स्वायत्तेच्या बीजाचे संरक्षण करणारा संघ आहे, तो भारत युगानुयुगे जसा भारत आहे तसाच भारत राहणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat